Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९

इंडियन पोलिटिकल लीग
सत्तेच्या सारिपाटाचा डाव मांडताना या मेजाभोवती गोळा झालेले सारे समान असतात. इंडियन पोलिटिकल लीगचा या मेजाभोवती सुरू होणारा खेळ रंगतो तो फक्त खुर्चीसाठी. बघता बघता या खेळातील रंगत, चुरस वाढत जाईल. उत्कंठा शिगेला पोहोचेल. स्वप्नांना, आकांक्षांना धुमारे फुटतील. कुरघोडीची परिसीमा होईल. दोन घडीच्या या खेळाच्या निकालाचे भवितव्य मतपेटीतून बाहेर पडल्यावर सत्तेची चाहुल लागलेले पुन्हा असेच मेजाभोवती जमतील तेव्हा प्रतीक्षा असेल ती फक्त खुर्चीची, तिच्या मालकीची, लोकशाहीने बहाल केलेल्या विश्वस्तपदाची.
चला, खेळ मांडियेला आहे..!

बिगुल वाजले
१६ एप्रिल ते १३ मे दरम्यान पाच टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीची घोषणा
नवी दिल्ली, २ मार्च/खास प्रतिनिधी
पंधराव्या लोकसभेतील ५४३ जागांसाठी येत्या १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आज दुपारी येथील निर्वाचन सदनात मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी सहकारी निवडणूक आयुक्त नवीन चावला आणि डॉ. एस. वाय कुरेशी यांच्या उपस्थितीत साऱ्या देशाचे लक्ष लागले असलेल्या पंधराव्या लोकसभा निवडणुकांच्या तसेच आंध्र प्रदेश, ओरिसा व सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या घोषणेसोबतच संपूर्ण देशात आदर्श निवडणूक आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

लोकसभा निवडणूक २००९
एकूण जागा : ५४३
पुनर्रचित मतदारसंघांची संख्या : ४९९
एकूण मतदार : ७१ कोटी ४० लाख
एकूण मतदानकेंद्रे : ८ लाख २८ हजार ८०४
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सची आवश्यकता : सुमारे ११ लाख
तयार मतदार फोटो ओळखपत्रे : ८२ टक्के
विविध टप्प्यांमध्ये असे होणार मतदान
पाच टप्प्यांमध्ये मतदान : २ राज्ये
उत्तर प्रदेश : एकूण ८० जागा (अनुक्रमे १६, १७, १५, १८ व १४ जागा), जम्मू आणि काश्मीर : एकूण सहा जागा(पहिल्या चार टप्प्यांमध्ये प्रत्येकी एक आणि अंतिम टप्प्यात दोन जागा).
चार टप्प्यांमध्ये मतदान : बिहार
बिहार : एकूण ४० जागा (अनुक्रमे १३, १३, ११ व ३ जागा).
तीन टप्प्यांमध्ये मतदान : महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल
महाराष्ट्र : एकूण ४८ जागा (अनुक्रमे १३, २५ व १० जागा), पश्चिम बंगाल : एकूण ४२ जागा (अनुक्रमे १४, १७ आणि ११ जागा).
दोन टप्प्यांमध्ये मतदान : आंध्र प्रदेश, आसाम, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओरिसा आणि पंजाब
आंध्र प्रदेश : एकूण ४२ जागा (अनुक्रमे २२ आणि २० जागा), आसाम : एकूण १४ जागा (अनुक्रमे ३ आणि ११ जागाी), झारखंड : एकूण १४ जागा (अनुक्रमे ६ आणि ८ जागा), मध्य प्रदेश : एकूण २९ जागा (अनुक्रमे १३ आणि १६ जागा), कर्नाटक : एकूण २८ जागा (अनुक्रमे १७ आणि ११ जागा), ओरिसा : एकूण २१ जागा (अनुक्रमे १० आणि ११ जागा), पंजाब : एकूण १३ जागा (अनुक्रमे ४ आणि ९ जागा), झारखंड : एकूण २ जागा (प्रत्येकी १ जागा).
एका टप्प्यामध्ये मतदान : उर्वरित १५ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश

राज्यातील निवडणूक तीन टप्प्यांमध्ये
नवी दिल्ली, २ मार्च/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. यंदा १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात संपूर्ण विदर्भ व मराठवाडय़ातील तीन मतदारसंघ अशा १३ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. २३ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ातील ६ मतदारसंघ आणि कोकणातील २ अशा २५ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात मुंबईच्या सर्व सहा आणि कोकणातील ४, अशा १० मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

सोयरिक
नवी दिल्ली, २ मार्च / वृत्तसंस्था

लोकसभेच्या पाच टप्प्यांमधील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून होते न होतेच तोच राजकीय पक्ष नेत्यांनी त्यात यश मिळविण्याच्या उद्देशाने आपली सोयरिक निर्माण करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले. सोयरिक निर्माण करण्यात भाजपा व काँग्रेसचे नेते गुंतले असताना बसपाच्या नेत्या मायावती यांनी खास स्लोगनची निर्मिती करून दिल्लीवर बसपाचा हत्ती विराजमान करण्याचा संकल्प सोडला आहे.

