Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बिगुल वाजले
१६ एप्रिल ते १३ मे दरम्यान पाच टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीची घोषणा
नवी दिल्ली, २ मार्च/खास प्रतिनिधी

 

पंधराव्या लोकसभेतील ५४३ जागांसाठी येत्या १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आज दुपारी येथील निर्वाचन सदनात मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी सहकारी निवडणूक आयुक्त नवीन चावला आणि डॉ. एस. वाय कुरेशी यांच्या उपस्थितीत साऱ्या देशाचे लक्ष लागले असलेल्या पंधराव्या लोकसभा निवडणुकांच्या तसेच आंध्र प्रदेश, ओरिसा व सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या घोषणेसोबतच संपूर्ण देशात आदर्श निवडणूक आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. पंधराव्या लोकसभेसाठी भारतातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये येत्या १६, २३, ३० एप्रिल तसेच ७ आणि १३ मे रोजी होणाऱ्या पाच टप्प्यांतील मतदानात ७१ कोटी ४० लाख मतदार ५४३ लोकप्रतिनिधींची निवड करतील. १६ मे रोजी मतमोजणी होऊन पंधराव्या लोकसभेत कोणत्या आघाडीचे सरकार सत्तेवर येणार याचे चित्र स्पष्ट होईल.
आज दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भरगच्च पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांनी लोकसभा निवडणूक वेळापत्रकासोबतच आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाचीही घोषणा केली. याशिवाय झारखंड, कर्नाटक, मिझोराम या राज्यांतील प्रत्येकी एक, तर नागालँडमधील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकाही पार पडणार आहेत. आंध्र प्रदेश आणि ओरिसामध्ये १६ व २३ एप्रिल रोजी लोकसभेबरोबरच दोन टप्प्यांमध्ये विधानसभांसाठीही मतदान होणार आहे, तर सिक्कीममध्ये ३० एप्रिल रोजी लोकसभा व विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी ४० लाख अधिकारी व २१ लाख निमलष्करी दले व होमगार्डस्ची आवश्यकता भासणार असल्याचे गोपालस्वामी यांनी सांगितले. सीमेपलिकडून होणारी घुसखोरी, दहशतवादी व नक्षलवादी हल्ल्यांची शक्यता गृहित धरून या निवडणुकांसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे गोपालस्वामी यांनी सांगितले.
आपले सहकारी आणि भावी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना त्यांच्या पदावरून हटविण्याची गोपालस्वामी यांची शिफारस केंद्र सरकारने फेटाळल्यानंतर आज त्यांनी एकत्रपणे लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. गोपालस्वामी किंवा चावला यांच्यात कुठलाही तणाव यावेळी जाणवत नव्हता. गोपालस्वामी येत्या २० एप्रिल रोजी मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून निवृत्त होत असून त्यांच्या कारकीर्दीत पहिल्या टप्प्यात १६ एप्रिल रोजी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालँड, ओरिसा, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, अंदमान निकोबार, लक्षद्वीप तसेच जम्मू आणि काश्मीरमधील १२४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेणारे नवीन चावला यांच्या नेतृत्वाखाली उरलेल्या चार टप्प्यांतील ४१९ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
२३ एप्रिल रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यांतील १४१ मतदारसंघांमध्ये, ३० एप्रिल रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ११ राज्यांतील १०७ मतदारसंघांमध्ये, ७ मे रोजी ८ राज्यांतील ८५ मतदारसंघांमध्ये तर १३ मे रोजी नऊ राज्यांतील ८६ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या पाच टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर १६ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.
गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांच्या तुलनेत यंदा ४ कोटी ३० लाख नव्या मतदारांची भर पडली असून त्यामुळे देशातील एकूण मतदारांची संख्या ७१ कोटी ४० लाखांवर पोहोचली आहे. अरुणाचल, आसाम, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मणिपूर आणि नागालँड या सहा राज्यांचा अपवाद वगळता सर्वत्र राबविण्यात आलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेनंतर ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ४९९ मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेश व जम्मू आणि काश्मीरमध्ये पाचही टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे, तर बिहारमध्ये चार, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये तीन, आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, ओरिसा आणि पंजाबमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तामिळनाडू, गुजरात, केरळ, राजस्थान, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली या महत्त्वाच्या राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे.
चौदाव्या लोकसभेचा कार्यकाळ १ जून २००९ रोजी संपणार असल्यामुळे घटनात्मक तरतुदींनुसार २ जूनपूर्वी पंधरावी लोकसभा स्थापन होणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्यापूर्वी पूर्ण निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे प्रतिनिधी, राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय गृह सचिव व गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच सुरक्षा दलांच्या आंतरराज्य प्रवासासाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांशी चर्चा केल्याचे गोपालस्वामी यांनी सांगितले. केंद्रीय व राज्य बोर्डांच्या शाळांच्या परीक्षा, एप्रिल व मे महिन्यांतील सण, देशातील काही भागांतील हंगामाचा मोसम, आगामी मान्सूनविषयीचा हवामान खात्याचा अंदाज आदी आवश्यक माहिती घेऊनच निवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्यात आले, अशीही माहिती त्यांनी दिली.