Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

नवनीत

जी व न द र्श न
न्यायनिवाडा करू नका

येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, ‘‘दोष काढू नका, कारण त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील. ज्या मार्गाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल’’, (मत्तय ७ : १-५) आपल्या कृतीचे आणि वर्तनाचे निरीक्षण आणि परीक्षण करण्याची पहिली जबाबदारी ज्या त्या व्यक्तीची असते. एखादी व्यक्ती अशी का वागते? त्याचे उत्तर तीच प्रथम देऊशकते. आपल्यावर झालेले संस्कार, आपला परिसर, आपली बौद्धिक आणि नैतिक जडणघडण या निकषांनुसार मनुष्य निर्णय घेत असतो म्हणून प्रत्येक माणूस स्वत:च्या निर्णयाला आणि त्याच्या परिणामांना जबाबदार असतो. कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात अनेक घडामोडी होत असतात, प्रत्येकाला अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यांचे भलेबुरे परिणाम असतात. त्यांचे मूल्यमापन करावे लागते. उदाहरणार्थ, शिक्षक, पालक, न्यायाधीश आदींना कृतीचे परीक्षण करावे लागते. तो त्यांच्या जबाबदारीचा भाग असतो. मूल्यमापन कृतींचे करता येते. वृत्तीचे नाही. माणसाचे मन हे अथांग सागरासारखे आहे. एक वेळ सागराच्या तळाचा आणि अंतराळातील नक्षत्रमाळांचा थांग लागेल, परंतु माणसाच्या मनाचा नाही. बायबलमध्ये मनासाठी ‘हृदय’ हा शब्द वापरला आहे. हृदय म्हणजे विचार, भावना, संवेदना यांचे केंद्र होय. द्रष्टा जेरमाया सांगतो, ‘माणसाचे हृदय अतिशय कपटी आहे. ते असाध्य रोगाने बेजार आहे. त्याचा वेध कोणाला लागतो? परमेश्वर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे फळ देतो. तो माणसाच्या हृदयाची पारख करतो’. (जेरमाया १८ : ९-१०) माणसाच्या मनाची प्रवृत्ती दुष्टपणाकडे असते. राजा डेव्हिड याने आपल्या सरदाराच्या पत्नीबरोबर व्यभिचार केला. त्याला त्याचा पश्चात्ताप झाला. त्याने देवाकडे प्रार्थना केली, ‘देवा, माझी झडती घे, माझे हृदय पारख, मला कसोटीला लावून माझ्या मनाचा वेध घे. माझी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा. मला सत्य मार्गाने चालव.’ (स्तोत्र १३९ : २३-२४) दुसऱ्याच्या मनात काय दडलंय, याची जाणीव आपल्याला नसते म्हणून कुणाच्याही वृत्तीचा पंचनामा कुणी करू नये. कुणावर दोषारोप करू नयेत, ज्याच्या कृत्याला तो जबाबदार..!
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
लोणार सरोवर

