Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

भवताल

जंगल म्हणजे काय रे भाऊ?
अखेर वन विभागाला जाग आली आणि सोलापूरजवळील नान्नज अभयारण्यातील ग्लिरिसीडियाची झाडे तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ती तोडण्यास गेल्या वर्षी सुरुवात करण्यात आली. या वर्षीसुद्धा ही मोहीम कायम आहे. गवताळ प्रदेशात लावलेली झाडे तोडणे ही खरंतर अतिशय सामान्य व उपयुक्त बाब आहे, पण अभयारण्यातील झाडे तोडत असल्याचे ऐकून अनेकांना धक्का बसला.. या मोहिमेच्या निमित्ताने ‘जंगल म्हणजे नेमके काय?’ हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आला. वन खात्याच्याच एका विभागाने काही वर्षांपूर्वी खर्च करून लावलेली झाडे आता याच खात्याच्या दुसऱ्या विभागाकडून तोडण्यात येत आहेत, हासुद्धा या सर्व प्रक्रियेतील ठळक मुद्दा!

‘समस्या’ अंदमानच्या पर्यटनाची!
अंदमान बेटांवरील २५ टक्के- सुमारे दीड हजार चौरस किलोमीटर क्षेत्र कायद्याने आदिम समाजासाठी राखीव आहे. या कायदेशीर संरक्षणाइतकेच अंदमान-निकोबार बेटसमूहांबाबत सरकारचे आक्रमक पर्यटनविषयक धोरण सर्वज्ञात आहे. निकोबार समूह राखीव क्षेत्रात असल्याने त्याबाबत पर्यटनाची ‘समस्या’ अजूनतरी उद्भवलेली नाही. पण २००४च्या सुनामीमुळे घटलेला पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी अंदमानबाबत सरकारचे धोरण अधिक आक्रमक झाले. पर्यटनाची क्षमता असलेली आणखी काही बेटे खुली करण्याचा सरकारचा मानस आहे.

