Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पदाधिकाऱ्यांच्या मोटारी शासनदरबारी दाखल;
राजकीय प्रचाराचे फलक काढण्याचे आदेश
पुणे, २ मार्च / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडील मोटारी काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिले

 

असून पदाधिकाऱ्यांच्या सेवेतील काही मोटारी आज शासनदरबारी जमा करण्यात आल्या.
देशाच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश आयोगाने दिले असल्याने पदाधिकाऱ्यांकडील मोटारी काढण्यापासून राजकीय प्रचार फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दळवी यांनी दिल्या आहेत.
निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहितेत काय करावे आणि काय करू नये याची संहिता राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे. तसेच खातेप्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहितेत कोणती पथ्ये पाळायची याच्या सूचना देण्यात येणार आहेत. याशिवाय धोरणात्मक निर्णयांवर बंदी, मंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यांना प्रतिबंध आणि केवळ शासकीय कामांसाठीच वाहनांचा वापर यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार आहे. खासगी मालमत्तांवर प्रचारकी मजकूर लिहून त्यांचे विद्रुपीकरण करण्यालाही अटकाव घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्यात निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ एप्रिल रोजी विदर्भ, हिंगोली, नांदेड, परभणीमध्ये मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मतदान होणार आहे. दि. ३० एप्रिल रोजी कोकण व मुंबईतील मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता २ मार्च ते १६ मेपर्यंत लागू राहणार आहे. पुणे जिल्ह्य़ात बारामती, शिरूर, मावळ व पुणे असे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. या चार मतदार संघांसाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याचा प्रस्ताव आयोगाला सादर करण्यात आल्याचेही दळवी यांनी सांगितले.
पुण्यातील चार मतदारसंघांत ६६ लाख मतदार
मतदार संघ पुनर्रचनेत पुणे जिल्ह्य़ातील लोकसभा मतदारसंघांची संख्या एकने वाढून चार झाली आहे. मावळ, पुणे, बारामती व शिरूर असे हे चार लोकसभा मतदारसंघ असून त्यातील मतदार संख्या तब्बल ६६ लाख १९ हजार ४९७ इतकी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, कर्जत व उरण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. या तीन विधानसभा मतदारसंघातील ७ लाख २४ हजार मतदार धरून मावळमध्ये १६ लाख ४३ हजार ४०८ मतदार आहेत. पुण्यामध्ये १७ लाख ७६ हजार ५५३ मतदार, बारामतीमध्ये १५ लाख ८८ हजार ५१६ मतदार व शिरूर लोकसभा मतदारसंघात १६ लाख ११ हजार २० मतदार आहेत. या चारही मतदारसंघांत ६ हजार ६६९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
मतदार नोंदणी करता येणार..
मतदार नोंदणीची प्रक्रिया ही निरंतर आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेत मतदार नोंदणीचे अर्ज दिले जातात. या अर्जासोबत १ जानेवारी २००९ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्याचा व निवासाचा पुरावा दिल्यावर नोंद करता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत मतदार नोंदणीचा लाभ घेता येणार आहे.