Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘आमची चळवळ उध्वस्त करण्याचा प्रयत्न हाणून पाडू’
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

महिलांना सक्षम करणारी बचतगटांची चळवळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरू केला

 

असला, तरी शहरातील हजारो महिला हा प्रयत्न हाणून पाडतील, असा इशारा महिलांनी दिला आहे. नागरवस्ती विभागाचे विकेंद्रीकरण करू नये, अशी मागणी करत आज शेकडो महिला आयुक्तांना भेटल्या आणि त्यांनी आयुक्तांना निवेदनेही दिली.
महापालिकेच्या नागरवस्ती विभागाचे विकेंद्रीकरण करण्याची घोषणा गेल्या आठवडय़ात आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्वसाधारण सभेत केल्यामुळे महिलांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शहरभरातून आलेल्या महिलांच्या अनेक शिष्टमंडळांनी या प्रकरणी आज आयुक्तांची भेट घेतली. महिलांना सक्षम करणारी ही चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न नगरसेवक करत असले, तरी तसे आपण होऊ देऊ नका, अशी मागणी या वेळी करण्यात आली. महिलांची प्रगती झालेली नगरसेवकांना पाहवत नाही, प्रत्येक कामासाठी लोकांनी आपल्याकडेच यावे असे त्यांना वाटते. पण शेजार समूह गटांमुळे नागरिक स्वत:चे प्रश्न स्वत:च सोडवू लागले आहेत. म्हणूनच ही चळवळ संपविण्याचा प्रयत्न होत आहे, असे या महिलांनी आयुक्तांना अगदी निर्भयपणे सांगितले. जनता वसाहतीतील प्रीती सोनावणे, सुनीता कांबळे, लक्ष्मी चव्हाण, सहकारनगरच्या रोहिणी नाईक, पानमळा वसाहतीतील रागिणी कांबळे, अनुराधा म्हस्के, तसेच हेमा गोरखे, जया घाडगे, लक्ष्मी चव्हाण, संगीता भुजबळ, घोले रस्ता विभागातील संगीता उभे, मंगला सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, दीपाली सणस, वैशाली पवार, मीना साळुंके यांच्यासह अनेक महिलांनी त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’शी बोलताना आज व्यक्त केल्या.
नागरवस्ती विभागामुळे आज आम्ही ताठ मानेने उभ्या आहोत. या विभागामुळेच महिलांना रोजगार आणि वस्तीत सन्मानही मिळाला आहे. कर्तव्यदक्ष राहून काम करत असलेल्या कळमकर साहेबांमुळे हे सारे घडले आहे. आमची प्रगती काही जणांना पाहवत नाही.
महिला आपल्या पुढे जाता कामा नयेत, असे अनेकांना वाटते. म्हणून काही जण प्रयत्न करत असले, तरी आम्ही आता हा अन्याय सहन करणार नाही, दडपशाहीला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया या महिला व्यक्त करत होत्या.
‘आमचे माहेर तोडण्याचा प्रयत्न’
नागरवस्ती विभाग हे आमचे माहेर आहे. आमचे माहेर तुटावे, मोडावे म्हणून कोण प्रयत्न करत आहे, हे आम्हाला चांगले माहिती आहे. मात्र शहरातील हजारो महिला आता संघटित झाल्या आहेत. त्यांना चांगले काय वाईट काय ते कळते. त्यामुळे विकेंद्रीकरणाच्या नावाखाली नागरवस्ती विभागाच्या तोडफोडीचे प्रयत्न झाल्यास महिला शांत बसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया महिलांमध्ये उमटली आहे.