Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

महाशिवरात्रीपासून सुरू झालेल्या लातूरमधील श्रीसिद्धेश्वर, रत्नेश्वर देवस्थान यात्रेस दिवसेंदिवस गर्दी होत असून, रात्रीच्या वेळी यात्रा परिसरातील आमचे छायाचित्रकार श्याम भट्टड यांनी टिपलेले छायाचित्र.

काँग्रेसचा शनिवारी महामेळावा
लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळही फोडणार

औरंगाबाद, २ मार्च/खास प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच सत्ताधारी काँग्रेस आपल्या प्रचाराचा नारळ औरंगाबादेत आयोजित जनजागरण महामेळाव्याद्वारे फोडणार आहे. येत्या शनिवारी काँग्रेसचा जनजागरण महामेळावा येथील गरवारे स्टेडियमवर आयोजित केला असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम, शालेय, न्याय व विधीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांना दिली.

लातूरकरांच्या वाटय़ाला मंत्रिपदाची ‘वाटी’!
प्रदीप नणंदकर, लातूर, २ मार्च

अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर विलासराव देशमुखांनी ‘मोठय़ा’ मनाने ‘ताटात काय अन् वाटीत काय. काय फरक पडतो? मुख्यंत्रीपद मराठवाडय़ालाच मिळाले ना,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

शिवसेना-भाजपच्या मतपत्रिका कोऱ्या करा -विलासराव देशमुख
औरंगाबाद, २ मार्च/खास प्रतिनिधी

शिवसेना -भाजप युतीच्या हातात सत्ता होती त्या वेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी काही केले नाही. काँग्रेस-आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. आता ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असे म्हणतात. पण युतीच्याच मतपत्रिका कोऱ्या करा, असे आवाहन राज्याचे प्रचार यंत्रणेचे प्रमुख आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी पिशोर येथे आयोजित शेतकरी व महिला बचत गट मेळाव्यात केले.

सारेच कसे एकजात देखणे!
स्वत:ला उडता येत नसलं तरी माणसाने स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पक्ष्यांकडे बघून विमान तयार केलं. माशांएवढं सफाईने पोहता येत नसलं तरी पाणबुडय़ांचा शोध लावला. लय, वेग यांचं आकर्षण मानवाला निरनिराळ्या शोधांपर्यंत घेऊन गेलं. बर्फावरच्या स्केटिंगचे वेगवेगळे प्रकार पाहताना ही लय आपलं भान हरपून टाकते. बर्फ पडणाऱ्या प्रदेशात हा खेळ जास्त प्रचलित असला तरी हळूहळू इतर भागातही त्याचा प्रसार होत आहे. या बर्फाच्या जमिनीवर पायाला चाकं म्हणजेच स्केट्स (skates) बांधून मनोहारी खेळ सादर करणाऱ्या मुलींना पाहून आपल्याला उडता येत नाही याचं वैषम्य काही प्रमाणात कमी होतं.

नांदेडमध्ये रविवारची रात्र वैऱ्याची
गॅस सिलिंडर स्फोट, दगडफेक, लाठीमार आणि अफवांचे पेव फुटल्याने शहर हादरले

नांदेड, २ मार्च/वार्ताहर

शहराच्या वेगवेगळ्या भागात एकापाठोपाठ झालेले दोन गॅस सिलेंडरचे स्फोट.. शिवाजीनगर परिसरात एका जमावाने केलेली दगडफेक.. पोलिसांनी केलेला लाठीमार.. सिरियल बॉम्ब ब्लास्ट व भूकंपाच्या वाऱ्यासारख्या पसरलेल्या अफवा या पाश्र्वभूमीवर बहुतांश भागातील नागरिकांनी कालची रात्र अक्षरश: जागून काढली. या दोन्ही घटनांत सहा जण जखमी झाले असून या सर्वाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

बीड जिल्ह्य़ातील ११ शिक्षिकांना ‘क्रांतिज्योती’ पुरस्कार जाहीर
बीड, २ मार्च/वार्ताहर

