Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

संगकारा, समरवीराची शतके; श्रीलंका सुस्थितीत उमर गुलचे तीन बळी
लाहोर, १ मार्च / वृत्तसंस्था

कुमार संगकारा आणि थिलन समरवीरा यांनी शतके झळकावत चौथ्या गडय़ासाठी केलेल्या २०४

 

धावांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने सुरुवातीला जबर धक्के बसल्यानंतरही पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या व अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर सुस्थिती गाठण्यात यश मिळवले. फैसल इक्बालकडून संगकारा वैयक्तिक ५५ धावांवर असताना झेल टिपण्यात हाराकिरी झाली नसती तर कदाचित आजच्या दिवसाच्या खेळाचे चित्र वेगळे राहिले असते. महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली शेवटची कसोटी खेळत असलेल्या श्रीलंकेने दिवसअखेर ४ बाद ३१७ धावांची मजल मारली होती. त्यावेळी १३३ धावांवर नाबाद असलेल्या थिलन समरवीराला तिलकरत्ने दिलशान ३ धावा काढून दुसऱ्या टोकाने साथ देत होता.
पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर श्रीलंकेची ३ बाद ९६ अशी अवस्था झाली तेव्हा युनूस खानचा निर्णय योग्य असल्याचे वाटत होते. मात्र, त्यानंतर संगकारा व समरवीरा यांनी दमदार भागीदारी करत श्रीलंकेला सुस्थिती गाठून दिली. खेळ संपायला काही मिनिटे शिल्लक असताना यासिर अराफतने संगकाराला बाद करत त्यांची भागीदारी संपुष्टात आणली. दिवसअखेर संगकारा बाद झाला असला तरी संघाला सुस्थिती गाठून देण्यात यश मिळाल्याने तो निश्चितच समाधानी असेल.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुलने सलामीवीर मलिंदा वर्णपुरा आणि थरंगा पर्णवितना यांना झटपट माघारी परतवल्यानंतर कर्णधार म्हणून शेवटची कसोटी खेळत असलेल्या महेला जयवर्धनेने ३० धावांचे उपयुक्त योगदान दिले.
धावफलक :
श्रीलंका पहिला डाव :- मलिंदा वर्णपुरा झे. मिसबाह-उल हक गो. गुल ०८, थरंगा पर्णवितना झे. मलिक गो. गुल २१, कुमार संगकारा झे. अकमल गो. अराफत १०४, महेला जयवर्धने झे. अकमल गो. गुल ३०, थिलन समरवीरा खेळत आहे १३३, तिलकरत्ने दिलशान खेळत आहे ०३. अवांतर (बाईज ४, वाईड २, नोबॉल १२) १८. एकूण ८६.४ षटकात ४ बाद ३१७. बाद क्रम १-६, २-३५, ३-९६, ४-३००. गोलंदाजी : उमर गुल १९.४-२-६७-३, मोहम्मद तलाह ११-०-५०-०, यासिर अराफत १३-२-५३-१, दानिश कनेरिया २४-१-८९-०, शोएब मलिक १७-२-४५-०, युनूस खान २-०-९-०.