बुलढाणा जिल्हय़ातील लोणार सरोवर हे एखाद्या लघुग्रहाच्या आघातातून निर्माण झाले असल्याचे म्हटले जाते. त्याचा पुरावा काय आहे?
बुलढाणा जिल्हय़ातील लोणार या ठिकाणी असलेले सरोवर अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. सुमारे १८३० मीटर व्यास असलेल्या या सरोवराची खोली १५० मीटर (लगतच्या भूप्रदेशाच्या तुलनेत) असून या सरोवराची कडा ५ ते ३० मीटर उंचावलेली आहे. १८२३ साली जे. सी. अलेक्झांडरने प्रथम याच्या वैशिष्टय़ांकडे लक्ष वेधले तेव्हा या विवराचे मूळ ज्वालामुखीजन्य असावे असाच समज झाला होता. इ.स. १८९६ साली गिलबर्ट या अभ्यासकाने सर्वप्रथम ‘हे आघात विवर असावे’ अशी शक्यता वर्तविल्याची नोंद आढळते. या विवराचा सखोल अभ्यास १९७३ मध्ये स्मिथ्सोनियन विद्यापीठाद्वारे केला गेला. यात या विवराच्या मध्यभागी खोलवर जात भूपृष्ठाखालून काही खडक गोळा करून त्यांचे विश्लेषण केले गेले. त्यात हे विवर ज्वालामुखीजन्य नसून आघात विवर असल्याचे सिद्ध झाले. या खडकांमध्ये मुख्यत्वेकरून पॅजिओक्लेज, फेल्डस्पार इ. प्रकारची द्रव्ये आढळली. त्यांची निर्मिती दख्खन पठारावरील बेसॉल्ट खडकावर अत्यंत प्रचंड आघात झाला तरच होऊ शकते. याद्वारे हे विवर आघात विवर असल्याचे सिद्ध झाले. ही द्रव्ये अलीकडे म्हणजे सुमारे ५०,००० वर्षांपूर्वी निर्माण झालेली असावीत, असेही आढळले आहे. याचाच अर्थ हा आघातही याच सुमारास झाला असावा. अशा प्रकारचा प्रचंड आघात हा केवळ लघुग्रहामुळे शक्य आहे. बेसॉल्टिक खडकात तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे आघात विवर असून, याचे साम्य चांद्रविवरांशी आहे. (मात्र हे जगातील सर्वात मोठे आघात विवर नाही).
महेश नाईक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
ह. ना. आपटे
आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरि नारायण आपटे यांचा जन्म ६ मार्च १८६४ रोजी जळगाव जिल्हय़ातील पारोळे या गावी झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. पण त्यांचे साहित्य मात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला गेले. एम.ए.चे ते बारा वर्षे परीक्षक होते. ‘मधली स्थिती’ ही त्यांची पहिली कादंबरी ‘पुणे वैभव’ या साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली. ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही त्यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीचे अनेक भाषांत अनुवाद झाले. याव्यतिरिक्त ‘जग हे असे आहे’, ‘कर्मयोग’, ‘मायेचा बाजार’, ‘भयंकर दिव्य’सारख्या सामाजिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. विधवा पुनर्विवाह, बालविवाह, हुंडा, केशवपन इ. प्रश्नांना लेखणीद्वारे त्यांनी वाचा फोडली. ‘म्हैसूरचा वाघ’ ही टिपू सुलतानवर आधारलेली त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी. याशिवाय ‘गड आला पण सिंह गेला’, ‘चंद्रगुप्त’, ‘सूर्योदय’, ‘उष:काल’, ‘वज्राघात’ या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या. १८९०च्या सुमारास ‘करमणूक’ नावाचे साप्ताहिक त्यांनी काढले. त्यातून आजच्या वर्तमानपत्रामध्ये आढळणारी शास्त्रीय माहिती, ऐतिहासिक गोष्टी, वैद्यकीय सल्ला, प्रवासवर्णने, कविता, व्यंगचित्रे ही सारी सदरे त्यात समाविष्ट होती. ‘करमणूक’मधून त्यांनी लिहिलेल्या ‘स्फुट गोष्टी’ मराठी लघुकथेची सुरुवात समजली जाते. ‘संत सखुबाई’, ‘सती पिंगला’सारखी नाटके, ‘गीतांजली’चा गद्य अनुवाद त्यांनी केला. समाजसेवेबद्दल ‘कैसर-ए-हिंद’ किताबही त्यांना मिळाला होता. १९१२च्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ३ मार्च १९१९ रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
मी आपला माणूसच बरा!

