Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

उदयनराजे भोसले पवारांच्या संपर्कात
दिनकर झिंब्रे, सातारा, २ मार्च

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पिताजी आनंदराव चव्हाण व आई प्रेमलाकाकी यांच्या घराण्याने दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलेला कराड लोकसभा मतदारसंघ रद्द झाला आहे. आता एकमेव असलेल्या सातारा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे. पुनर्रचनेत पूर्वीच्या सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, तर कराड लोकसभेचे प्रतिनिधित्व माजी सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील करीत आहेत.

फटका आचारसंहितेचा
सांगली महापालिकेचे अंदाजपत्रक कचाटय़ात

सांगली, २ मार्च / प्रतिनिधी

सांगली महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात सुधारणा करीत स्थायी समितीने सन २००९-१० या आर्थिक वर्षांसाठी १५६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला सोमवारी मंजुरी देत महासभेकडे पाठविले. पण ऐनवेळी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने हे अंदाजपत्रक आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडले आहे.

फटका आचारसंहितेचा
कोल्हापुरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या शुभारंभावर पाणी

कोल्हापूर, २ मार्च / विशेष प्रतिनिधी

प्रकल्पाच्या मंजुरीसाठी नेत्यांची तंबी आणि नगरसेवकांचे रुसवे फुगवे, मंजुरीच्या ठरावासाठी आक्षेपार्ह दिरंगाई आणि विकासकाबरोबर केलेल्या करारानंतर स्वयंसेवी संस्थांचे आक्षेप अशा अनेक घटनांच्या साक्षीदार बनलेल्या कोल्हापूर शहरातील २२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला अखेर शुभारंभाच्या कार्यक्रमातही आचारसंहितेचा फटका बसला.

अंगणवाडीतील आहारातून ४१ बालकांना विषबाधा
सातारा, २ मार्च/प्रतिनिधी

कराड तालुक्याच्या दक्षिण विभागात असलेल्या धोंडेवाडी (काले) येथील अंगणवाडी क्र.६२ मधील ४१ बालकांना आहारातून विषबाधा झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. विषबाधा झालेल्या ४१ बालकांपैकी ८ बालकांवर कराड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित बालकांवर काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती पालकांनी दिली.याबाबत घटनास्थळ आणि वैद्यकीय सूत्राकडून मिळालेली माहिती अशी, की धोंडेवाडी येथील अंगणवाडी क्र.६२ मध्ये एकूण पटसंख्या ५० इतकी आहे. त्यापैकी सोमवारी ४१ बालकांची उपस्थिती होती.

पिचड यांच्या मुलाच्या यंत्रमाग इमारतीस सील
इचलकरंजी, २ मार्च/वार्ताहर

माजी मंत्री मधुकर पिचड यांचा मुलगा व नातेवाइकांच्या सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी इचलकरंजी अर्बन सहकारी बँकेने सोमवारी स्वयंचलित यंत्रमाग व इमारतीस सील ठोकले. बहुचर्चित खंजिरे कुटुंबीयांवर केलेल्या कारवाईनंतर व्यवस्थापनाने हे धाडसी पाऊल उचलले आहे. पिचड यांचा मुलगा व अन्य नातेवाइकांनी गंगानगर भागामध्ये स्वयंचलित यंत्रमाग सुरू केले आहेत. त्यासाठी इचलकरंजी अर्बन सहकारी बँकेकडून ११ खात्यांवर सुमारे साडेचार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. सन २००४ मध्ये घेतलेले कर्ज थकल्याने बँकेने वसुलीसाठी तगादा लावला होता. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने बँक प्रशासनाने सोमवारी कडक कारवाई करण्याच्या निर्धाराने पावले टाकली.

मजलेकर प्रॅक्टिसिंग स्कूलचे स्नेहसंमेलन
सांगली, २ मार्च / प्रतिनिधी

स्वर्गीय श्रीमतीबाई सातगोंडा पाटील-मजलेकर प्रॅक्टिसिंग स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विटा पंचायत समितीचे माजी गटशिक्षणाधिकारी व्ही. डी. चौगुले होते. इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागतगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुनील परमाज यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन या विद्यार्थ्यांवर या वयातच चांगले संस्कार केले पाहिजेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कथेवर आधारित काही संस्कारकथा व साने गुरुजी यांच्या गोष्टी सांगून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळ व विविध स्पर्धात उत्साहाने भाग घ्यावा, असे आवाहन सुनील परमाज व व्ही. डी. चौगुले यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना सुनील परमाज व व्ही. डी. चौगुले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. श्रीमती सत्त्वशीला बिरनाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक एस. बी. चौगुले यांनी अहवाल वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. नरदे व स्मिता उपाध्ये यांनी केले.

घरगडय़ाने वृद्धेचे दागिने लुबाडले
इचलकरंजी, २ मार्च/वार्ताहर

वृद्धेचे हातपाय बांधून घरगडय़ाने दागिन्यांसह २५ हजारांचा ऐवज लांबवण्याची घटना धान्यओळ भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी विजय मंडल (रा.इंटरही बिहार) या कामगारावर गुन्हा दाखल केला असून, तो फरारी आहे. येथील गिरनार अपार्टमेंटमध्ये प्रकाश वासुदेव सराफ (वय ४०) राहतात. सोमवारी सराफ कुटुंबीय बाहेर कामानिमित्त गेले होते. सदनिकेमध्ये त्यांची आई सुशीला वासुदेव सराफ (वय ७०) एकटय़ाच होत्या.

सातारा मतदारसंघात साडेपंधरा लाख मतदार
सातारा, २ मार्च/प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रासह सातारा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदानाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मतदारांची संख्या १५ लाख ५४ हजार ५३२ एवढी असून, २०८६ मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली. सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड (उत्तर), कराड (दक्षिण), पाटण व सातारा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

सोलापूर पालिका प्रभाग समित्यांवर काँग्रेस आघाडीचे निर्विवाद वर्चस्व
सोलापूर, २ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेच्या विविध प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १८ जागा काँग्रेस आघाडीने जिंकल्या. काँग्रेसला १५ तर राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या. भाजप-सेना युतीला एकही जागा मिळवता आली नाही. मंगळवारी दुपारी या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. महापालिकेतील ९८ नगरसेवकांना एकूण सहा प्रभाग समित्यांच्या या निवडणुकीसाठी मतदान करायचे होते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे- प्रभाग समिती क्र.१- प्रमोद मोकाशी, अनिल गवळी, शिरीष चव्हाण (तिघे काँग्रेस), प्रभाग समिती क्र.२- सुधाकर जाधव, राजीव क्षीरसागर, कल्पना तुपसमुद्रे (तिघे काँग्रेस), प्रभाग समिती क्र.३ - अमित श्रीराम, गुलाम शेख (दोघे काँग्रेस), गोवर्धन श्रीराम (राष्ट्रवादी), प्रभाग समिती क्र.४- खाजा शेख, मोहन सचदेव, प्रमिला तुपलवंडे (तिघे काँग्रेस), प्रभाग क्र.५- उज्ज्वला ढेकळे, कुमार गौरव चंदनशिवे (दोघे काँग्रेस),भीम किल्लेदार (राष्ट्रवादी) आणि प्रभाग क्र.६- बजरंग घुले, हाजी बाबुलाल शेख (दोघे काँग्रेस) व सिकंदर गोलंदाज (राष्ट्रवादी).