Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

वर्धा शहरात निघालेला ‘सिटू’ संघटनेचा मोर्चा.

अमरावतीत चोरटय़ांचा धुमाकूळ
अमरावती, १ मार्च/ प्रतिनिधी

अज्ञात चोरटय़ांनी एकाच रात्री चार घरांमध्ये प्रवेश करून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या घटनेने शहरातील कंवर नगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिगाव प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाच्या मागणीसाठी आज उपोषण
मलकापूर, १ मार्च / वार्ताहर

‘आधी पुनर्वसन नंतरच धरण’ या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात येत्या ३ मार्च ला जिगाव प्रकल्पाच्या भिंतीवरच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिल आहे.
नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाचे काम पुनर्वसन न करता सुरू करण्यात आले आहे.

बारा दिवसाआड पाणीपुरवठा
बुलढाणा, १ मार्च / प्रतिनिधी

सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या देऊळगावराजाच्या संजयनगर भागात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची वानवा आहे.

डाळिंबांच्या उत्पादन तंत्रावर कार्यशाळा
पुसद, १ मार्च / वार्ताहर

येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात ‘डाळिंबाच्या उत्पादनात तंत्रज्ञानाचा उपयोग’ या विषयावर नुकतीच कार्यशाळा झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे पालकमंत्री मनोहर नाईक होते. अध्यक्षस्थानी राज्य फलोत्पादन संचालक पांडुरंग वाठारकर होते.

लेमदेव पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबीर
कुही, १ मार्च / वार्ताहर

लेमदेव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे झालेल्या रक्तदान शिबिराचे ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे मार्गदर्शक संचालक डॉ. सूर्यभान गायधनी, अध्यक्ष आशा गायधनी, डॉ. भाऊराव डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश तितरमारे यांनी केले. दरवर्षी हा कार्यक्रम नेमाने घेण्यात येतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन प्रा. प्रकाश कटमुसळे यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त संक्रमण विभागाच्या चमूने रक्तदानाचे कार्य पार पाडले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिलीप गंथाळे, प्रा. एन.डी. जाधव, डॉ. अभय मुदगल, प्रा. तीर्थराज कापगते, प्रा. ए.पी. जाधव, विजय राघोर्ते यांनी सहकार्य केले.

‘मंदीभत्ता’ देण्याच्या मागणीसाठी ‘सिटू’चा मोर्चा
वर्धा, १ मार्च / प्रतिनिधी

जागतिक मंदीमुळे कामगार-कर्मचाऱ्यांची कपात झाल्यास त्यांना ‘मंदीभत्ता’ देण्याच्या मागणीसाठी माकपप्रणित ‘सिटू’ या कामगार संघटनेने येथे मोर्चा काढला. कपात झालेल्या कामगारांना एक हजार रुपये मासिक मंदीभत्ता द्यावा तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘पॅकेज’ लागू करावे, अशी मागणी ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष यशवंत झाडे यांनी केली. राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा शहरातही लागू करावा, अंगणवाडी कर्मचारी तसेच अंशकालीन स्त्री परिचरांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, ‘नोबल’ कारखाना त्वरित सुरू व्हावा, असंघटित घरकामगार कल्याण विधेयकातील कामाचे तास, विमा, सेवाशर्ती व वेतनादी तरतुदींची तात्काळ अंमलबजावणी करावी, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, आदी अन्य मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व प्रभा घंगारे, सीताराम लोहकरे, निर्मला वाघ, सुनीता ढवळे, भैया देशकर, महेश दुबे, मारोतराव तलमले, चंद्रभान नाखले, रेखा झाडे, चुडामण घवघवे यांनी केले.

शासकीय कार्यक्रमात नाना पटोलेंना टाळले
भंडारा, १ मार्च / वार्ताहर

शासकीय कार्यक्रमात जाणीवपूर्वक आमदार नाना पटोले यांना टाळण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेचा संग्राम परिषदेने निषेध केला आहे. गेल्या २२ फेब्रुवारीला करचखेडा उपसासिंचन योजनेचा शासकीय कार्यक्रम झाला. साहजिकच सरकारमधील मुख्य पक्षाच्या जिल्ह्य़ातील आमदाराला कार्यक्रमाला बोलावणे अपेक्षित होते परंतु, आमदार नाना पटोले यांचे नावसुद्धा पत्रिकेत टाकण्यात आले नाही. हा प्रकार हेतुपुरस्सर असल्यामुळे छावा संग्राम परिषदेने निषेध केला. पूर्व विदर्भातील शेतकरी तसेच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आमदार नाना पटोले यांनी वेळोवेळी आवाज उठवला, प्रसंगी आमदारकीचा राजीनामाही दिला. आमदार पटोले यांच्या अपमानास जबाबदार शासकीय कर्मचाऱ्यांवर ताबडतोब कार्यवाही व्हावी, अशी मागणी ‘छावा’चे जिल्हाध्यक्ष मंगेश वंजारी, प्रमोद मानापुरे, राजेश तलमले, मकसूद पटेल यांनी केली आहे.