आई-बाबा गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते. जाताना सांगून गेले, ‘कुठे बाहेर जाऊ नका’. रमेशच्या डोक्यातून शक्कल निघाली, ‘प्रत्येकाने ठरवायचे आपल्याला काय व्हायला आवडेल आणि त्यावर लेख लिहायचा. कशी कल्पना आहे?’ ‘लिहू रे! त्यात काही अवघड नाही. पण लिहून करायचं काय त्याचं.’ शिरू कुरकुरला. ‘ते लिहून झालं की पाहू रे. सुरुवातीलाच कशाला वाकडं लावतोस’, मंगल फिस्कारली. अंत्या म्हणाला, ‘भांडू नका रे. शंकर, तू काय होणार आहेस? खरंच कुणीतरी व्हायची कल्पना मस्त आहे हं. एकदम ढासू.’ ‘मला पक्ष्यांचा राजा गरुड व्हायचंय,’ शंकर म्हणाला. ‘मला भला थोरला पिंपळवृक्ष व्हायचंय’,रमेश. ‘मला डोंगर व्हायचंय’ शिरू म्हणाला. सगळय़ांनी उत्साहानं लिहायला सुरुवात केली. मंगल ओरडली, ‘एऽऽ झालं हं लिहून माझं.’ मग सगळे ओरडले,‘आमचेही झाले लिहून.’ रमेश म्हणाला,‘मी आधी वाचतो’. सगळय़ांनी गिल्ला केला. ‘हो वाच वाच!’ ‘मला व्हायचंय पिंपळझाड. हिरवे छान. प्रचंड पिसारा असेल माझ्या फांद्यांचा. त्यावर जगतील हजारो जीव. मुळापाशी उंदीर, घुशी, सरडे बिळं करतील. सापसुरळय़ांचीही मी काळजी घेईन. बुंध्याच्या सालीत कुंभारणी घर बांधतील. मुंग्या राहतील. फांद्यावर पक्षी घरटी बांधतील. वादळवाऱ्यापासून मी त्यांचं रक्षण करेन. माझ्या पानांवर आळय़ा पोसतील. पक्षी, पिले माझी फळे खातील.’ शंकर म्हणाला,‘मी पक्षिराज. आनंदात राहीन. उंच उंच घरटी बांधीन. पिलांसाठी अचूक शिकार हेरून झडप घालीन. आभाळात घिरटय़ा घालेन.’ शिरू वाचू लागला,‘मी प्रचंड डोंगर. ढग अडवीन. हवा तिथं पाऊस पाडीन. माझ्या अंगाखांद्यावर जंगलं वाढतील. मग घरी कशाला ओरडतील बाबा? पिळतील कान, करतील शिक्षा? उलट म्हणतील, शिरू, डोंगर केवढा! पाऊस पाडतो मोठा.’ मंगल किणकिणली,‘मी बाई नदी! साऱ्यांचं जीवन माझ्यावर अवलंबून. लोक माझी पूजा करतील. मी शेतं हिरवी करीन. रान वाढवीन. तहान भागवीन. माणसं माझ्यावर धरणं बांधतील. मी त्यांना वीज देईन. सारखी वाहत राहीन.’ अंत्या ऐटीत म्हणाला,‘मी आपला माणूसच बरा.’ सगळे म्हणाले,‘हा भाव फार खातो बुवा.’ ‘अरे बाबांनो, हा रमेश वृक्ष झाल्यावर घर बांधायला, जळणफाटय़ाला कुणी कुऱ्हाड घेऊन आला तर मी त्याला अडवेन. समजावेन. शंकर उडेल गरुडराज म्हणून कुणी पारधी पकडेल त्याला, कुणी शेतकरी कोंबडय़ा नेतो म्हणून मारेल किंवा काढून टाकेल त्याचे घरटे मी समजावेन त्यांना शिरू, डोंगर झालास तरी झाडे तोडतील, बोडका करतील, दगडासाठी खाणी खणतील. मी सांगेन तुझे महत्त्व त्यांना. मंगलची नदी माणसे दूषित करतील. तिला अडवतील जागोजागी. मी तसे होऊ देणार नाही. म्हणून मी माणूसच राहीन.’ आई-बाबांनी जोरात टाळय़ा वाजवल्या. ते दोघे घरी कधी परतले आणि ऐकत उभे राहिले कळलेच नाही कुणाला. आपण पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी काय करतो? विचार करतो? कृती करतो? ब्रशने दात घासताना नळ बंद केला तर ४ लीटर पाणी वाचते. वापर नसेल त्या खोलीतले दिवे आपण बंद करू शकतो. अशा कितीतरी सहज शक्य असणाऱ्या गोष्टी आपण करू शकतो. आजचा संकल्प : पर्यावरण रक्षणासाठी मी काहीतरी निश्चित कृती करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com