पुण्यातील वृक्षतोड आणि सुस्त प्रशासन!
प्रत्येक व्यक्ती हिरवाईचे महत्त्व जाणते. त्यामुळे निरनिराळय़ा पक्ष्यांचे सुखावह वास्तव्य, सूर्याच्या उष्णतेपासून मिळणारा थंडावा, मन:शांती आणि डेरेदार वृक्षांचे, फुलांचे सौंदर्य पाहण्यास, अनुभवण्यास कोणाला आवडणार नाही? पुण्यासारख्या शहरात वृक्षप्रेमींच्या अनेक ‘हिरवाई’ने नटलेल्या संस्था आहेत! परंतु पुण्यातील रस्त्यांवर विशेषत: पुणे-सातारा रोडवर तसेच शंकरशेठ रोडवर १९८६ पासून एकही झाड पुणे महापालिकेतर्फे लावले गेले नाही. बी.आर.टी. व निर्थक सायकल ट्रॅक करण्यासाठी प्रचंड पैसे हितसंबंधींकडून जनतेच्याच खिशातून उधळले जात आहेत.
सामान्य माणसाला वृक्ष लावण्यासाठी खासगी जागा उपलब्ध नाही, फ्लॅटच्या जंगलामुळे त्याचे आयुष्य हँगरला टांगलेल्या शर्टसारखे झाले आहे. पूर्वी वाडय़ांमध्ये पुण्यात खूप झाडी होती. आंबा, बकुळ, पेरू, सीताफळ, जांभूळ, शेवगा, पारिजात, नारळ ही मंडळी निरनिराळय़ा ॠतूंची जाण आपल्या फळाफुलांद्वारे आम्हाला लहानपणी करून द्यायची. या झाडांच्या संगतीत, त्यांच्या फांद्यांवर बसून आमचा लहानपणी अभ्यास चाले. मे महिन्यात नारळांच्या फांद्यांच्या वेण्या वळून त्या झोपडीत कॅरम, पत्त्यांचा डाव रंगत असे. उन्हाळय़ाच्या शेवटी जांभळे खुणावत, तर उन्हाळय़ात आंब्याचे झाड घरात स्वस्थ बसू द्यायचे नाही! त्यामुळे पुण्यातील सदाशिव पेठ सोडून कधी कोणत्या गावात चैनच पडायचे नाही. मात्र, सध्या कृत्रिम कुंडय़ा, कृत्रिम झाडे, फ्लॅटची शोभा केविलवाणीपणे वाढवत असतात!
पुणे महानगरपालिके चे उद्यान विभाग नावाचे एक स्वतंत्र वृक्षसंवर्धन करणारे खाते आहे. त्याचे अस्तित्व कार्यालयाचा परिसर सोडून इतरत्र जाणवत नाही. मी माननीय महोदयांना पुणे-सातारा रस्ता व शंकरशेठ रस्त्यावर वृक्ष लावण्यासंबंधी अनेक वेळा विनंती केली, परंतु अद्याप कोणतीही हालचाल नाही. पुणे-सातारा रोडवर येथे रुंदीकरण पूर्ण (?) झाले आहे. त्या ठिकाणी रेन ट्री किंवा कडुिलबाची झाडे १५० फूट अंतराने अद्याप न लावल्याने भर उन्हात स्वारगेटवर शाळेतील मुले, वृद्ध व्यक्ती उभी असतात. ३५ ते ४० वर्षांपूर्वी हाच सातारा रोड ३० ते ३५ फुटी काँक्रीटचा होता व दोन्ही बाजूंनी गर्द वडाची छाया होती, त्यामुळे या रस्त्यावरून जाताना थंडावा जाणवत असे.
शंकरशेठ रोड तर शापित रोड म्हणावा लागेल. या रोडवर फुटपाथ शोधावा लागतो. हा रस्ता रुंद न करताच त्यावर बी.आर.टी. पळवल्या जात आहेत. त्यात नागरिकांच्या हालात आणखी भर म्हणून दोन्ही बाजूंना सायकल ट्रॅक (सायकलींना निरुपयोगी ठरणारा) सिमेंट काँक्रीटने बांधला जात आहे. या भागात रस्त्याच्या कडेने झाडे लावण्यास भरपूर वाव आहे. परंतु महापालिकेच्या झोपलेल्या वृक्षसंवर्धन खात्यास कधी जाग येणार ते समजत नाही. झाडे लावून माणसांचे आशीर्वाद घेण्यापेक्षा फुटपाथ नवीन करणे, पुन्हा उखडणे, निरुपयोगी व वाहतुकीला अडथळे ठरेल, असा सायकल ट्रॅक बांधणे हे सुरू आहे. पुण्यात ज्या प्रमाणात उड्डाणपुलांची कामे, बी.आर.टी.ची कामे तसेच रस्ता आणखी अरुंद करणाऱ्या सायकल ट्रॅकची कामे चालू आहेत, त्या मानाने रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड अजिबात केली जात नाही हे कटू सत्य आहे. यासाठी आता नागरिकांनीच वृक्षसंवर्धन समिती स्थापन करून रस्त्याच्या कडेला झाडे लावून लोखंडी पिंजऱ्यामार्फत त्याचे रक्षण व संवर्धन केले पाहिजे. तरच आपण व पुण्यातील वाढत्या उन्हाळय़ाला अटकाव करू शकू व आपल्या भावी पिढीचे या वाढणाऱ्या उष्णतेपासून रक्षण करू!
त्यासाठी नामवंत संस्था व कंपन्यांचा सहभाग आवश्यक आहे. कारण वृक्षलागवडीत व जोपासण्यात ‘चराऊ कुरण’ नसल्याने पुणे मनपाकडून विधायक कामाची अपेक्षा न केलेली बरी!
अरुण भोगे, पुणे


