Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

व्यक्तिवेध

ऑस्कर पुरस्काराने संगीतकार ए. आर. रहमान याचे नाव जागतिक पातळीवर गाजत असताना तमिळनाडूमध्ये गेली १५ वर्षे चालू असलेला वाद आता नव्याने लढला जाऊ लागला आहे. रहमान श्रेष्ठ की इलया राजा श्रेष्ठ असा हा वाद. वास्तविक रहमानच्या यशाचा पायाच त्याच्या या गुरूने - संगीतकार इलया राजाने - उभा करून ठेवला असल्याचे त्यांच्या कारकीर्दीवर नजर टाकल्यास दिसून येईल. तमिळनाडूतल्या पन्नाइपुरम या छोटय़ाशा गावापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रयोगशील संगीतरचनांसाठी इलया राजा ओळखले जातात. पन्नाइपुरममध्ये २ जून १९४३ रोजी जन्मलेल्या इलया राजांवर पहिले संस्कार झाले ते तमिळ लोकसंगीताचे. पवलार वरदराजन या आपल्या सावत्र मोठय़ा भावाच्या फिरत्या संगीत मंडळीत ते वयाच्या १४ व्या वर्षी सामील झाले. १० वर्षांच्या या भटकंतीत दक्षिणी लोकसंगीताचे, कर्नाटक संगीताचे संस्कार त्यांच्यावर झाले. याच सुमारास त्यांनी कन्ननदास या तमिळ कवीने जवाहरलाल नेहरूंवर लिहिलेले गीत संगीतबद्ध केले. पुढे चेन्नईत प्रा. धनराज यांच्याकडे घेतलेल्या शिक्षणात संगीताचा आवाका पश्चिमी क्लासिकल संगीतापर्यंत विस्तारला आणि नंतर त्यांनी लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये संगीत विषयात सुवर्ण पदक मिळवले. प्रा. धनराज आणि ट्रिनिटी कॉलेज हे इलया राजा आणि रहमान यांच्यामधील समान दुवे. त्या अर्थाने दोघे

 

गुरुबंधूदेखील. इलेक्ट्रिक गिटार, कीबोर्ड, ऑर्गन ही इलया राजा यांची खास वैशिष्टय़े. या वैशिष्टय़ांसहित त्यांनी सलिल चौधरींकडे वादक म्हणून काम केले. कन्नड चित्रपटांचे संगीतकार जी. के. वेंकटेश यांचे सहायक म्हणून काम केले आणि ते करत असतानाच स्वत:च्या संगीतरचना ते तयार करू लागले. त्यासाठी आर. के शेखर यांच्याकडून ते वाद्ये भाडय़ाने आणीत असत. ए. आर. रहमान हा या आर. के शेखर यांचा पुत्र. पुढे शेखर हे इलया राजांच्या ऑर्केस्ट्रामध्ये कीबोर्ड वाजवू लागले. १९७६मध्ये इलया राजांना पांचू अरुणाचलम यांच्या ‘अन्नाकिली’ या तमिळ चित्रपटाचे संगीत देण्याची संधी मिळाली आणि त्यात त्यांनी आधुनिक लोकप्रिय संगीत, तमिळ लोकसंगीत आणि पश्चिमी संगीताचे फ्युजन सादर करीत चित्रपट संगीताला एक नवे परिमाण द्यायला सुरुवात केली. १९८३ मध्ये यांनी ‘सदमा’ला संगीत दिले आणि हिंदी चित्रपट संगीतात इलया राजांचं पदार्पण झाले. मुख्यत: के. बालचंदर, के. विश्वनाथ, बालू महेंद्र, सिंगीतम श्रीनिवास राव, मणिरत्नम अशा दक्षिणी दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून त्यांनी संगीत दिले असले तरी हे सर्व दिग्दर्शक हिंदी चित्रपटक्षेत्रातही उतरले होतेच. त्यामुळे इलया राजांच्या वैशिष्टय़पूर्ण संगीताला व्यापक राष्ट्रीय चाहता वर्गही मिळाला. कर्नाटक संगीत, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, दक्षिणेतील लोकसंगीत या बरोबरच पॉप, जाझ, रॉक अँड रोल, फंक, सायकेडेलिया, बोसानोवा, फ्लॅमेंको, आफ्रिकन ट्रायबल संगीत अशा विविध प्रवाहांच्या मेळातून त्यांनी आपले संगीत तयार केले, तसेच इलेक्ट्रॉनिक गिटार, सिंथेसाइझर, कीबोर्ड, ड्रम मशीन्स यांच्याबरोबरच एकीकडे सेक्सोफोन आणि दुसरीकडे वीणा, नादस्वरम, ढोलक, मृदंग, तबला अशी पारंपरिक भारतीय वाद्ये त्यांनी उपयोगात आणली. शेखर यांच्या अकाली मृत्यूनंतरही इलया त्यांच्या कुटुंबीयांकडून वाद्ये आणीत असत. १५ वर्षांच्या रहमानला त्यांनी आपल्याकडे कीबोर्ड वाजवायला घेतले. १० वर्षे रहमान त्यांच्याकडे उमेदवारी करता करता स्वत: घडत होता आणि मग त्याला संधी मिळाली मणिरत्नमच्या ‘रोजा’च्या रूपाने. नंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. इलया राजांनी आपल्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत आजवर सहा भाषांतून सुमारे ४००० गाण्यांना संगीत दिले आहे. तीन राष्ट्रीय पुरस्कार (सागरसंगमम-१९८४, सिंधुभैरवी-१९८६, रुद्रवीणा-१९८९) त्यांच्या नावावर आहेत. (रहमानच्या नावावर आजवर चार राष्ट्रीय पुरस्कार जमा झाले आहेत.) इलयांचे ‘अंजली’, ‘नायकन’ आणि ‘हे राम’ ऑस्करची वारी करून आले आहेत. (रहमान दोन ऑस्कर जिंकून आला आहे. शिवाय बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब.) २००५च्या गोल्डन रेमीसहित इलयांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान लाभले आहेत. चेन्नईकर चाहत्यांच्या मनात तुलना होऊ लागली, ‘रहमान मोझार्ट तर इलया राजा बाख’ असे बोलले जाऊ लागले असेल तर ते साहजिकच म्हटले पाहिजे. पण त्याबरोबरच इलया हे रहमानचे पूर्वसूरी होत, त्यांनी उभारलेल्या पायावरच रहमानचा कळस झळकतो आहे हे विसरू नये.