Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

रस्त्याने चाललेली महिला गटारात पडते तेव्हा..
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

पायी चाललेली एक महिला आज दुपारी उघडय़ा गटारात पडली. तब्बल दोन तासांनंतर तिचा शोध लागला. सांडपाण्यातून वाहून जाऊनही ती बचावली असून, या प्रकारात तिला किरकोळ दुखापत झाली. वारजे माळवाडी येथे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर वर्धमान पेट्रोलपंपाजवळील दोडके टॉवर्सच्या

 

समोर सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
संगीता सुरेश गायकवाड (वय ४५) असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ती वारजे परिसरात भीक मागून आपला चरितार्थ चालविते. आज दुपारी अशाच विमनस्क अवस्थेत भटकत असताना झाकण नसलेल्या ‘मॅनहोल’मधून ती भुयारी गटारात पडली. रस्त्यावरील अनेकांनी हे दृश्य पाहिले. तेथील रस्त्यावरून चाललेल्या योगेश हरिभाऊ कुंभारे यांनी याबाबतची माहिती वारजे पोलिसांना कळविली. त्यानंतर वारजे पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक एन.आर. जगताप, सहायक फौजदार एस.ए. गायकवाड व महिला पोलीस शिपाई एस.बी. जाधव, तसेच महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचारी आदी घटनास्थळी पोहोचले. सव्वाअकराच्या सुमारास अग्निशामक दलाला या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर दलाचे सात कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच तिचा शोध सुरू झाला; परंतु मॅनहोलजवळ तिचा मागमूसही लागला नाही. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील अनेक गटारांची झाकणे उघडून गायकवाड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा शोध लागला नाही. पडल्याने जखमी होऊन ही महिला वाहत गेली असावी, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आणि मग सुरू झाला भुयारी गटाराच्या प्रत्येक मॅनहोलजवळ तिचा शोध! या प्रयत्नात अग्निशामक दलाचे जवान अगदी नदीकाठापर्यंत जाऊन आले; परंतु तरीही तिचा शोध लागला नाही. त्यामुळे दलाचे जवान पुन्हा माघारी परतले. त्यावेळी घटनास्थळाजवळच दुसरे मॅनहोल मातीखाली दडले असल्याचे वारजेतील रहिवाशी अमोद वडके, मनोज बराटे, आलम पठाण, युसूफ बागवान यांच्या लक्षात आले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी ते उघडून शोध घेता गटारात गायब झालेल्या या दुर्दैवी महिलेचा शोध लागला. ती बेशुद्ध होऊन पाण्यात पडली होती. जवानांनी तिला बाहेर काढले व त्यानंतर पोलिसांनी तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.