Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

प्रादेशिक

राष्ट्रवादीत अद्यापही आबांची लोकप्रियता तोबा तोबा !
मुंबई, २ मार्च / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान करावे म्हणून पक्षाचे सारे नेते एका सुरात बोलत असले तरी पक्षातील लोकप्रियतेच्या निकषावर मात्र पवारांपेक्षा प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील हेच भारी आहेत, याचे प्रत्यंतर रविवारी नाशिकमधील अधिवेशनात आले. जाहीर सभेत बोलण्यासाठी आर. आर. पाटील यांच्या नावाची घोषणा होताच जवळपास दोन मिनिटे नुसता टाळ्यांचा कडकडाट झाला. तुलनेत पवारांना मिळालेला प्रतिसाद काहीसा थंडच होता.

जागतिक आघाडीच्या रिफायनरीचा मार्ग प्रशस्त- मुकेश अंबानी
रिलायन्स पेट्रोलियमचे ‘रिलायन्स’मधील विलिनीकरण संमत
मुंबई, २ मार्च/व्यापार प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या रिलायन्स पेट्रोलियम या उपकंपनीला सामावून घेण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज येथे झालेल्या बैठकीत संमती दिली. उभय कंपन्यांच्या भागधारकांसाठी मौल्यवान असलेल्या या निर्णयातून जगातील आघाडीची तेलशुद्धीकरण कंपनी बनण्याचा ‘रिलायन्स’चा मार्गही प्रशस्त होईल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या विलिनीकरणाविषयी बोलताना मत व्यक्त केले.

राजकीय पक्षपुस्तिकांचे प्रदर्शन - जनतंत्र २००९
मुंबई २ मार्च / प्रतिनिधी

गेल्या पन्नास वर्षांच्या काळात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, सर्व कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, मनसे अशा राजकीय पक्षांनी लोकप्रबोधनासाठी काढलेल्या पुस्तिका, जाहीरनामे, मासिके व अन्य प्रकाशनांचे आगळे प्रदर्शन दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात येत्या ७ व ८ मार्च रोजी आयोजिण्यात आले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर पालिका कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणा
मुंबई, २ मार्च / प्रतिनिधी

निवडणुकीपुर्वीच मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतनवाढ जाहीर झाल्याने पालिका मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी अक्षरक्ष: दिवाळी साजरी केली. आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी साडेतीन वाजता आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा करण्यापूर्वीच तासभर आधी दुपारी अडीच वाजता पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी वेतनश्रेणी फेररचनेच्या करारावर सहया केल्या. मागील दीड वर्षांपासून वेतनश्रेणीतील फरकाबाबत प्रशासनाशी विविध पालिका कर्मचारी संघटनांच्या चर्चा सुरू होत्या.

मुंबईच्या अनेक भागात छुपी पाणीकपात?
मुंबई, २ मार्च / प्रतिनिधी

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईतील अनेक भागातील नागरिकांना छुप्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. या पाणीकपातीचा मोठा फटका अंधेरी पूर्व, कांदिवली, मरोळ, वांद्रे, दहिसर वासियांना बसत आहे. अनेक ठिकाणी पाणी पुरेशा दाबाने मिळत नसल्याने टँकरने पाणी आणण्याची वेळ आली आहे. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामे, मेट्रोचे काम, भूमिगत जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे.

जागावाटपाच्या चर्चेत राणे आक्रमक;
मुंबईत काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचा दावा
मुंबई, २ मार्च / खास प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागावाटपाच्या तिसऱ्या फेरीतील चर्चेतून आज फारसे काही निष्पन्न झाले नाही. मुंबईतील प्रिया दत्त किंवा मिलिंद देवरा या विद्य्मान खासदार असलेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ मिळावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. उभय पक्ष अद्यापही ताठर भूमिका सोडण्यास तयार नसल्याने तिढा सुटत नसल्याचे कळते. काँग्रेसच्या वतीने जागावाटपासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राणे यांनी काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडली. विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे या दोघांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या वतीने राणे यांनी प्रत्येक जागेवरील दावा-प्रतिदावा चांगल्या पद्धतीने केला. मराठवाडा व मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. परभणीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेसने तयारी दर्शविली. दिंडोरीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा काँग्रेसने अमान्य केला. मुंबईतील एक जागा मिळावी अशी अपेक्षा राष्ट्रवादीने व्यक्त केली. प्रिया दत्त यांच्या उत्तर-मध्य किंवा मिलिंद देवरा खासदार असलेला दक्षिण मुंबई यापैकी एक मतदारसंघ मिळावा असा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. हा राष्ट्रवादीच्या दबावाच्या राजकारणाचा भाग असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत ३०च्या आसपास जागांवर चर्चा झाली असली तरी पाच ते सात जागा वगळता कोठेच मतैक्य झालेले नाही.

ठुमरीवरील पुस्तकाचे आज प्रकाशन
मुंबई, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अंजनी पोहनकर लिखित 'सफर ठुमरी गायकीका' या ठुमरीवरील अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन उद्या मुंबईत होत आहे. अंजनी पोहनकर यांनी अनेक वर्षे ठुमरीवर अभ्यास करून हिंदीमध्ये या पुस्तकाचे लिखाण केले आहे. कें द्र शासनाने ठुमरीवरील संशोधनासाठी विशेष अनुदान दिले होते.वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मंगळवार ३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे व सतार वादक पं. अरविंद तारिक यांच्या हस्ते होत आहे. पुस्तक प्रकाशनानंतर अंजनी पोहनकर यांचा ठुमरी गायनाचा छोटेखानी कार्यक्रम सादर होणार आहे.

पवार यांच्याकडून शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीची विचारपूस
मुंबई, २ मार्च / खास प्रतिनिधी

आपल्यापुढे निवडणूकपुर्व युतीचे कोणतेही पर्याय खुले आहेत, असे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणारे विधान करून काँग्रेसवरील दबाव वाढविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांच्या या भेटीच्या वेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार मनोहर जोशी, संजय राऊत खासदार सुप्रिया सुळे, ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते - पाटील,प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते. पवार यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीबाबत डॉ. पारकर यांच्याशी चर्चा केली.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनीही आज लीलावतीत जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांत व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंम्डे यांनी शिवसेना-भाजप युती अभेद्य राहणार असल्याचा निर्वाळा दिला. जागावाटपावरून युतीत कोणतेही मतभेद होणार नसून दोन दिवसांत आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांची हत्या
मुंबई, २ मार्च / प्रतिनिधी

भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या आठवले गटाच्या यशवंत होटले या कार्यकर्त्यांची आज सायंकाळी भरगर्दीत अज्ञात इसमांनी चॉपरने वार करून निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली का, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांची सभा सायंकाळी दहिसर पूर्वे रेल्वे स्थानकाजवळ आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी हार आणावयास गेलेल्या होटले यांना काही इसमांनी गाठले आणि त्यांच्या मानेवर व छातीवर वार केले. होटले यांना इस्पितळात दाखल करण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हत्येनंतर लगेचच दुकाने बंद करण्यात आली.
होटले हे पूर्वी दहिसर पूर्वेलाच राहत होते. अलीकडेच ते मीरा रोड येथे राहावयास गेले होते. मात्र पक्षाच्या कामासाठी ते दहिसरला येत असत. छोटी बांधकाम कंत्राटे घेणाऱ्या होटले यांची हत्या अंतर्गत वैमनस्यातून झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी दहिसर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती न झाल्याने होटले नाराज होते. त्यातून त्यांची काहीजणांशी बाचाबाचीही झाली होती. त्याचा या हत्या प्रकरणाशी संबंध आहे का, या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.