Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

दरवळला ‘संवादाचा सुवावो’
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

वक्ता दशसहस्त्रेषु, व्यासंगी विचारवंत नानासाहेब उपाख्य प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासोबत ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी साधलेला संवाद- ‘संवादाचा सुवावो’या नावाने पुस्तकरूपात आज वाचकांपुढे आला. या मुलाखत-गप्पांच्या पुस्तकाचे ग्रेस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. गोंडवाना क्लबच्या बागेत रंगलेल्या या अनौपचारिक समारंभात संवादाचा सुवावो दरवळला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नासिकला बदली
उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांचेही स्थानांतरण
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काही तास आधी राज्य शासनाने नागपूर जिल्हा परिषदेत वादग्रस्त ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासह गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच जिल्ह्य़ात किंवा एकाच पदावर असणाऱ्या राज्यातील १९० हून अधिक उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या घाईघाईने बदल्या केल्या आहेत.

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी, मुत्तेमवारांनाच आव्हान देण्याचे मनसुबे
चतुर्वेदींच्या उमेदवारीसाठी समर्थकांचे केंद्रीय निरीक्षकांना साकडे
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू करून केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनाच आव्हान देण्याचे मनसुबे आखले आहेत. माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांच्या समर्थकांनी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक रतनलाल तांबी यांच्याकडे साकडे घातले. तांबी यांनी आज शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली. विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, वस्त्रोद्योग मंत्री अनीस अहमद, गृह राज्यमंत्री नितीन राऊत, आमदार दीनानाथ पडोळे आणि शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्याशी त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. नेत्यांशी त्यांनी हॉटेलमध्ये तर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी देवडिया काँग्रेस भवनात चर्चा केली.

विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा आज पदवीप्रदान समारंभ
पृथ्वीराज डे प्रथम तर, नेहा नायक द्वितीय
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा सहावा पदवीप्रदान समारंभ उद्या, ३ मार्चला आयोजित करण्यात आला असून योजना आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता व्हीएनआयटीच्या सभागृहात हा समारंभ होणार आहे. ८ पुरस्कार पटकावणाऱ्या सिव्हिल अभियांत्रिकीचा पृथ्वीराज डे याने प्रथम तर, इलेक्ट्रिक अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील नेहा प्रभाकर नायक हिने ५ पुरस्कार मिळवत संस्थेत दुसरे स्थान पटकावले आहे.

विधायक कार्य करणाऱ्यांना सोहोळ्यातून चालना -थोरात
म.बा. गांधी पुरस्कार वितरण सोहोळा
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
म. बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रात विधायक कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो. विधायक कार्य करणाऱ्यांना चालना देणारा हा पुरस्कार सोहोळा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. म.बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा विसावा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार गिरीश गांधी, अ‍ॅड.रजनीकांत पंडित, प्राचार्य बबन तायवाडे, ज्येष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी, ट्रस्टच्या प्रमुख शोभाताई गांधी, सतीश गोगुलवार, द.सा. बोरकर उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
* सुमारे साडे तीन हजार अधिकारी व कर्मचारी * ३ हजार ५६७ मतदान केंद्र
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून नागपूर व रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात तब्बल ३५ लाख ५६ हजार ४३९ मतदार आहेत. मतदानाच्या प्रक्रियेसाठी सुमारे साडे तीन हजार अधिकारी व कर्मचारी व्यस्त राहणार आहेत. एकूण ३ हजार ५६७ मतदान केंद्र असून त्यातील ९२ केंद्र संवेदनशील आहेत.