महात्मा ज्योतिबा फुले सेवाभावी संस्थेच्या वतीने ११ शिक्षिकांना क्रांतीज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्याचे लवकरच वितरण होईल, अशी माहिती सतीश शिंदे यांनी दिली. बीड तालुक्यातील खोपटी येथील सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्ह्य़ातील ११ शिक्षकांना क्रांतीज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्याचे वितरण १० मार्चला सावित्रीबाईंच्या स्मृतीदिनी होणार आहे. या पुरस्कारप्राप्त शिक्षिकांमध्ये पद्मजा शरदराव हंगे (बीड), हौसाबाई धोंडीराम बादाडे (गेवराई), शेख साबेराबी युसुफ (पिंपळवाडी), हिरकणी सोपानराव बागडे (वडवणी), मंदा खुशालराव तहकीक (जांब), नंदा बन्सी चौधरी (शिरूर कासार), ज्योत्स्ना प्रल्हादराव कुलकर्णी (माजलगाव), मनीषा उमेशराव वैद्य (अंबाजोगाई), पुष्पा लक्ष्मण लोमटे (कोळीपिंप्री), नंदा पंढरीनाथ फुले (जळगाव, ता. आष्टी) यांचा समावेश असल्याची माहिती संस्थेचे सचिव सतीश शिंदे यांनी दिली.

सोयाबीन अनुदानासाठी मनसेकडून तहसील कार्यालयाला कुलूप
औसा, २ मार्च/वार्ताहर

सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान त्वरित वाटप करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. कृषीमंत्री बाळासाहेब थोरात व प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकले. या प्रकरणी दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदान मिळावे यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रभान जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, उपनगराध्यक्ष अफसर शेख, पंचायत समितीचे सभापती सदाशिव कदम, शिवसेना तालुकाप्रमुख संजय उजळंबे, काँग्रेस महिला अध्यक्ष स्वयंप्रभा पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील मिटकरी, रिपाइंचे एम. के. माने यांनी पाठिंबा दिला आहे.

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत धारूरच्या ‘दिव्य’ एकांकिकेस द्वितीय पारितोषिक
धारूर, २ मार्च/वार्ताहर

नागपूर महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा नागपूरच्या सांस्कृतिक सभागृहात झाल्या. या स्पर्धेत सनी कलामंच, धारूरच्या वतीने गजानन कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित ‘दिव्य’ ही एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकेतील मोहनच्या भूमिकेसाठी शैलेस कोर्डे यास अभिनयाचे द्वितीय व स्मिताच्या भूमिकेसाठी श्वेता पत्कीस तृतीय पारितोषिक मिळाले. गजानन कुलकर्णी यांना दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक मिळाले. ‘दिव्य’ या एकांकिकेस सांघिक १५ हजारांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध सिनेनाटय़ अभिनेते डॉ. गिरीष ओक यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमोद भुसारी, आमदार देवेंद्र फळणवीस, कार्यवाह किशोर आयलवार, संदीप जोशी उपस्थित होते.

मोटारसायकलच्या धडकेत एक जखमी
बोरी, २ मार्च/वार्ताहर

जिंतूर-परभणी रस्त्यावर विजया जीनिंगजवळ एका पादचाऱ्यास मोटारसायकलची धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. करवली येथील प्रकाश बबनराव गोरे हे पायी जात असताना एमएच-२२-ई-८६१२ क्रमांकाच्या मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बोरीहून नांदेडला हलविण्यात आले. भरधाव वेगाने व निष्काळजीपणे मोटारसायकल चालविल्याप्रकरणी महंमद आरेफ महंमद सलीम याच्याविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ओंकार गिरी तपास करीत आहेत.

ग्रीन हाऊसमधील फुलाची शेती फायद्याची - बोडके
लातूर, २ मार्च/वार्ताहर

दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र कमी होत आहे तर दुसऱ्या बाजूला खाणारी तोंडे वाढून शेतीवरील भार वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर ग्रीन हाऊसमधील फुलाची शेती फायद्याची आहे, असे प्रतिपादन कृषीतज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांनी केले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आयोजित ग्रीन हाऊसमधील पुष्प लागवड, जोपासना व मार्केटिंग या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य संयोजक विक्रम गोजमगुंडे, जयदीप काळे, भुणेश गरुड, नागनाथ खोबरे आदींची उपस्थिती होती. श्री. बोडके म्हणाले, कमी पाण्यात ग्रीन हाऊसमध्ये शेती करता येते. ही शेती शंभर टक्के नफ्यात असते.

