Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

बसेसच्या तोडफोडीनंतर उरण मार्गावरील एनएमएमटी बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल
उरण/वार्ताहर

पाच बसेसच्या तोडफोडीनंतर एनएमएमटीने उरण मार्गावरील बसवाहतूक रात्रीपासूनच बंद केल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास एनएमएमटी व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. या अपघातात विक्रम घरत (२०, रा. नवीन शेवा) हा युवक जागीच ठार झाला.

वाशी-कल्याण मार्गावर एनएमएमटी सुरू
नवी मुंबई/प्रतिनिधी

मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये प्रवासी सेवा सुरू करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने आज सकाळी वाशी-कल्याण मार्गावर पहिली बससेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एनएमएमटीच्या बसेसना यापूर्वी डोंबिवली तसेच बदलापूपर्यंत प्रवासी सेवा पुरविण्याची परवानगी देण्यात आली होती.

काँग्रेसविरोधी रोष इनकॅश करा - विवेक पाटील
उरण/वार्ताहर :
काँग्रेसला सर्वच क्षेत्रात अपयश आले आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. काँग्रेसविरोधात उफाळून आलेला जनतेचा हा रोष ‘इनकॅश’ करा, असे आवाहन आमदार विवेक पाटील यांनी उरण येथे आयोजित शेकापच्या मनोमीलन कार्यक्रमप्रसंगी केले.रविवारी उरण येथे शेकापने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मनोमीलन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आदी सुमारे एक हजार कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मेळाव्यास आमदार विवेक पाटील यांनी मार्गदर्शन केले.

अखेर ग्रामीण रुग्णालय जन्माला येणार!
पनवेल/प्रतिनिधी :
गेल्या अनेक वर्षांच्या प्रसववेदनानंतर पनवेलचे ग्रामीण रुग्णालय जन्माला येणार आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने या प्रस्तावित रुग्णालयाच्या तीन कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रायगड जिल्ह्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपप्रमुख चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली कक्षाने या समस्येचा गेली दोन वर्षे विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता.

मुख्यालयाचं घोडं अखेर गंगेत न्हालं..
नवी मुंबई/प्रतिनिधी :
राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाचे स्वप्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली असून, या मुख्यालयाच्या कामासाठी सुमारे ९० कोटी रुपयांच्या कंत्राटाला स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली.

शास्त्रीय संगीत स्पर्धेत धनंजय म्हसकर प्रथम
प्रतिनिधी :
अभिजात शास्त्रीय संगीताची लोकांमध्ये रुची वाढावी आणि नवोदित कलाकारांना उत्तेजन मिळावे म्हणून वसईच्या अमर कला मंडळातर्फे दरवर्षी राज्यपातळीवर शास्त्रीय संगीत गायनाची स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षी २० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

झालेल्या कामांच्या पुन्हा काढण्यात आलेल्या निविदा रद्द करण्यासाठी तक्रार
उरण/वार्ताहर :
झालेल्या कामांची निविदा काढण्याचा अजब प्रकार उरण नगर परिषदेत घडला आहे. या गलथान प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून त्याची चौकशी करून कारवाईची मागणी नपाचे विरोधी पक्षनेते चिंतामण घरत यांनी केली आहे. उरण नगर परिषदेच्या हद्दीतील भवरा उरण येथे सोनार चाळ ते रेल्वे बांधकामाजवळ नाल्याचे बांधकाम (एक लाख ६९ हजार ९५३), भवरा उरण येथील शेलारवाडीजवळ पीसी करणे (४६,४८८), बोरी स्मशानभूमीजवळ गटाराचे बांधकाम करणे (एक लाख ७२ हजार ३१७) आदी सुमारे साडेचार लाखांची कामे या आधीच पूर्ण झाली आहेत. असे असतानाही झालेल्या कामांसाठी उरण नगर परिषदेने निविदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत. या गंभीर प्रकाराची बाब निदर्शनास येताच घरत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून चौकशी करून निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. खळबळजनक व धक्कादायक प्रकार घडल्याची कबुली प्रशासनाकडून देण्यात आली असून, संबंधित कामांची बिले काढली जाणार नसल्याची माहिती प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.

औषधी वनस्पती स्पर्धेत ‘निर्झर’ची बाजी
पनवेल/प्रतिनिधी :
पनवेल नगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण संस्थेतर्फे पनवेलमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाला पनवेलमधील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या दरम्यान एकूण पाच गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेतील तीन गटांमध्ये प्रथम येत तसेच फिरता चषक पटकावत निर्झर फार्मसीने बाजी मारली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी २८ फेब्रुवारीला या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नित्यानंद मार्गावरील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या भूखंडावर झालेल्या या प्रदर्शनात १९६ प्रकारची औषधी झाडे ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना या वनस्पतींचे औषधी गुणधर्म सांगण्यात आले, तसेच ती कोठे उपलब्ध आहेत, त्यांची लागवड कशी करावी, याची माहिती देण्यात आली. या दरम्यान झालेल्या स्पर्धेत सुमारे २५ फार्मसीचालकांनी भाग घेतला. गवतवर्गीय व औषधवेली गटांत निर्झर नर्सरी, गो ग्रीन व गोंधळेकर नर्सरी यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. सुगंधी वनस्पती गटात निर्झर, गो ग्रीन व साई नर्सरीने, तर झुडपे व बहुवर्गीय गटात गो ग्रीन, निर्झर व सदाबहारने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. औषधी उत्पादनांच्या व्यवसायात ३० वर्षांचा अनुभव असणारे डॉ. भक्तीकुमार दवे तसेच डॉ. प्रभाकर गांधी, डॉ. मधुकर आपटे, जयंत वझे व जगताप यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. वृक्ष प्राधिकरणाचे सुरेश रिसबुड, कर्वे, नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, काँग्रेस नेते अशोक खेर यांनी हे प्रदर्शन व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.

ऑक्सफर्ड बुकस्टोअर्सच्या पुस्तक खरेदीवर मिळणार ८० टक्के सवलत
प्रतिनिधी :
ऑक्सफर्ड बुकस्टोअर्सच्या चर्चगेट येथील पुस्तकांच्या दुकानात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनात पुस्तक खरेदीवर जास्तीत जास्त ८० टक्के तर अन्य सर्वप्रकारच्या पुस्तक खरेदीवर कमीतकमी दहा टक्के इतकी सवलत मिळणार आहे. या प्रदर्शनात विविध विषयांवरील प्रामुख्याने इंग्रजी भाषेतील हजारो पुस्तके साहित्यप्रेमी आणि चोखंदळ वाचकांना पाहायला मिळणार आहेत. विज्ञान, खेळ, निसर्ग, कथा, कादंबऱ्या, पर्यावरण, इतिहास, मनोरंजन आदी विविध विषयांवरील पुस्तकांसह विविध ध्वनिचित्रफिती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन येत्या ३१ मार्चपर्यंत आठवडय़ाचे सर्व दिवस सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत सुरू राहणार आहे. ऑक्सफर्ड बुक स्टोअर्स, दिनशा वाच्छा मार्ग, के. सी. महाविद्यालयाजवळ, चर्चगेट येथे हे प्रदर्शन सुरू आहे.