Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सरवानची द्विशतकाच्या दिशेने वाटचाल; वेस्ट इंडिजचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर
बार्बाडोस, १ मार्च / वृत्तसंस्था

वेस्ट इंडिज संघाच्याच संयमाची परीक्षा ठरलेला तिसरा दिवस अनुभवी रामनरेश सरवानने धीरोदात्त

 

फलंदाजी करत गाजवला पण, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा कालचा दिवस टी.व्ही. पंच डॅरिल हार्पर यांनी केलेल्या ढोबळ चुकांनीच अधिक गाजला. सरवानने २८० चेंडूंना तोंड देत काढलेल्या नाबाद १८४ धावांच्या जोरावर पुन्हा एकदा कसोटी सामना वाचविण्याच्या यजमान वेस्ट इंडिजच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात त्रिनिदादला होणारा पाचवा व शेवटचा कसोटी सामना मालिकेचा निर्णायक कसोटी सामना असेल, हे सुद्धा कालच्या खेळाने जवळजवळ निश्चित केले आहे.
कालचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने ५ बाद ३९८ धावांची मजल गाठली होती. विंडीजला इंग्लंडची (६ बाद ६००, डाव घोषित) पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप २०२ धावांची गरज असली तरी यजमान संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी केवळ दोनच धावांची गरज असून त्यांच्याकडे पाच फलंदाज शिल्लक आहेत. दरम्यान, वेस्ट इंडिजने काल काढलेल्या धावांपेक्षा त्यांचे पाचही फलंदाज पायचितच्या निर्णयाने बाद झाल्याचीच चर्चा अधिक झाली. दुसऱ्या दिवसातील शेवटच्या सत्रात ख्रिस गेल पायचित झाला. मैदानातील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते पण, त्यावर आयसीसीच्या ‘रेफरल’ पद्धतीनुसार गोलंदाजांने पुन्हा अपील केल्यावर टी.व्ही. पंचांनी तो बाद असल्याचा निर्वाळा दिला होता. काल तिसऱ्या दिवशी सकाळच्याच सत्रातच वेस्ट इंडिजने दोन फलंदाज गमावले. ऑफस्पिनर ग्रॅमी स्वानच्या गोलंदाजीवर डेव्हॉन स्मिथ व रायन हाईंड्स यांना पायचित ठरवण्यात आले. त्यावेळस फलंदाजांनी दाद मागितली पण, स्मिथच्या वेळेस मैदानातील पंचांनी दिलेला निर्णय त्यांनीही मान्य केला तर हाईंड्सच्या वेळेस त्यांनी नकार दिला होता. मात्र, दिवसातील तिसऱ्या व चौथ्या निर्णयाच्यावेळी टी.व्ही. पंचांकडू पुन्हा चूक झाली. परिणामी जम बसलेल्या शिवनारायण चंद्रपॉलसह ब्रेंडन नॅशला माघारी परतावे लागले.
मात्र, या नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे आता इंग्लंडपुढे प्रतिस्पर्धी संघाला दोनदा कसे बाद करायचे याचा पेच निर्माण झाला आहे. अष्टपैलू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफने दुखापतीमुळे माघार घेतली आहे, तर वेगवान गोलंदाज स्टिव्हन हार्मिसनला त्यांनी या कसोटीतून डच्चू दिला आहे. त्यामुळे इंग्लंडसंघापुढे येथील पाटा खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करत मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मोठीच समस्या निर्माण झाली आहे.
दरम्यान, या मालिकेतील पहिल्या तीन डावात सरवानने १०६, ९४ आणि १०७ धावांची खेळी केली आहे. दुसऱ्या दिवशी ४० धावांवर नाबाद असलेल्या सरवानने तिसऱ्या दिवशी इंग्लंडला एकही संधी न देता १८४ धावांची खेळी सजवली. खेळ संपला तेव्हा दिनेश रामदिन त्याला २५ धावा काढून साथ देत होता. सरवानने काल अतिशय अप्रतिम फलंदाजी केली. त्याचे ड्राईव्हज तर लाजवाबच होते. त्याच्या खेळीतील १९ चौकार इंग्लंडच्या ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण भेदून सीमारेषेपार गेले.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ६ बाद ६०० (डाव घोषित).
वेस्ट इंडिज पहिला डाव :- डेव्हॉन स्मिथ पायचित गो. स्वान ५५, ख्रिस गेल पायचित गो. अ‍ॅन्डरसन ६, रामनरेश सरवान खेळत आहे १८४, रायन हाईंड्स पायचित गो. स्वान १५, शिवनारायण चंद्रपॉल पायचित गो. अ‍ॅन्डरसन ७०, ब्रेंडन नॅश पायचित गो. स्वान ३३, दिनेश रामदिन खेळत आहे २५. अवांतर (बाईज ४, लेगबाईज ३, नोबॉल ३) १०. एकूण १०९ षटकात ५ बाद ३९८.
बाद क्रम : १-१३, २-१२१, ३-१५९, ४-२८१, ५-३३४. गोलंदाजी : अ‍ॅन्डर्सन २०-३-७९-२, साईडबॉटम २२-२-८६-०, ब्रॉड २१-२-८६-०, स्वान ३४-७-९२-३, पीटरसन ५-१-१८-०, रवी बोपारा ७-०-३३-०.