Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

नव्या लोकसभेला साऱ्याच आघाडय़ांवर वेगळेपण!
महेंद्र कुलकर्णी
नगर, २ मार्च

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर होणारी लोकसभेची पहिलीच निवडणूक मावळत्या लोकसभेपेक्षा सर्वार्थाने वेगळी ठरेल असेच दिसते. जिल्ह्य़ाच्या दृष्टीने हे वेगळेपण सर्वानाच गोंधळात टाकणारे आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या, तरी जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघांतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांबाबत अजून अनिश्चितता आहे. मागची लोकसभा जिल्ह्य़ासाठी विविध कारणांनी ऐतिहासिक ठरली. तुलनेने मावळत्या लोकसभेचा कार्यकाळ जिल्ह्य़ाला फारसा फलदायी नव्हता. हीच मावळत्या व मागच्या लोकसभेतील पहिली तफावत आहे.

डॉ. कांकरिया यांना दंडाची नोटीस
‘साईबन’चा व्यावसायिक कारणासाठी वापर
नगर, २ मार्च/प्रतिनिधी
एमआयडीसीतील ‘साईबन’चे संचालक डॉ. प्रकाश व डॉ. सुधा कांकरिया यांना प्रांताधिकारी कार्यालयाने ७ लाख ८० हजार रुपये दंडाबाबत कारणे दाखवा नोटीस आज बजावली. बिगरशेती कारणासाठी जमीन वापरण्याची परवानगी न घेता त्या जमिनीचा वापर व्यावसायिक कारणासाठी करीत असल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.

फेब्रुवारीच्या शेवटच्या ४ दिवसांत
साडेसोळा कोटींची वसुली!
नगर, २ मार्च/प्रतिनिधी
महावितरणच्या नगर विभागाने फेब्रुवारीच्या शेवटच्या ४ दिवसांत तब्बल १६ कोटी ४६ लाख २७ हजार रुपयांची वीजबिल वसुली केली. लक्ष्यापैकी ६८ टक्के रक्कम (२८ कोटी १ लाख २७ हजार) वसूल झाल्याने विभागाची राज्यात नाचक्की होण्यापासून सुटका झाली. फेब्रुवारीत नगर विभागाला ४१ कोटी ८ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. लाइन-लॉसेस कमी करून दाखवून विभागाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी हे उद्दिष्ट गाठणे क्रमप्राप्त होते. यावरूनच विभागातील वीजकपातीची कमी-अधिक वेळ निश्चित होणार होती.

एका गटाचे पाचजण अटकेत, दुसऱ्या गटाच्या ५४जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
जामखेडमध्ये हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी
जामखेड, २ मार्च/वार्ताहर
किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत सहाजण जखमी झाल्याची घटना येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शहरात तणावाची स्थिती होती. उपसभापती सुशीलकुमार सदाफुले यांच्या घरावर जमावाने दगडफेक केली. दरम्यान, सदाफुले यांनीही आज रात्री उशिरा जामखेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार ५४जणांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

साखरेचे उत्पादन निम्म्यावर!
गळीत हंगाम ८-१० दिवसांत आटोपणार
नगर, २ मार्च/प्रतिनिधी
ऊसटंचाईचा फटका बसल्याने जिल्ह्य़ातील गाळप व साखरेचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. गेल्या हंगामात सव्वाकोटी साखर पोती तयार करणाऱ्या कारखान्यांनी यंदा फक्त ४५ लाखांपर्यंत मजल मारली आहे. १० साखर कारखान्यांनी आपला हंगाम आटोपला असून, उर्वरित ६ कारखाने फार तर ८-१० दिवस चालतील अशी स्थिती आहे.

माकड आणि माणूस
गत सहस्त्रकाची जडण-घडण होत असताना ज्या महान विभुतींनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला त्यामध्ये एक होते सर चार्लस डार्विन. दि. १२ फेब्रुवारीला त्यांच्या जन्मास दोनशे वर्षे पूर्ण झाली. डार्विन यांनी आपल्या ‘ओरिजीन ऑफ स्पेसिज बाय मिन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन’ या पुस्तकात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. त्यासही यावर्षी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या पुस्तकात सजीव सृष्टीची निर्मिती कशी झाली? विशेषत पृथ्वीवरील प्राणी व वनस्पती यात जी विविधता दिसते ती कोठून आली? माणसाच्या बुद्धीला पडलेल्या या सनातन प्रश्नांची उकल करण्यात आली आहे. डार्विनने प्राण्यांच्या जाती-प्रजातीच्या उत्पत्तीविषयी उत्क्रांती व नैसर्गिक निवड हा वैज्ञानिक सिद्धांत मांडून धार्मिक समजुतींना मोठाच धक्का दिला.