प्रकाश दुलेवाले आणि अरुणा पवार यांचे कविता वाचन
नागपूर, २ मार्च/ प्रतिनिधी

धरमपेठ राजाराम वाचनालय आणि प्रगतशील लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कविता महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात आज दुसऱ्या दिवशी प्रकाश दुलेवाले आणि अरुणा पवार-चौरे यांनी त्यांच्या कविता सादर केल्या. प्रकाश दुलेवाले यांनी त्यांच्या कविता वाचनाची सुरुवात ‘शब्दाना धार आहे म्हणून व्यवहार आहे, ‘शब्द नसतील मुखी तर, जग झाले असते दुखी’ या कवितेने केली व शेवट ‘देवळात विठू आहे, बसता कां शांत, लुटती महंत मुक्त जना’ या अभंगाने केला. प्रकाश यांच्या कवितेला उपस्थित श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर अरुणा पवार-चौरे यांनी कविता वाचन केले. अरुणा पवार-चौरे यांनी त्यांच्या कविता वाचनाची सुरुवात ‘छाया नसेल आज सावली उद्याची मी, पेरूनी जाईन रोमारोमात श्वासांचे गाणे’ या कवितेने केली. ‘ आधार नसुदे आज, उद्याचा मापदंड आम्ही, श्वासाला श्वासामधून रुजवू समतेचा गाळंत ’ या कवितेने त्यांच्या कविता वाचनाचा समारोप झाला. दुसऱ्या दिवशी कवींनी सामाजिक जाण असणाऱ्या विविध भावभावनांचा अविष्कार दाखविणाऱ्याकविता सादर केल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रगतशील लेखक संघाचे सरचिटणीस प्रसन्नजित गायकवाड यांनी केले . उद्या महेंद्र गायकवाड आणि डॉ. मनोहर नरांजे हे कविता सादर करणार आहेत.

रस्ता सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांची पोलीस आयुक्तांना मानवंदना
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी सकाळी १ हजार विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून पोलीस आयुक्तांना मानवंदना दिली. विविध शाळेतील एकूण ३३ प्लॉटुन्समधील १ हजार ५८ विद्यार्थ्यांनी या संचलनात भाग घेतला. पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित, अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर गावित, वाहतूक पोलीस उपायुक्त हरीश चव्हाण, प्रकाश पाटील, सुरेश सोने, के.डी. ठाकूर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. शहरातील वाहतूक सुनियंत्रित करण्यात रस्ता सुरक्षा दलाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा आहे. पालक, शेजारी, मित्रांना वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. संचलनात मुलींमधून भगवती हायस्कुल, मानवता हायस्कुल व सिद्धेश्वर हायस्कुल तर, मुलांमध्ये साऊथ पॉईंट हायस्कुल, राजेंद्र हायस्कुल व मानवता हायस्कुल या शाळांना बक्षीस देण्यात आले. बारा शिक्षकांनाही प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त हरिश चव्हाण, तर पोलीस निरीक्षक सुरेश लांबट यांनी आभार मानले.

आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करणार -प्रवीण दराडे
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून विदर्भात १६ एप्रिलला निवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे निवडणूक आचारसंहितेबाबत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विविध लोकप्रतिनिधींनी आपापली शासकीय वाहने सोमवारी परत केल्याचे सांगितले. आचारसंहितेबाबत अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजता विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करणार असल्याचे जिल्हाधिकारी दराडे म्हणाले. या बैठकीसाठी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सी.एच. वाकडे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) पी.टी. पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी, धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी सी.एस. डांगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश कातडे, राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

आनंदी राहून काम केल्यास मरगळ दूर होते -मनोहर
अ‍ॅड. जीवन पाटील यांच्या ‘व्यवसायातील गमती जमती’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

‘व्यवसायातील गमती जमती’ या पुस्तकामध्ये वकिली व वैद्यकीय व्यवसायातील अनेक विनोदी किस्से संकलित करण्यात आले आहेत. व्यवसायामध्ये गंभीर राहण्यापेक्षा आनंदी राहून व्यवसाय केल्यास कामाची मरगळ दूर होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर यांनी केले. अ‍ॅड. जीवन पाटील यांच्या ‘व्यवसायातील गमती जमती’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. यवतमाळचे अ‍ॅड. जीवन पाटील यांचे हे तिसरे पुस्तक असून यापूर्वी ‘रंगपालवी’ हा लघुकथासंग्रह नाटय़कलावंत प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते तर, ‘अण्णाची चंची’ हा त्यांच्या वडिलांच्या जीवनचरित्रावरील पुस्तक राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय मार्मिक असून या पुस्तकातून हसण्याचा संदेश देण्यात आला आहे. वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल, असेही व्ही. आर. मनोहर म्हणाले. प्रकाशनाच्यावेळी भारतीय क्रिक्रेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. शंशाक मनोहर, अ‍ॅड. वर्षां मनोहर उपस्थित होते. वकिली व्यवसायातील शिखर असलेले व्ही. आर. मनोहर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित व्हावे हे भाग्य समजतो, असे जीवन पाटील आपल्या मनोगतात म्हणाले.

