Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या चौकांत चॅनेलाईजरची आवश्यकता
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

शहरातील बहुतांश चौकांची रुंदी वाढल्याने वाहतुकीसाठी हे चौक उत्तम होत असले, तरी पादचारी व

 

सायकलस्वारांसाठी तितकेच धोकादायक झाले आहेत. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी या चौकामध्ये चॅनेलाईजर (फायबरचे अडथळे) लावण्याची गरज ‘पादचारी प्रथम’ संघटनेने व्यक्त केली आहे. त्यानुसार सध्या जेधे चौक व पौडफाटा चौकामध्ये ही व्यवस्था राबविण्यात आली आहे. मात्र ही व्यवस्था कायम करून ती सर्वच चौकांत राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश वर्दळीच्या चौकामध्ये पादचाऱ्यांना चौक ओलांडण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असतात. त्याचप्रमाणे सायकलस्वारांनाही चौकातून पुढे जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रुंदीकरणानंतर अनेक चौक मोठे झाल्याने बेदरकारपणे चौकातून वाहने पुढे नेली जातात. त्याचप्रमाणे पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र सिग्नलही अनेक ठिकाणी नाहीत. या सर्व समस्यांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने पादचारी प्रथम संघटनेचे प्रशांत इनामदार यांनी चॅनेलाईजरचा उपाय सुचविला होता. त्याबाबत त्यांना महापालिका आयुक्त व वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना पत्रही पाठविले होते.
इनामदार यांनी केलेल्या मागणीनुसार प्रथम पौडरस्ता चौकामध्ये चॅनेलाईजरची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सध्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या स्वारगेट येथील जेधे चौकामध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. पादचाऱ्यांना चौक योग्य पद्धतीने व सुरक्षितरीत्या ओलांडता येईल, यानुसार हे चॅनेलाईजर बसविण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे चौकाच्या मधोमध गोलाकार पद्धतीने चॅनेलाईजर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहने योग्य पद्धतीने त्याला वळसा घालून जाऊ शकतात. त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडीही होत नाही. याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे वर्दळीच्या चौकामध्ये पादचारी व सायकलस्वारांना हा गोलाकार भाग एखाद्या बेटाप्रमाणे वापरता येतो. वाहनांची वर्दळ सुरू असताना या भागामध्ये पादचारी सुरक्षितपणे थांबू शकतात, असे इनामदार यांनी सांगितले.
चौकामध्ये हे चॅनेलाईजर सध्या तात्पुरत्या अवस्थेत बसविण्यात आले आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही व्यवस्था कायम करण्यात यावी, अशी मागणी इनामदार यांनी महापालिका आयुक्त व वाहतूक शाखेकडे केली आहे.