‘नागवडेंना डावलल्यास मात्र वेगळा निर्णय’
भोस काँग्रेसमध्येच
श्रीगोंदे, २ मार्च/वार्ताहर
गोविंदराव आदिकसमर्थक बाबासाहेब भोस यांनी ‘राष्ट्रवादी’त न जाण्याचा निर्णय आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांना काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदासाठी पुन्हा डावलल्यास
वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा भोस व ‘श्रीगोंदे’चे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसला देत आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, आपण यापुढे नागवडेंबरोबर राजकारण करणार असल्याचे श्री. भोस यांनी स्पष्ट केले.

दगाबाज, स्वार्थी पक्षातून गेले ते बरेच झाले..
काँग्रेस समितीतील बैठकीत विखेंचे आदिकांवर टीकास्त्र
नगर, २ मार्च/प्रतिनिधी
जिल्हाध्यक्षपदावर डोळा असलेल्या काँग्रेसअंतर्गत खासदार बाळासाहेब विखे व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात या दोन्ही गटांचे लक्ष्य सध्या काँग्रेसचे जिल्हा कार्यालय आहे. थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हे कार्यालय ताब्यात घेताच आज खुद्द खासदार विखे यांनीच या कार्यालयात हजेरी लावत आपल्या समर्थकांची बैठक घेतली. पक्षाचे जिल्हा कार्यालय हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मालकीचे आहे.

पणजीची समाधी शोधण्यासाठी इस्त्राएलचे डेव्हीडसन नगरमध्ये..
नगर, २ मार्च/प्रतिनिधी

१३५ वर्षांपूर्वी निधन झालेल्या आपल्या पणजीची समाधी कोठे आहे, हे पाहण्यासाठी इस्त्राएलमध्ये राहणारे डेव्हीड अहरोज भास्तेकर (डेव्हीडसन) आज नगरला आले होते. त्यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेला त्यांचा मुलगा होता. यहुदी (ज्यू) असलेले ६७ वर्षीय डेव्हीड मूळचे कोकणातील भास्ते गावाचे रहिवासी. त्यांचे पणजोबा आरोन सॉलोमन भास्तेकर ब्रिटीश आर्मीमध्ये शिपाईगडी होते. सन १८०३पासून नगरचा किल्ला हे ब्रिटीश आर्मीचे मुख्यालय असल्याने विविध देशांतील, प्रांतातील लष्करी अधिकारी, शिपाईगडी नगरमध्ये वास्तव्यास असत.

पुलाचे कठडे तोडून कंटेनर कलंडला
राहाता, २ मार्च/वार्ताहर
नगर-मनमाड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कोल्हार ते राहातादरम्यान काम पुन्हा संथ झाले असून मार्गावरील पुलाच्या रुंदीकरणाचे कामही बंद आहे. तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील ओढय़ावरील पुलाचे कठडे तोडून कंटेनर कलंडला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. नगर-मनमाड रस्त्याचे कोल्हार ते राहातादरम्यान चौपदरीकरणाचे काम गेल्या ६ महिन्यांपासून ठेकेदार कंपनीच्या आर्थिक प्रश्नामुळे बंद होते. कोल्हार ते कोपरगावपर्यंत हा रस्ता काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी, तर काही ठिकाणी एका बाजूने खोदल्याने रात्रीच्या वेळी अपघात होतात.

 

शोकांतिकेची सुरुवात
आयुक्त कल्याण केळकर यांची १५ दिवसांची (सध्या तरी) रजा हा जाहीर चर्चेचा, बातमीचा विषय व्हावा ही महापालिकेसाठी काही फारशी सुखावह बाब नाही. रजेसाठी त्यांनी दिलेले वैद्यकीय कारण कदाचित खरेही असेल; पण सध्याची प्रशासकीय व राजकीय परिस्थितीच त्याला कारणीभूत आहे, असे समजण्यास भरपूर वाव आहे. सत्ताधारी, विरोधक व प्रशासन ही त्रिस्तरीय रचना म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्राण आहे. कोणीही कोणावर वरचढ होऊ नये, प्रत्येकाचा एकमेकावर अंकुश राहावा व त्यातून जनहिताचे काम व्हावे या पद्धतीने कायद्याची, नियमांची चौकट आखून दिलेली आहे.

