Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पिंपरीत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर भालेराव बिनविरोध
पिंपरी, २ मार्च / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ज्ञानेश्वर भालेराव यांची आज बिनविरोध निवड झाली. ज्येष्ठता, ओबीसी फॅक्टर आणि आकुर्डी ग्रामस्थांच्या एकीचे पाठबळ लक्षात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांनी भालेराव यांच्या नावावर

 

शिक्कामोर्तब केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा घोळ न सुटल्याने भालेराव यांच्यासह पक्षनेते जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे आणि सूरदास गायकवाड या चारजणांचे अर्ज दाखल करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली होती. गेल्या तीन दिवसांत उमेदवाराच्या नावाविषयी एकमत होऊ शकले नाही. अखेर, तणावपूर्ण शांततेत आज सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा पक्षाचे निरीक्षक घनश्याम शेलार यांनी भालेराव यांचा अर्ज कायम ठेवून इतरांचे अर्ज माघारी घेण्याचा अजितदादांचा निरोप आणला. आपल्याला डावलण्यात आल्याचे समजताच शेट्टी, शितोळे, गायकवाड आणि त्यांचे मोठय़ा संख्येने जमलेले समर्थक प्रचंड नाराज झाले. मावळत्या अध्यक्षा उषा वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी काम पाहिले.
शहराध्यक्ष आझम पानसरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भालेराव हे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी सुतार समाजाचे संघटन आणि ओबीसींच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याची दखल अजित पवार यांनी यापूर्वीच घेतली होती. त्यात भालेराव यांना आकुर्डी ग्रामस्थांच्या एकजुटीचे प्रचंड पाठबळ मिळाले. आतापर्यंत आकुर्डीकरांवर सातत्याने अन्याय होत असल्याने किमान भालेराव यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, यासाठी आकुर्डीकरांनी स्थानिक नेत्यांना साकडे घातले होते. मुख्य स्पर्धेत असलेल्या शेट्टी की भालेराव यापैकी कोणाचे नाव घ्यायचे, असा प्रश्न पानसरे यांच्यासमोर होता. तरीही निर्णायक क्षणी त्यांनी भालेराव यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले. पवार यांनी यंदाच्या वर्षी भालेराव यांची निवड केली असल्याने पुढील वर्षी अध्यक्षपदाची दिग्गजांमध्ये स्पर्धा होणार असल्याचे स्पष्ट संकेत आतापासून मिळू लागले आहेत.
भालेराव हे आकुर्डी गावठाणातील वॉर्डातून निवडून आले आहेत. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. पहिल्याच वर्षी त्यांना अ प्रभागाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर २००२ मध्ये त्यांच्यावर पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य, पक्षाचे मुख्य सरचिटणीस आणि प्रवक्तेपदाचे कामही त्यांनी यापूर्वी केले आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.