Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जीवनातील जगण्याचे प्रतिबिंब म्हणजे ‘लोकसंस्कृती’ - डॉ. देखणे
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

जगण्यातील स्वाभाविकता म्हणजे जीवन आणि जीवनातील जगण्याचे प्रतिबिंब म्हणजे ‘लोकसंस्कृती’

 

होय. राजेंद्र माने लिखित ‘लोकसंस्कृतीचा गाभारा’ या पुस्तकातून मानवी समाजाचे स्वाभाविकपणे जगण्याचे भावविश्व उमटले आहे. त्यामुळे हा लोकगाभारा खऱ्या अर्थाने समृद्ध व लोकमनाला भावणारा झाला आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांनी आज व्यक्त केले.
अक्षरयात्रा प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘लोकसंस्कृतीचा गाभारा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ८२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी, मधु नेने, अक्षरयात्राचे संचालक मिलिंद माने उपस्थित होते.
डॉ. देखणे म्हणाले की, लोककला, लोकनाटय़, लोकगीत, लोककथा, जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी, पाळणा, भारूड, लावणी ही सर्व लोकसंस्कृतीची प्रतीके राजेंद्र माने यांनी पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडली आहेत. जेथे स्वाभाविकता हरपते तेथे लोकसंस्कृती लोप पावते. त्यामुळे लोकसंस्कृतीचे संशोधन भावदर्शी व तत्त्वदर्शी व्हायला हवे, मात्र तत्त्वदर्शी संशोधनातून उत्तरे स्पष्ट व्हावीत. त्यामुळे लोकसंस्कृती जनमानसात रुजेल. लेखक माने यांच्या लेखणीतून ही अर्थपूर्ण उत्तरे स्पष्ट झाली आहेत. महाराष्ट्रातील वाचक त्याचे कौतुक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ढेरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील जनतेचा जगण्याचा गाभा असलेली ही लोकसंस्कृती माणसाच्या भावजीवन व सुखदु:खाचा नैसर्गिक संच आहे. माने यांच्या लेखणीतून जुन्या संचितांचा प्रत्यय वाचकांच्या लक्षात येईल.
लेखक राजेंद्र माने, मधु नेने व प्रा. मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विराज वारुंजीकर यांनी केले व आभार मानले. ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी सूत्रसंचालन केले.