मालमोटारीची रिक्षाला धडक, चारजण जखमी
देवळाली प्रवरा, २ मार्च/वार्ताहर

सोनई-राहुरी रस्त्यावर मालमोटारीने समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातील चौघे जखमी झाले. आज दुपारी साडेतीन वाजता हा अपघात घडला. राहुरी पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली.
राहुरी रस्त्यावर पिंपरी अवघड उड्डाणपुलाजवळ रिक्षाला (एमएच १७ व्ही ७३१९) मालमोटारीने (एमएच १४ एफ ६६६१) समोरून धडक दिली. रिक्षाचालक भाऊराव कवडे, असिफ शेख, अनिल गायकवाड व सागर हापसे गंभीर जखमी झाले. चालक कवडे याच्या फिर्यादीवरून मालमोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मालमोटारीचा चालक पसार झाला.

माहितीसाठी
जल दिनानिमित्त स्पर्धा

जागतिक जल दिनानिमित्त (२२ मार्च) जलसंपदा विभाग व इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने निबंध व लेख स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटाकरिता ‘पाण्यासाठी होणारे महायुद्ध’, ‘पाण्याबाबत सीमा वाद’, ‘अहमदनगर जिल्हा-पाणी वाद व समन्यायी पाणीवाटप’ हे विषय आहेत. शब्दमर्यादा १ हजार आहे. इयत्ता ७वी ते ९वीच्या गटासाठी ‘भांडू नका-सांडू नका’, ‘एक थेंब पाण्याचा-वाटा त्यात सर्वाचा’, ‘माझे पाणी-तुझे पाणी-सर्वाचे पाणी’ असे ३ विषय असून, यासाठी ५०० शब्दांची मर्यादा आहे. वरील दोन्ही गटांतील सवरेत्कृष्ट ३ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले निबंध-लेख १० मार्चपर्यंत सचिव, सिंचन सहयोग, नगर-द्वारा-अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नगर-औरंगाबाद रस्ता, नगर-४१४००१ येथे पाठवावेत. विद्यार्थ्यांनी आपले निबंध मुख्याध्यापकांमार्फत पाठवावे, असे आवाहन जयप्रकाश संचेती यांनी केले आहे.

बीएसएनएल लेबर युनियनचे उपोषण
नगर, २ मार्च/प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी बीएसएनएल लेबर अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियनच्या सभासदांनी येथील बीएसएनएल मुख्यालयासमोर आज निदर्शने करीत साखळी उपोषण सुरू केले. गुरूवारपासून (दि. ५) प्रमुख कार्यकर्ते एकाच वेळी उपोषण, तसेच दि. ९पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही युनियनने दिला आहे. बीएसएनएलच्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सला श्रम मंत्रालयाच्या नियमानुसार किमान वेतन मिळावे, कामगारांना विनाकारण कामावरून काढू नये, ठेकेदार बदलला तरी कामगारांना काढण्यात येऊ नये, दर वर्षी बोनस मिळावा, इपीएफ व इपीआयची सुविधा मिळावी, ओळखपत्र द्यावे आदी युनियनच्या मागण्या आहेत. जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब उधार, मतीन पठाण, मोहंमद शेख, नीलेश ढुमणे, बबन साळवे, दत्तात्रेय रासकर, नरेश गोंधळे, गणेश गारुडकर आदी कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सिद्धिबागेची दुरुस्ती सुरू
नगर, २ मार्च/प्रतिनिधी

सिद्धिबागेच्या दुरुस्तीला अखेर महापालिकेला आजचा मुहूर्त मिळाला. नगरसेवक अरुण जगताप यांच्या हस्ते या बागेच्या कामास आज सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना खेळण्यासाठी बाग उपलब्ध व्हावी म्हणून बागेचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, असे महापौर संग्राम जगताप यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र प्रशासन बागेच्या कामासंबंधी काहीच हालचाल करीत नव्हते. महापौर जगताप व अन्य पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अखेरीस आज या कामास प्रारंभ करण्यात आला. संरक्षक भिंती, हिरवळ, बसण्यासाठी आकर्षक बाक, झाडांभोवती पार बांधणे अशी विविध कामे यात असल्याचे अरुण जगताप यांनी सांगितले. माजी उपनगराध्यक्ष कृष्णा जाधव, उपमहापौर नजीर शेख, माजी उपमहापौर दीपक सूळ, नगरसेवक धनंजय जाधव, संजय गाडे यावेळी उपस्थित होते.

तुकाराम बीजेनिमित्त गुरुवारपासून पारायण
नेवासे, २ मार्च/वार्ताहर

येथील संत तुकाराममहाराज मंदिरात तुकाराम बीजेनिमित्त गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन दि. ५ मार्चपासून करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक, तसेच संत तुकाराममहाराज चरित्र कथेचा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजक संत तुकाराममहाराज मंदिराचे मठाधिपती उद्धवमहाराज यांनी सांगितले. योगीराज गंगागिरीमहाराज, नारायणगिरीमहाराज, बन्सीमहाराज तांबे, एकनाथ स्वामीमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या वेळी पहाटे काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, गाथापारायण, संगीत भजन आदी कार्यक्रम आहेत.

