Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘इशारों पे इशारे’ देत पवारांचे काँग्रेसवर दबावाचे राजकारण !
मुंबई, २ मार्च / खास प्रतिनिधी

 

जागावाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याकरिताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ‘इशारों पे इशारे’ देत काँग्रेसवर दबाव आणण्याचे राजकारण सुरू केले आहे. पवार आक्रमक झाले असले तरी काँग्रेसचे नेतृत्व पवारांच्या दबावापुढे झुकण्याची लक्षणे दिसत नाहीत. विशेषत: राष्ट्रीय पातळीवर आघाडी न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार काँग्रेसकडून होण्याची शक्यता कमीच असल्याचे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जात आहे.
काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना गतवेळच्या तुलनेत फारशा जास्त जागा मिळणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी किंवा समाजवादी पक्षासारख्यांनी काँग्रेसवर दबाव वाढवून जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रीय पातळीवर आघाडी न झाल्यास महाराष्ट्रातील मतदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशाराच राष्ट्रवादीने दिला आहे. जागावाटपात काँग्रेसने अडवणूक केल्याने पवार व राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा मिळवून त्या निवडून आणायच्या व निवडणुकीनंतर कोणत्याच आघाडीला २७१ चा जादुई आकडा गाठणे शक्य नसल्यास आपले महत्त्व वाढवायचे हा पवारांचा डाव आहे.
यू.पी.ए. सरकारमध्ये पवारांना चांगले महत्त्व मिळाले होते. पवारांच्या मनाप्रमाणे नवी दिल्ली व महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वोने अनुकूल निर्णय घेत गेले. मात्र या वेळी काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी काहीशी ताठर भूमिका घेतली आहे. काँग्रेस मागे घेण्याच्या तयारीत नसल्यानेच बहुधा पवारांनी काँग्रेसवर दबाव वाढविला आहे. त्यातच राष्ट्रीय पातळीवर आघाडी करून देशात ४० ते ५० जाग लढविण्याची पवारांची योजना होती. नेमकी पवारांची हीच मागणी काँग्रेसने धुडकावून लावली. गेल्या वेळी काँग्रेसने देशभर ४५० पेक्षा जास्त जागा लढविल्या होत्या. मात्र १४५ जागाच जिंकता आल्या. याचाच अर्थ काँग्रेसचे उमेदवार ३५० जागांवर पराभूत झाले होते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता काँग्रेसने मित्र पक्षांना देशभर ५० च्या आसपास जागा सोडल्यास त्याचा आघाडीला फायदाच होईल, असे गणित पवारांनी मांडले आहे. काँग्रेस माघार घेत नसल्याने पवारांची कोंडी झाली आहे.
पवार हे यू.पी.ए. मध्ये राहण्याचा निर्वाळा देतात. यू.पी.ए.मध्ये अन्य कोणालाही पंतप्रधानपदाला वाव नसून डॉ. मनमोहन सिंग हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे काँग्रेसने वारंवार स्पष्ट केले आहे. त्याच वेळी पवार वगळता राष्ट्रवादीच्या साऱ्या नेत्यांनी पवारांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले आहे. एकूणच पवारांचे पंतप्रधानपदाकरिता नाव पुढे करून राज्यात जास्तीत जास्त मते मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.