Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सोयरिक
नवी दिल्ली, २ मार्च / वृत्तसंस्था

 

लोकसभेच्या पाच टप्प्यांमधील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून होते न होतेच तोच राजकीय पक्ष नेत्यांनी त्यात यश मिळविण्याच्या उद्देशाने आपली सोयरिक निर्माण करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले. सोयरिक निर्माण करण्यात भाजपा व काँग्रेसचे नेते गुंतले असताना बसपाच्या नेत्या मायावती यांनी खास स्लोगनची निर्मिती करून दिल्लीवर बसपाचा हत्ती विराजमान करण्याचा संकल्प सोडला आहे. ‘यूपी हुई हमारी, अब है दिल्ली की बारी’ असे बसपातर्फे त्यांनी स्लोगनच तयार केले आहे. दुसऱ्या बाजूने मायावती यांचे कट्टर शत्रू असलेले समाजवादी पार्टीचे मुलायमसिंह यादव काँग्रेस आपल्याला काही नक्की ‘हात’ देईल असे खात्रीपूर्वक सांगत आहेत. उत्तरप्रदेशमधील या राजकीय साठमारीत भाजप आणि रालोआची वाट लागणार असे संकेत राजकीय पंडितांनी द्यायला सुरुवात केल्यानंतर भाजपाने आपल्या रालोआमध्ये भारतीय लोकदलाच्या अजितसिंग यांना ओढून आपलीही सोयरिक भक्कम केली आहे. महाराष्ट्रात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाची शिवसेनेशी असलेली युती अबाधित राहील अशी खात्री दिली आहे. दुसऱ्या बाजूने नॅनोविरोधी आंदोलनात मोठे यश मिळाल्यानंतरही काहीशा धास्तावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची सोयरिकीसाठी काँग्रेस पक्षावरच भिस्त असून त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे मन वळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
कॉँग्रेस आणि भाजपाला पर्याय म्हणून निवडणुकीच्या रणांगणात तिसरी आघाडी उतरत असल्याची घोषणा माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे सर्वेसर्वा देवेगौडा यांनी आज केली.या आघाडीत जनता दलासहित सीपीआय, सीपीएम, फॉरवर्ड ब्लॉक, रिपाइं, तेलुगु देसम पक्ष आणि जयललिता यांच्या अण्णा द्रमुक या पक्षांचा समावेश आहे. या तिसऱ्या आघाडीची अधिकृत स्थापना १२ मार्च रोजी कोलकाता येथे करण्यात येणार आहे.