खुल्या भूखंडावरील कचरा साफ करण्याची जबाबदारी मालकांवर
नागपूर, २ मार्च/ प्रतिनिधी

खुल्या भूखंडावरील कचरा साफ करण्याची जबाबदारी भूखंडमालकावर टाकण्याचा प्रस्ताव आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. शहरात मोठय़ा प्रमाणात खुले भूखंड आहे. त्यावर विविध प्रकारचे झाडे वाढल्याने त्यापासून डासांची निर्मिती वाढली असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. हा प्रकारटाळण्यासाठी प्रशासनाने खुल्या भूखंडावरीलकचरा साफ करण्याची जबाबदारी मालकांवर टाकण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला होता. त्याला आज समितीने मंजुरी दिली. कचरा साफ न करणाऱ्या मालकांवर दोन हजार रुपये दंडम् आकारण्यात येणार आहे.

हनुमाननगर झोनला टाळे ठोकले
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

वॉर्ड क्रमांक १२१ मधील जयदुर्गा सोसायटी, कृषी नारा सोसायटी, रसना सोसायटीमधील पाण्याच्या टंचाईच्या विरोधात हनुमाननगर झोन कार्यालयाला शिवसेनेने आज ताळे ठोकले.
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच वॉर्ड क्रमांक १२१ला पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. यासंबंधात जलप्रदाय विभागाला अनेकदा कळवण्यात आले. परंतु, परिस्थितीत सुधारणा झाली नाही म्हणून संतप्त नागरिकांसह शिवसैनिकांनी हनुमाननगर जलप्रदाय विभागाच्या कार्यालयाला घेराव केला व ताळे ठोकले. महापालिकेच्या अधिकारी कुकरेजा, पवार यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले व लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. ४८ तासात जनतेच्या मागण्यापूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे शिवसेनेचे प्रवीण शर्मा यांनी सांगितले. यावेळी नितीन बडगे, अक्षय सुर्यवंशी, प्रशांत सुरपाम, राकेश राऊत, निलेश हिवरे, संजय हटवार उपस्थित होते.

सोमकुंवर कॉन्व्हेंटमध्ये विज्ञान दिवस
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

आयुष्यमती कौशल्याबाई सोमकुंवर कॉन्व्हेंटमध्ये संस्थेचे सचिव ओमप्रकाश सोमकुंवर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. ग्रहतारे, दिवसरात्र निर्माण होणे, समुद्र भरती-ओहटी निर्माण होणे, वनस्पतीमध्ये जीव आहे, आदी प्रात्यक्षिके चित्रांद्वारे शिक्षिकांनी मुलांना दाखवले त्याचप्रमाणे स्वच्छता म्हणजे काय, स्वच्छतेचे जीवनातील महत्त्व आदी बाबींची माहिती प्रात्यक्षिकांसह मुलांना देण्यात आली. श्वास घेणे व श्वास सोडणे, प्राणवायु, कार्बनडायऑक्साईड याचे जीवनातील महत्त्व ओमप्रकाश सोमकुंवर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन राजश्री हेडाऊ यांनी केले.

गायन स्पर्धेत महिमा अव्वल
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या उडान या उपक्रमातंर्गत नुकतीच हिंदी मोर भवनमध्ये ऑरेंज सिंटी वुमन गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ‘अ’ गटातून प्रथम क्रमांक महिमा कृष्णन्न या बालिकेला मिळाला. महिमा ही माऊटफोर्ट स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकते.