तालुका पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी उत्तम राऊत
श्रीगोंदे, २ मार्च/वार्ताहर

तालुका पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी उत्तम राऊत यांची, तर कार्याध्यक्षपदी अरिफ शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे मावळते अध्यक्ष श्रीराम तुपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. राऊत यांनी या वेळी कार्यकारिणी जाहीर केली. ती अशी - कार्याध्यक्ष अरिफ शेख, सचिव दादाजी पाटील, उपाध्यक्ष अशोक होनराव व दत्ता पाचपुते, खजिनदार बाळासाहेब शेलार, सहचिटणीस शकील शेख, सल्लागार संजय काटे, बाळासाहेब बळे, बाळासाहेब काकडे, कार्यकारिणी सदस्य श्रीराम तुपे व विष्णू धुमाळ. या वेळी राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

वाळूच्या वाहनांमुळे रस्त्यांची लागली ‘वाट’!
श्रीगोंदे, २ मार्च/वार्ताहर
तालुक्यातील भीमा व घोडनदीकाठच्या गावांमधील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अगोदरच काळ्या जमिनीमध्ये ठेकेदारांनी रस्त्यांची कामे चांगली केली नाहीत. त्यातच वर्षभर होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची वाट लागली आहे.नदीकाठच्या गावांमधील काळ्या मातीत रस्त्यांची कामे ज्या पद्धतीने केली पाहिजेत, तशी होत नसल्याने तेथील रस्ते खचले आहेत. निमगाव खलू ते कौठे हा रस्ता वर्षांनुवर्षांपासून खड्डय़ांनी व्यापलेला आहे. अनगरे येथे वीज उपकेंद्राजवळ ज्या रस्त्याची मध्यंतरी दुरुस्ती झाली. पण आर्वीचा रस्ता अतिशय खराब आहे, तर सांगवी दुमाला या निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त गावाला नगर-दौंड रस्त्यावरून जोडणाऱ्या रस्त्याचीही फार वेगळी अवस्था नाही. या रस्त्यावर भलेमोठे खड्डे असून, ते बुजविण्याकरिता काही ठिकाणी चक्क वाळू टाकण्यात आली आहे!
वर्षभर सुरू असणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे रस्ते खराब झाले आहेत. या गावांच्या नदीपात्रातील होणाऱ्या वाळू लिलावातून मिळणारी काही रक्कम या रस्त्यांवर खर्च व्हावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.

वीटभट्टय़ांच्या विरोधात माजी सरपंचाचे उपोषण
अकोले, २ मार्च/वार्ताहर

प्रवरा नदीपात्रातील अनधिकृत वीटभट्टय़ा हटवाव्यात, या मागणीसाठी माजी सरपंच जयराम गायकवाड यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या (मंगळवारी) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या वीटभट्टय़ांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. नदीचे पाणीही खराब होते. नदीपात्राच्या सौंदर्यालाही गालबोट लागते. त्यामुळे वीटभट्टय़ा अन्यत्र हलवाव्यात, अशी मागणी पूर्वीपासून केली जात आहे. श्री. गायकवाड यांनी या संदर्भात तहसीलदारांशी पत्रव्यवहार केला. मात्र, त्याचीही दखल न घेतल्यामुळे दोन दिवसांपासून त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

फलकांच्या स्पर्धेला आचारसंहितेमुळे लगाम!
राहुरी, २ मार्च/वार्ताहर

राजकीय पक्ष-संघटनांच्या फलकांची बसस्थानकाच्या बाहेर आलेली गर्दी आता मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे ओसरणार आहे. फलक कोणी व कसे काढायचे ही प्रशासनाची अडचण अशा प्रकारे दूर होणार आहे. राजकीय पक्षातील विविध पदांवर निवड, त्यानिमित्त शुभेच्छा देणारे फलक, नेत्यांचे वाढदिवस, संघटनांच्या होर्डिग्जमुळे हा सगळा परिसर गजबजून गेला आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक वर्दळ, स्थानिक लहान-मोठय़ा वाहनांची गर्दी यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना नेहमीच अडचण येते. त्यातच फलकांच्या गर्दीमुळे बाहेरील लोकांना बसस्थानक अक्षरश शोधत यावे लागते!
केवळ हा परिसरच नव्हे, तर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्येही या फलकांनी ठाण मांडले आहे. आता मात्र लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हे फलक हटविले जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.