कुंडलिनीच्या साधनेने चित्तशुद्धी -घोंगे
वर्धा, १ मार्च / वार्ताहर

कुंडलिनीच्या साधनेने साधकाची चित्तशुद्धी व शरीर शुद्धी होण्यास मोलाची मदत होते, असा उपदेश मुक्तेश्वरी गुरूपीठाचे घोंगे महाराज यांनी केले. महाशिवरात्री निमित्त झालेल्या कुंडलिनी महायोग ध्यानसाधनेच्या शिबिरास राज्यातून १५ हजारांवर साधक उपस्थित होते. शिबिरात अतिसूक्ष्म ध्यानसाधना मौन साधना, ब्रह्म साधना, गुरूगीता, शिवमहिमा पठण, नामसंकीर्तन व महासत्संगाचा आदी कार्यक्रम झाला. कुंडलिनीचे गाढे अभ्यासक डॉ. मुकुंद पांडे (पुणे) व डॉ. सुरेश जिचकार (नागपूर) यांनी विज्ञान व आध्यात्माची सांगड घालण्याचा सल्ला यावेळी साधकांना दिला. डॉ. ऐश्वर्या रेवतकर यांनीही यावेळी मत व्यक्त केले. याप्रसंगी विशेष सेवाकार्याबद्दल पुरुषोत्तम भोयर यांचा गौरव करण्यात आला. साधकांनी तीन दिवसांच्या शिबिरात साधक निवास, प्रथमोपचार केंद्र व निसर्ग सानिध्याचा लाभ घेतला.

सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण
कारंजा (घाडगे), १ मार्च / वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३७९ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेतील विजेत्यांना साईश्रद्धा सभागृहात नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले.
जिजाऊ व शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. राजकीय, सामाजिक, आर्थिक समानता प्रस्थापित करून, शोषितांना न्याय व हक्क मिळवून देणे यासाठी महाराजांनी संघर्ष केला, असे प्रतिपादन प्रा. जी.के. बरडे यांनी याप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी सुभाष अंधारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर वसू, वसंत राठोड, गोपाळ घाडगे, मेघराज चौधरी, अरविंद चरडे, गजानन ढोले, डॉ. नरसिंग उपस्थित होते. शिवचरित्रावर आधारित चित्रकला प्रदर्शनात ११० जणांनी भाग घेतला. त्यातील ६ विजेत्यांना बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.

दुकान निरीक्षकाने केली मेहकरात दंडात्मक कारवाई
मेहकर, १ मार्च / वार्ताहर

मेहकर शहरामधील विविध दुकानांवर कारवाई करण्यात आली. ३५ ते ३० दुकानदारांवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. कामगार सेनेच्या वतीने तालुका प्रमुख डॉ. संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. शुक्रवारला साप्ताहिक सुटी देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली होती. यावेळी कामगार सेनेचे राजू बाजड, विजय इंगळे, गजानन देशमाने, किशोर इंगळे, दीपक गायकवाड, जीवन शर्मा, शिवानी क्षीरसागर, किरण मेहकरकर यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्ते हजर होते. त्यानंतर मेहकर दुकान निरीक्षक काकडे यांना त्यांच्या कार्यालयात सुद्धा कामगार सेनेने निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेऊन दुकान निरीक्षक काकडे यांनी पालिका हद्दीतील सुमारे २५ ते ३० दुकानांवर कारवाई केली व त्यांच्यावर दंड आकारला.

सिमेंट रस्त्याची वर्षभरातच दुर्दशा
कुही, १ मार्च / वार्ताहर

येथील वॉर्ड क्र. १ मधील यशवंत ग्राम समृद्धी योजनेंतर्गत काम पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्याची एक वर्षांतच दुर्दशा झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यशवंत ग्राम समृद्धी योजनेंतर्गत कुही ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्र. १ मधील भांडारकर यांच्या घरापासून डॉ. मोहरे यांच्या घरापर्यंतचा सिमेंट रस्ता बांधकामासाठी गेल्यावर्षी घेण्यात आला. एक लाख ५० हजार रुपये खर्चाचा हा रस्ता कमी बांधकाम साहित्याचा वापर करून बांधण्यात आला. सिमेंटचा पक्का रस्ता तर तयार झाला परंतु, अवघ्या सहा महिन्यातच सिमेंट उखडायला लागले. सद्यस्थितीत हा रस्ता जागोजागी उखडला असून जाणाऱ्या-येणाऱ्यांना तसेच वाहनांना भंयकर त्रास व्हायला लागला आहे. सध्याची रस्त्याची हालत पाहून वॉर्ड क्र. १ मधील नागरिक अचंबित आणि संतप्त झाले आहेत. रस्त्याच्या कामात कमी साहित्य वापरून कसेबसे बांधकाम करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

अनुसूचित जाती कल्याण समिती आजपासून यवतमाळ जिल्ह्य़ात
यवतमाळ, १ मार्च/ वार्ताहर

महाराष्ट्र विधान मंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती सोमवार, २ मार्च ला यवतमाळ जिल्ह्य़ाचा दौऱ्यावर येत आहे. पंधरा सदस्यांची ही समिती असून सचिवालयातील नऊ अधिकारी कर्मचारीही या दौऱ्यात सहभागी आहेत. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असा तीन दिवसांचा समितीचा दौरा असून एस.टी. महामंडळ, वीज वितरण कं. एकात्मिक विकास प्रकल्प, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी इत्यादींच्या भेटी ही समिती घेणार आहे. बुधवारी ४ मार्च ला यवतमाळात बचत भवनात आढावा बैठक घेणार आहे.

वाशीमचे जिल्हाधिकारी उदय राठोड रुजू
वाशीम, १ मार्च/ वार्ताहर

वाशीम जिल्हाधिकारी बी.आर. पोखरकर सेवानिवृत्त झाल्याने नवीन जिल्हाधिकारी म्हणून उदय राठोड यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. उदय राठोड हे यवतमाळ जिल्ह्य़ाचे रहिवाशी असून १९८२ पासून त्यांनी उपविभागीय अधिकारी पदावर खामगाव, बाळापूर, बुलढाणा येथे तर अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बुलढाणा, गडचिरोली, अमरावती येथे काम केले असून १९९६ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत निवड होऊन अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर होते.