औरंगजेब यांचे नाव रस्त्याला देण्याचा प्रस्ताव स्थगित
औरंगाबाद, २ मार्च/प्रतिनिधी

मदनी चौक ते मध्यवर्ती जकात नाका या रस्त्याला औरंगजेब रहेमतउल्ला यांचे नाव देण्याचा ठराव महापौर विजया रहाटकर यांनी आज स्थगित ठेवला. हा ठराव स्थगित करताना कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. सभेच्या शेवटच्या क्षणी गोंधळ झाला. याच गोंधळात हा ठराव वगळता सर्वच ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. शमशाद बेगम यांनी असा ठराव ठेवला होता. स्थायी समितीचे सभापती अब्दुल साजेद यांचे या ठरावाला अनुमोदन होते. सदस्यांनी सुचविलेल्या ठरावात हा ठराव ४६५ क्रमांकावर होता. प्रारंभीच्या ठरावांवर चर्चा झाली. हा ठराव स्थगित करण्याचे युतीच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविलेले होते. मधल्या काळात गोंधळ सुरु झाल्याने महापौरांनाही आयतीच संधी मिळाली आणि कोणतेही कारण न देता हा ठराव वगळून बाकीचे ठराव संमत झाल्याचे जाहीर करून सभा संपल्याचे सांगण्यात आले.

परीक्षा केंद्रांवर जमावबंदीचा आदेश
औरंगाबाद, २ मार्च/खास प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्य़ात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. येत्या ५ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्र व परिसरात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टिकोनातून परीक्षा केंद्रावर अडथळा येऊ नये म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटपर्यंत झेरॉक्स केंद्र बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. हा आदेश २३ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षेचे केंद्रात प्रवेश करता येणार नाही.

क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचा आज हलगी मोर्चा
नळदुर्ग, २ मार्च/वार्ताहर

मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण मिळावे आणि मातंग आयोगाच्या शिफारशी त्वरित मंजूर कराव्यात आदी मागण्यांसाठी तुळजापूर तालुका क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मंगळवारी (दि.३) तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी दिली. अनुसूचित जातीस महाराष्ट्रात फक्त तेरा टक्के आरक्षण असून ते या प्रवगातील ५९ जातींना एकत्र आहे. त्यामुळे आरक्षणाचा लाभ सर्व जातींना मिळत नसल्याने अनेक जाती या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे. मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी त्वरित मंजूर कराव्यात, बोरगाव येथील दत्तू देडे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची तातडीने चौकशी करून यातील मारेकऱ्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा व खुनाचा गुन्हा दाखल करावा. सामाजिक न्याय हक्कासाठी व झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी या हालगी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष देण्याची गरज - हैबतपुरे
लातूर, २ मार्च/वार्ताहर

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष देण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी हैबतपुरे यांनी केले. जगदीश तावशीकर यांच्या श्यामनगर येथील श्री कोचिंग क्लासेसच्या पालक मेळावा व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. पागे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बस्वराज महाविद्यालयाचे प्रा. साकोळकर, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गिते, दयानंद महाविद्यालयाचे प्रा. माने, सूर्यवंशी उपस्थित होते. सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.श्री. हैबतपुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर शिक्षणाबरोबरच चांगल्या संस्काराची गरज आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत घातले, म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे पालकांनी न करता शिक्षकांच्या संपर्कात राहून पाल्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात व त्याच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.

वाचनालये वाचकाभिमुख हवीत - प्रा. करजकर
लातूर, २ मार्च/वार्ताहर

वाचनसंस्कृती वाढली तर युवकांचे उगारणारे हात उभारणारे होतील. यासाठी ग्रंथालये समृद्ध आणि वाचकाभिमुख झाली पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. विजयकुमार करजकर यांनी केले. मुरूड येथून जवळच असलेल्या करकट्टा येथील जयप्रकाश व्याख्यान-मालेतील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुरूड येथील जनता विद्यामंदिरचे सहशिक्षक अरुण पाटील उपस्थित होते. प्रा. करजकर म्हणाले की, आज ग्रामीण भागातील आचार, विचार, संस्कार श्रेष्ठ आहेत, पण बदलत्या काळात खेडी भकास आणि शहरे झकास झाली आहेत. हे सूत्र दुर्दैवी आहे. हे चित्र बदलण्यासाठी युवकांच्या पुढाकाराची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.दूरदर्शनच्या जमान्यात वाचक व श्रोता टिकविल्याबद्दल करकट्टा येथील जयप्रकाश वाचनालयाचे त्यांनी कौतुक केले. वाचन चळवळच सामान्यांच्या कठीण काळात त्यांचे अश्रू पुसणारे हात तयार करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पळस फुलला,रंग उधळला
उदगीर, २ मार्च/वार्ताहर

शेतातील रब्बी हंगामाची पिके निघू लागली आहे. त्यामुळे शेतात वाढत्या उन्हामुळे रखरख सुरू झाली. तरीही सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे ते पळसाच्या लालबुंद झाडाने. उदगीर तालुका हा बालाघाटाच्या डोंगराळ भागात वसलेला. यामुळे येथे बोर, बाभुळ, लिंबू व पळसाची झाडे मोठय़ा प्रमाणात वाढतात. एरवी पळसाच्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. कारण त्याचे खोड ओबडधोबड असते, आकर्षक नसते. पण त्याच्यावर येणारी लाल-गुलाबी फुले सर्वाना मोहून टाकतात. या झाडांभोवती सध्या मधमाशांनी मोठी गर्दी केली आहे. पानझडतीमुळे बहुतेक सर्व पाने गळून पडली असून झाड फुलांनी सजल्यासारखे दिसतात.