महापालिका कर्मचारी बँकेवर भाजपच्या लोकक्रांतीचा झेंडा
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजप नेते दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखालील लोकक्रांती पॅनलने २० पैकी १५ जागा जिंकल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आले. पाच जागा अपक्षांनीजिंकल्या.महापालिका कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळी जवाहर वसतीलगृह नंदनवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. अतिशय चुरशीची ही निवडणूक होणार, असा अंदाज होता मात्र, निकालाने तो खोटा ठरवला. २० पैकी १५ जागा लोकक्रांतीने जिंकल्या. त्यात राजेंद्र ठाकरे, दिलीप देवगडे, राजेश गवरे, शशी आदमने, राधेश्याम निमजे, दिलीप चौधरी, विजय बागल, स्नेहल तितरे, विजय काथोटे, विजय जांभूळकर, सुशील यादव, राजकुमार मनाटे, अजीज अख्तर, हाजी अहमद यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धीचा पराभव केला. इतर पाच अपक्षांमध्ये गौतम गेडाम, इश्वर मेश्राम, संध्या इंगळे, सुरेंद्र निमजे, विलास चहांदे यांचा समावेश आहे. निवडणूक रिंगणात एकूण पाच पॅनल होते. मात्र लोकक्रांतीची शक्ती इतर पॅनलच्या तुलनेत भारी ठरली.

ग्रंथोदय वाड्मय पुरस्कार वितरण शनिवारी
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

देवयानी प्रकाशन मुंबई व विदर्भ साहित्य संघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ग्रंथोदय वाड्मय पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवारी, ७ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात सांयकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. सुभाष सावरकर, डॉ. प्रकाश खरात, डॉ. जुल्फी शेख, डॉ. प्रमोद गाररोडे, स्नेहलता शेकापुरे, प्रा.रमेश देशमुख व वासुदेव साखरकर यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. याच कार्यक्रमात ‘राम गणेश गडकरी यांची स्त्री सृष्टी’, ‘लीळाचरित्रातील लोकजीवन’, ‘अस्तित्व’ ‘महात्मा फुल्यांचे विचार’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रवीण बर्दापूरकर, ज्येष्ठ साहित्यिक वामन तेलंग तसेच श्रीमंत माने, डॉ. पी.आर.राजपूत, प्रा. प्रफुल्ल गवई उपस्थित राहणार आहेत, असे देवयानी प्रकाशनचे प्रकाशक डॉ. सुरेश वर्धे यांनी कळवले आहे.

भूमाफियांच्या विरोधात आज जनजागृती मिरवणूक
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

अखिल भारतीय मानवाधिकार संरक्षण मंचातर्फे ‘भूमाफीया विरोधी जनजागृती मोहीम’ उद्या, ३ मार्चला सकाळी ११ वाजता व्हेरायटी चौकातून काढण्यात येणार आहे. शहरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्या जास्त किमतीला विक तात व त्यातून भरमसाठ पैसा कमावत आहेत. जमिनीची खोटी कागदपत्रे बनवून तर, कधी जमीन मालकांना धाक दाखवून त्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. याविरोधात हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. अशा गुंड लोकांना पाच वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. तरीही प्रशासन या प्रकरणी गंभीर नसल्याने सामान्य माणसाला त्याच्या अधिकाराविषयी जागृत करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. सामान्य माणसाने या मिरवणूक भाग घेण्याचे आवाहन राजीव डोंगरे, बाळू मेश्राम, सिराज खान, फय्याज अहमद, रियाज खान आदींनी केले आहे.

पत्नीला पेटवले
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

पतीने पत्नीला पेटवून दिल्याची घटना उत्तर नागपुरातील कबीर नगरात सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. आरती राजेश म्हैसकर हे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे समजताच जरिपटका पोलीस रुग्णालयात गेले. पती राजेश गजानन म्हैसकर याने चारित्र्यावर संशय घेऊन अंगावर रॉकेलओतून पेटवून दिल्याची जबानी तिने पोलिसांना दिली. जरिपटका पोलिसांनी आरोपी राजेशविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गुन्हा दाखल केला.