Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जयदेव ठाकरे, सरनाईक यांचे येऊरमधील अनधिकृत बंगले जमीनदोस्त
ठाणे, २ मार्च/प्रतिनिधी

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे, शिवसेना सहसंपर्क नेते प्रताप सरनाईक यांचे येऊरमधील आदिवासींच्या जमिनीवरील अनधिकृत बंगले ठाणे महापालिकेने जमीनदोस्त केले. आतापर्यंत १९ पैकी १७ बंगल्यांवर हातोडा मारण्यात आला आहे. उर्वरित दोन बंगल्यांवर हातोडा मारल्यानंतर ती जमीन आदिवासींच्या ताब्यात दिली जाईल.
गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत आणि कारवाईच्या प्रतीक्षेत असलेल्या येऊरच्या बंगल्यांवर कारवाई झाल्याने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. २७ फेब्रुवारीला १३ बंगल्यांवर कारवाई झाल्यानंतर सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव व जयश्री प्रताप सरदेसाई यांच्या नावावर असलेल्या बंगल्यावर कारवाई होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात असताना महापालिकेने ही कारवाई केली. १९९१ चौरस फुटांचे पक्के बांधकाम तोडून ती जागा जेठय़ा लखमा मेरे याच्या स्वाधीन केली जाणार आहे, तर ठाण्यातील वजनदार नेते प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर कारवाई सुरू होताच लडकुबाई बेंडू हिंदोळे यांच्या दोन मुलांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. एक भाऊ कारवाईच्या बाजूने, तर दुसरा विरोधात राहिल्याने उशिराने कारवाई करण्यात आली. हे बांधकाम ३८५० चौरस फुटांचे होते. लडकूबाईच्याच जमिनीवर बांधलेला भीमसिंग पवार यांचाही बंगला जमीनदोस्त करण्यात आला. त्याचबरोबर नारायण मेरे या आदिवासीच्या जमिनीवरील परशुराम विचारे यांच्याही २५०० चौरस फूट बांधकाम असलेल्या बंगल्यावर हातोडा मारण्यात आला.
लोकसभा निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना दुसरीकडे पालिकेचे उपायुक्त बी.जे. पवार, तसेच सहाय्यक आयुक्त व अतिक्रमणविरोधी पथकाने ही कारवाई केली. येऊरमधील चंद्रकांत जाधव व इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने ही कारवाई करण्यात आली.