जयदेव ठाकरे, सरनाईक यांचे येऊरमधील अनधिकृत बंगले जमीनदोस्त
ठाणे, २ मार्च/प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे, शिवसेना सहसंपर्क नेते प्रताप सरनाईक यांचे येऊरमधील आदिवासींच्या जमिनीवरील अनधिकृत बंगले ठाणे महापालिकेने जमीनदोस्त केले. आतापर्यंत १९ पैकी १७ बंगल्यांवर हातोडा मारण्यात आला आहे. उर्वरित दोन बंगल्यांवर हातोडा मारल्यानंतर ती जमीन आदिवासींच्या ताब्यात दिली जाईल. गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत आणि कारवाईच्या प्रतीक्षेत असलेल्या येऊरच्या बंगल्यांवर कारवाई झाल्याने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

‘इशारों पे इशारे’ देत पवारांचे काँग्रेसवर दबावाचे राजकारण !
मुंबई, २ मार्च / खास प्रतिनिधी

जागावाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याकरिताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ‘इशारों पे इशारे’ देत काँग्रेसवर दबाव आणण्याचे राजकारण सुरू केले आहे. पवार आक्रमक झाले असले तरी काँग्रेसचे नेतृत्व पवारांच्या दबावापुढे झुकण्याची लक्षणे दिसत नाहीत. विशेषत: राष्ट्रीय पातळीवर आघाडी न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार काँग्रेसकडून होण्याची शक्यता कमीच असल्याचे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जात आहे.

नवापूरजवळ जीप अपघातात सात विद्यार्थ्यांसह नऊ ठार
नवापूर, २ मार्च / वार्ताहर

शहरापासून नजीकच असलेल्या रायंगण पुला लगतच्या वळणावरून जीप ५० फूट खोल नदीपात्रात कोसळल्याने चालकासह नऊ जण जागीच ठार झाले. त्यामध्ये सात विद्यार्थ्यांचा समावेश असून हे सगळेजण महाराष्ट्र सीमेलगतच्या गुजरात भागातील आहेत. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा देण्यासाठी हे विद्यार्थी धुळे येथे जात होते. परीक्षेला वेळेवर पोहचता यावे, या उद्देशाने जीप भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटून अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
परीक्षेसाठी हे विद्यार्थी सकाळी जीपमधून धुळ्याकडे निघाले होते. भरधाव वेगात असलेल्या या जीपवरील चालकाचा ताबा येथील रायंगण पुलानजीकच्या वळणावर सुटला व ही जीप सरळ नदी पात्रातील खडकावर आपटली. जवळपास ५० फूट एवढय़ा उंचीवरू न जीप आदळल्याने त्यातील दहापैकी नऊ जण जागीच ठार झाले तर दिनेश गावित, रा. काकसळा, जिल्हा अहवाडांग हा गंभीर जखमी झाला. त्यला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार उच्छल येथील एका संगणक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी एम.एस.सी.आय.टी. परीक्षा देण्यासाठी धुळे येथे जात होते. यात निरव महेश वसावे (२२), नितीन गोबजी वळवी (२२), जगदीश जालमसिंग वसावे (२८), आशिष विष्णू वसावे (२२), प्रफुल्लचंद्र विनायक गावित (१७), जसोदा विजय वळवी (१९), रंजीता गुलाबभाई गावीत (२३) या विद्यार्थ्यांसह एक अनोळखी पुरूष व जीप चालक वसीमभाई मयनोद्दीन कुरेशी (२३) हे जागीच ठार झाले.
दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक केशव पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयास भेट देऊन जखमी दिनेश याच्याशी चर्चा केली. दिनेशच्या म्हणण्यानुसार अपघातातील अनोळखी मृतदेह हा डेव्हीड उर्फ धुलजी या संगणक संस्था चालकाचा आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम
मुंबई, २ मार्च / प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टय़ांऐवजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मतदान घेण्याच्या निर्णयाचा फटका मुंबई विद्यापीठ तसेच संलग्न महाविद्यालयांतील परीक्षांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १६ एप्रिल व ३० एप्रिल या दिवशी विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या तारखांमध्ये विद्यापीठाला बदल करावा लागणार आहे. सुदैवाने दहावी व बारावीच्या परीक्षा निवडणुकांपूर्वीच संपत असल्याने या परीक्षांवर मात्र कोणताही परीणाम होणार नाही. शालेय स्तरांवरील इतर परीक्षाही निवडणुकीपूर्वी पार पडण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकानुसार तृतीय वर्ष कला, एम.ए., तृतीय वर्ष वाणिज्य (बॅकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स), एम.कॉम. इत्यादी अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा निवडणुकांच्या दिवशीच आहेत. याबाबत, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, काही परीक्षांच्या दिवशीच निवडणुका होत असल्यामुळे आम्हाला परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. आम्ही निवडणूक व परीक्षा यांचे वेळापत्रक तपासून सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

 


प्रत्येक शुक्रवारी