शेतक ऱ्यांनी वायनरी द्राक्ष शेतीकडे वळावे झ्र् काळे
लातूर, २ मार्च/वार्ताहर

वायनरी द्राक्ष शेतीला सरकार प्रोत्साहन देत आहे. ही शेती फायद्याची आहे म्हणून शेतकऱ्यांनी वायनरी द्राक्ष शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन वायनरी द्राक्षतज्ज्ञ जयदीप काळे यांनी केले. श्री सिद्धेश्वर अ‍ॅग्रोटेक २००९ व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत द्राक्ष चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री. काळे म्हणाले, देशात १ लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. वायनरी द्राक्ष शेतीला नाबार्डची मदत मिळत आहे. बँकांकडून कर्ज उपलब्ध होत आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

एमआयटीला संगणकीयदृष्टय़ा परिपूर्ण बनविणार - डॉ. कराड
लातूर, २ मार्च/वार्ताहर

आजच्या संगणक युगातील संधीचे महत्त्व लक्षात घेऊन एमआयटी जनसंवाद महाविद्यालयास संगणकाच्या बाबतीत परिपूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन एमआयटीचे कार्यकारी संचालक डॉ. ह. तु. कराड यांनी केले. कराड म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनातून संधी दिली जाते. विद्यार्थीही आपल्या सांस्कृतिक, सामाजिक घटना प्रसंगाशी निगडीत राहून आपली कला सादर करत असतात. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्रे, पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

व्यापारी संकुलाचे भूमिपूजन
उस्मानाबाद, २ मार्च/वार्ताहर

एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत आरक्षण क्रमांक ७१ व ७२ मधील व्यापारी संकुलाचे भूमिपूजन महसूल- उद्योग राज्यमंत्री राणा जगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जीवनराव गोरे होते. जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, सुनील काकडे, संपतराव डोके आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, संकुलाचे बांधकाम अत्यंत दर्जेदार आणि देखणे झाले पाहिजे. त्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

बिबटय़ाकडून वासरू फस्त
सोयगाव, २ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील नायगाव या जंगलातील गावाजवळ भुकेल्या बिबटय़ाने जनावराच्या गोठय़ातील गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला फस्त केले. वनक्षेत्रपाल पाटील यांनी सांगितले की, बनोटी गावाजवळ भागाजी शेनफडू यांचे शेत आहे. मध्यरात्री जंगलातून आलेल्या बिबटय़ाने ४ वर्षे वयाच्या वासरावर हल्ला करून त्याला जवळच्या शेतात नेऊन फस्त केले. जंगलातील जलसाठा कमी झाल्यामुळे तसेच शिकार न मिळाल्याने बिबटे शिकारीसाठी रात्री भटकंती करून दिसेल त्या जनावरांवर हल्ला करून आपली भूक शमवितात. अजिंठा लेणी, वेताळवाडी परिसर तसेच बनोटी या परिसरात बिबटय़ाचे अस्तित्व असून उन्हाळ्यात हल्ल्याच्या घटना घडतात.

‘डॉ. उगिले यांचे कार्य अतुलनीय’
लातूर, २ मार्च/वार्ताहर

डॉ. प्रदीप उगिले यांचे एड्सविषयक कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन विक्रमी रक्तदाते पारस चापसी यांनी केले. उगिले हॉस्पिटल संशोधन केंद्र व कर्मयोगी मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. प्रदीप उगिले यांच्या ४३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुरेश वाघमारे होते. प्रमुख पाहुणे कवी भारत सातपुते उपस्थित होते. रक्तपेढय़ांनी एड्सबाधितांना अग्रक्रमाने रक्तपुरवठा करावा, असे आवाहन श्री. चापसी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अरुण दैठणकर यांनी केले. या प्रसंगी डॉ. अनिल कुलकर्णी, डॉ. श्याम पाटील, डॉ. वंदना उगिले, चंद्रकांत गुंडरे,आदी उपस्थित होते.