बगिचा प्रकल्प

आपण दैनंदिन जीवनात निरनिराळय़ा कारणास्तव पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतो. एकदा वापरलेले पाणी पुन्हा उपयोगात आणत नाही. अशा प्रकारे वापरलेले पाणी मोरीत किंवा गटारामध्ये सोडतो. हे घाण पाणी नदी, नाले किंवा पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित करत असल्याने मानवी आरोग्यास अपायकारक आहे. ते तसेच वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी साचल्याने व त्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने पाणी दूषित होते. त्याच्यामुळे मच्छरांची मोठय़ा प्रमाणावर पैदास होऊन गावात साथीचे रोग पसरतात. परंतु याच सांडपाण्याचा आपण योग्य वापर केला तर प्रत्येक गावात बागबगिचे फुलतील, गावात रोगराई पसरणार नाही. परिणामी सर्वाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. गावातील या बगिचात लहान मुलांकरिता खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिल्यास मुलांचा वेळ सत्कारणी लागेल. मुले व्यसनाधीन होण्यापासून वाचतील. बगिचात वाचनालयाचीदेखील सोय करता येईल. त्यामुळे सर्वाना वाचनाची सवय लागेल. ग्रामस्थांना रटाळ आणि कंटाळवाण्या जीवनापासून मुक्ती मिळेल व त्यांचे मन प्रसन्न राहील.
प्रकल्प आराखडा-
१) अनेक गावांत सार्वजनिक नळ योजना कार्यान्वित झाल्याने बरेच पाणी वापरताना वाया जाते.
२) अशा वाया जाणाऱ्या पाण्याच्या पुनर्वापरासाठी विशेष ग्रामसभा बोलावून बगिचा प्रकल्पाची माहिती देणे.
३) प्रकल्पाच्या कामकाजावरील नियंत्रणासाठी ग्रामसमिती स्थापणे.
४) उन्हाळय़ात उपलब्ध होणाऱ्या सांडपाण्याच्या आधारे बगिचाचे क्षेत्रफळ ठरविणे.
५) ग्रामपंचायत किंवा शासनाच्या मालकीची जागा बगिचाकरिता देणे.
६) शासन स्तरावरून बगिचा प्रकल्पास अर्थसाहाय्य आणि तांत्रिक मदत मिळावी.
७) प्रकल्पाचे संपूर्ण काम ग्रामस्थांच्या श्रमदानातून पूर्ण करणे.
८) श्रमदानातून ५० टक्के, १० टक्के खर्च ग्रामपंचायत-ग्रामस्थांकडून, तर राज्य शासनाने ४० टक्के अर्थसाहाय्य करावे.
९) गावातील वाया जाणारे पाणी तसेच प्रत्येक घराचे सांडपाणी गावाबाहेर नेणे.
१०) नालीद्वारे गावाबाहेर नेलेले पाणी गाळून मुरूम, गोटे आणि रेती असलेल्या शोषखड्डय़ात सोडणे.
११) सामाजिक वनीकरण विभागाने आवश्यक ती रोपे अत्यल्प किमतीत उपलब्ध करून द्यावी व त्यांची पावसाळय़ात लागवड करावी.
१२) शुद्ध पाण्याचा वापर पवनचक्की किंवा विद्युतपंपाद्वारे सकाळी किंवा रात्री बगिचा ओलितासाठी करता येईल.
१३) बगिचाच्या कुंपणाकरिता साग, नीलगिरी किंवा बांबू यांसारख्या वृक्षांची लागवड करून भविष्यात ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळवता येईल.
१४) सांडपाण्याचा योग्य उपयोग केल्यामुळे गाव प्रदूषणमुक्त होईल. तसेच नदी, नाले, तलाव प्रदूषित होण्यापासून वाचतील.
अशा प्रकारे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बगिचा फुलेल. तलावामुळे गावात पाणीसमस्या निर्माण होणार नाही. त्यासाठी गरज आहे, राज्य शासनाच्या पुढाकाराची! तसेच ग्रामस्थांचा दृढ संकल्प, सर्वाचे सहकार्य, प्रत्येकाने अल्प आर्थिक हातभार लावण्याची!
कृष्णा झाडे, नागपूर