Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

विविध

महिला विधेयक संमत न झाल्याची सोमनाथबाबूंना खंत
नवी दिल्ली, १ मार्च/पी.टी.आय.

आपल्या लोकसभा अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत महिला आरक्षण विधेयक संमत करून घेऊ न शकल्याबद्दल सोमनाथ चटर्जी यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या ८६ व्या पदवीदान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सोमनाथबाबूंनी तेथे भाषण करताना ही खंत जाहीररीत्या व्यक्त केली. लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्य विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याची खास तरतूद या महिला विधेयकात असून मात्र ते संमत होण्यात खूप अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या कार्यकालात आपण ते संमत करून घेऊ न शकल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारतामध्ये एक अब्ज लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या महिलांची आहे व त्यांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे. महिलांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती होणे अत्यावश्यक आहे व त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असेही सोमनाथदा म्हणाले. या पदवीदान सोहळ्यात एकूण ३५० जणांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान, राजकीय यंत्रणेचे गुन्हेगारीकरण होत असून हे खास करून थांबले पाहिजे, असे मत सोमनाथबाबूंनी व्यक्त केले आहे. राजकीय व्यवस्थेच्या वाढत्या गुन्हेगारीकरणाने आपण खूप चिंताग्रस्त आहोत, असेही ते म्हणाले.

इराकमधील सैन्य मार्चअखेरपासून ब्रिटन मागे घेणार
लंडन, १ मार्च/पी.टी.आय.

ब्रिटन या महिन्याअखेरपासून आपले सैन्य इराकमधून काढण्यास सुरुवात करणार असून, जुलैअखेपर्यंत इराकमध्ये असलेल्या ४,१०० ब्रिटिश सैनिकांच्या सर्व तुकडय़ा मायदेशी परतलेल्या असतील, असे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्डिड मिलिबन्ड यांनी आज स्पष्ट केले. इराकमधील बसरा शहराला आज दिलेल्या भेटीत मिलिबन्ड बोलत होते. त्यांनी सांगितले, की ३१ मार्चपासून ब्रिटिश सैन्य इराकमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होईल. सैन्य परत घेण्याची घोषणा ब्रिटनने आधीच केली होती; मात्र त्याची तारीख अद्याप गुलदस्त्यात ठेवली होती. आज इराक भेटीत मिलिबन्ड यांनी त्याबाबत अधिक माहिती उघड केली. दहशतवाद्यांकडून अफगाणिस्तानच्या सीमेलगतच्या भागातून घुसखोरी करत ब्रिटिश फौजांना लक्ष्य करणाऱ्या अल् काईदाच्या दहशतवाद्यांना रोखून धरण्यास, या पूर्वीच पाकिस्तानला बजावण्यात आले होते, मात्र त्याचा कोणताही फायदा होत नसल्यामुळे सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे ते संडे टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
पश्चिम आघाडीवर दहशतवाद्यांशी मुकाबला करणे सर्वात मोठे आव्हान आहे. ९५, ००० इतक्या मोठय़ा संख्येने ब्रिटिश सैन्य इराकमध्ये तैनात आहे. अनेक सैनिकांना येथील विविध मोहिमांमध्ये प्राण गमवावे लागले आहेत. अफगाणिस्तानात शांतता हवी असल्यास, पाकिस्तानात आधी स्थैर्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

चीनचे ‘लूनार प्रोब’ चंद्रावर
बीजिंग, १ मार्च/पीटीआय

चंद्रावर २०२० सालापर्यंत यंत्रमानव अंतराळवीर धाडण्याची चीनची योजना आहे. त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या चीनचा पहिले लूनार प्रोब आज चंद्रावर डेरेदाखल झाले. अशा रितीने यशस्वी चांद्रमोहिम राबविणाऱ्या अमेरिका, रशिया, भारत या देशांमध्ये आता चीनचाही समावेश झाला आहे. चंद्रावर डेरेदाखल झालेल्या चीनच्या या लूनार प्रोबचे नाव चॅंग-१ असे आहे. यासंदर्भात चीनच्या राष्ट्रीय संरक्षणविषयक विज्ञान, तंत्रज्ञान व उद्योग खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, २०२० सालापर्यंत चंद्रावर यंत्रमानव अंतराळवीर धाडण्याच्या महत्वाकांक्षी योजनेच्या दृष्टीने आम्ही चँग-१ हे लूनार प्रोब चंद्रावर उतरवून मोठा टप्पा गाठला आहे. चँग-१ हा लूनार प्रोब २००७ साली चीनने अवकाशात प्रक्षेपित केला होता. हे लूनार प्रोब गेली १६ महिने चंद्राभोवती भ्रमण करीत होते. चीन आपली चांद्रमोहिम तीन टप्प्यांत राबविणार आहे.

माहिती उपसंचालक कुळमेथे यांचा अपघाती मृत्यू
नागपूर, १ मार्च/ प्रतिनिधी

महिती व जनसंपर्क मंत्रालयातील उपसंचालक (वृत्त) मारुती कुळमेथे यांचे रविवारी वर्धा मार्गावरील वडगाव येथे अपघाती निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. बुटीबोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळझरपासून १० किलोमीटर अंतरावर वडगावजवळ विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. कुळमेथे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. कोळशाचा चुरा भरलेल्या ट्रकची धडक एवढी जबरदस्त होती की काही अंतर कार मागे घासत गेली. या अपघातात मारुती कुळमेथे जागीच ठार झाले. जोरदार आवाज झाल्याने तेथे नागरिकांची गर्दी झाली. कारचा चुराडा झाला. त्यात कुळमेथे फसले होते.मुळचे यवतमाळ जिल्ह्य़ातील मारेगाव तालुक्यातील एका लहानशा गावातून आलेले मारुती कुळमेथे सुरुवातीला आकाशवाणीत निवेदक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते कार्यक्रम अधिकारी झाले. दूरदर्शनमध्येही त्यांनी कार्यक्रम अधिकारी या पदावर काम पाहिले. त्यानंतर राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागात रुजू झाले. अतिशय गरिबीतून पुढे आलेले मारुती कुळमेथे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वपरिचित होते.