Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

पिंपळगाव-गोंदे रस्ता चौपदरीकरण सहा महिन्यांत मार्गी- छगन भुजबळ
पिंपळगाव बसवंत / वार्ताहर

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव ते गोंदे या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सहा महिन्यात पूर्ण होणार असून त्यामुळे जिल्ह्य़ातील शेती मालाच्या उलाढालीस अधिक चालना मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. सहकार विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव बसवंत येथे आयोजित जिल्हा सहकार व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कळवणचा भूमिपूजन सोहळा म्हणजे राजकीय स्टंट असल्याचा आरोप
कळवण / वार्ताहर

शहरात असणारी कळवण उपविभागातील सर्व कार्यालये कोल्हापूर फाटा येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयास सर्वपक्षीय विरोध असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी सर्वाना अंधारात ठेवून भूमीपूजन करण्याचा प्रकार म्हणजे पूर्व नियोजित स्टंट असल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष जि. प. सदस्य रवींद्र देवरे यांनी पत्रकार परिषदेत केला. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर स्थलांतरित केल्यास व्यापारी, उद्योजक, लहान-मोठे व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थी अशा सर्व घटकांचे हाल होतील.

लासलगाव बाजारात कांदा दरात घसरण
लासलगाव/ वार्ताहर

येथील मुख्य बाजार आवारात मागील सप्ताहात कांद्याची आवक टिकून राहिली तरी बाजारभाव घसरले. देशांतर्गत कांद्यास रायपूर, खडकपूर, दिल्ली, पंजाब या ठिकाणांहून मागणी होती, तर मलेशिया, कोलंबो, दुबई, सिंगापूर, बहारिन या देशांमधूनही मागणी होती. कांद्याची सप्ताहात एकूण आवक ८०, ६५० क्विंटल झाली. भाव ८०१ ते १,३०१ प्रती क्विंटल. सरासरी भाव १,०७४ रुपये.

रावेर मतदार संघाला विदर्भातील बुलढाण्याची जोड
जळगाव / वार्ताहर

मतदार संघांच्या पुनर्रचनेनंतर पूर्वीच्या जळगाव लोकसभा मतदार संघातील जळगाव वगळून रावेर मतदार संघ अस्तित्वात आला असून बुलढाणा जिल्ह्य़ातील मलकापूर विधानसभा मतदार संघाचा यात समावेश करण्यात आल्याने उमेदवार निवडताना राजकीय पक्षांना केवळ जिल्ह्य़ातच नव्हे तर जिल्ह्य़ाबाहेरही वकूब असणाऱ्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

दहावीची परीक्षा सुरु होत आहे !
आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी पालक हल्ली अधिक जागरूक होत आहेत. पण, गतिमान जीवनशैलीमुळे अनेकदा इच्छा असूनही त्यांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही. त्यामुळे मुलांबाबत केवळ जागरूक राहण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून मुलांना ‘सकारात्मक’ बनविण्याची खरी गरज आहे. त्या अनुषंगाने, बालरोग तज्ज्ञ व बाल आहारतज्ज्ञ या नात्याने गेली अनेक वर्षे मुले आणि त्यांचे पालक यांच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या डॉ. शामा कुलकर्णी ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून दर मंगळवारी मुलांच्या भावविश्वाचा वेध प्रस्तुत मलिकेतून घेणार आहेत..

युवकाच्या खून प्रकरणी एकास अटक
लासलगाव / वार्ताहर

पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रूळावर ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत रविवारी एकास ताब्यात घेण्यात यश मिळविले.
शनिवारी लासलगाव-कोटमगाव रेल्वेमार्गावर वसंत संभाजी शेजवळ (२७) या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. पोलिसांनी संशयावरून भोला उर्फ सागर भाऊसाहेब सस्कर (रा. लासलगाव) यास ताब्यात घेतले. मंगला शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत पैशाच्या देवाणघेवाणच्या वादातून भोलाने आपल्या पुतण्याचा खून केल्याचा आरोप केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी भोलाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

सध्याची काँग्रेस बापूंची नव्हे, तर पप्पूची - नितीन गडकरी
रावेर / वार्ताहर
सध्याची काँग्रेस बापूंची नसून पप्पू कलानी सारख्या गुंडांची असून देश सुखी व सुरक्षित करण्यासाठी भाजपला विजयी करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे केले. रावेर मतदारसंघातील भाजप बुथ प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. काँग्रेस मध्ये निवडणुका होत नसून नियुक्त्या होत असल्याने हा पक्ष म्हणजे एका परिवाराची मक्तेदारी आहे. ते फक्त मतपेटीचे राजकारण करतात, अशी टीका देखील गडकरी यांनी केली. लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार हरिभाऊ जावळे, मलकापूरचे आ. चैनसुख संचेती, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा परिषद अध्यक्ष मुरलीधर तायडे उपस्थित होते. लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपा उमेदवारास विजयी करावे. जिल्ह्य़ात भाजपची ताकद मोठी असून कुठल्याही पक्षाशी युती होवो अथवा न होवो आमची ताकद जिल्ह्य़ात असल्याने आमचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष आ. गिरीष महाजन यांनी व्यक्त केला. रावेर लोकसभा मतदार संघातील सुमारे १,५७७ पैकी ९८२ बुथ प्रमुख उपस्थित होते.

जायखेडा : बँक चोरी प्रकरणी कर्मचारी अटकेत
सटाणा / वार्ताहर

जायखेडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झालेल्या चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी तातडीने तपास करून बँकेच्याच कर्मचारी कांतीलाल सुकदेव अहिरे व त्याचा भाचा समाधान तुळशीराम वाघ यांना शिताफीने अटक केली. चोरीस गेलेली रक्कम सहा लाख ३२ हजार रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. दोघा आरोपींना येत्या ४ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायमूर्तीनी दिला. दरम्यान, जाधव यांना बजावलेल्या चोख कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख निखील गुप्ता यांनी रोख दहा हजार रुपयांचा पारितोषिक जाहीर केले आहे.

येवला बाजार समिती प्रक्रिया
गटातून लहरे अविरोध
येवला / वार्ताहर

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रक्रिया गटातून येवला खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद लहरे यांची अविरोध निवड झाली. प्रक्रिया गटासाठी भाटगावचे सरपंच वसंतराव पवार, किसनराव गडाळ, श्रीराम पाटील शिंदे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष कल्पना शिंदे, माधवराव पवार, शरद लहरे, उद्योगपती रामेश्वर कलंत्री, बाबासाहेब ढोले आदी आठ उमेदवारांनी प्रक्रिया गटातून उमेदवारी दाखल केली होती. तथापि, छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार लहरे यांच्या नावाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांची अविरोध निवड झाली. दरम्यान, महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना शिंदे या आपली नाराजी लपवू शकल्या नाहीत. निष्ठावंत पणे राष्ट्रवादी काँग्रेस मागे उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, पण यावेळी संधी मिळाली नाही असे त्या म्हणाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. राऊत, सहाय्यक व्ही. यू. बोरसे यांनी शरद लहरे यांच्या निवडीची घोषणा केली.