Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘बसपा राज्यामध्ये स्वबळावरच निवडणूक लढविणार’
पुणे, २ मार्च/ प्रतिनिधी

‘‘बहुजन समाज पक्षाबरोबर निवडणुकीत युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची मंडळी तयार आहेत. मात्र, आम्ही राज्यामध्ये स्वबळावरच निवडणूक लढविणार आहोत. सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत मात्र नंतर कोणत्यातरी पक्षाला बरोबर घेऊ’’, असे स्पष्टीकरण बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी

 

आज येथे दिले.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आज पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गरूड पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पक्षाची वाढती ताकद पाहून हे दोन्हीही पक्ष त्यांच्या मित्र पक्षांना सोडायला तयार आहेत. मात्र, आपण स्वबळावरच लढणार आहोत.’’ अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे बसपमध्ये विलीनीकरण करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘बसपमध्ये विलीनीकरण करण्याबाबत अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. त्यांचा पक्ष बसपमध्ये विलीन करण्यास आपची तयारी आहे. त्यांना दक्षिण मध्य मुंबईतील एक जागा सोडण्याचा विचार आहे.’’
गवळी यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेता राज्यात पक्षाला तोटा होईल, असे वाटते का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘पक्षाला कोणताही तोटा होणार नाही. गवळी गुन्हेगार आहेत की नाही ते निवडणूक आयोग ठरविणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मागे त्यांचे सहकार्य घेतले होते. तेव्हा ते गुन्हेगार नव्हते काय ? आमच्या पक्षाची धोरणे स्वीकारून ते पक्षात येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या पाश्र्वभूमीचा पक्षाला तोटा होणार नाही.’’
कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यात बोलतानाही गरूड यांनी स्वबळावरच निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात सर्व समाजाला घेऊन केलेले नियोजन संपूर्ण देशामध्ये राबविण्याचे पक्षाचे धोरण आहे. समाजमुलक समाजरचना निर्माण करण्याचे पक्षाचे ध्येय आहे, असे गरूड यंनी सांगितले. पक्षाचे प्रदेश महासचिव किरण अल्हाट, पुणे जिल्हाध्यक्ष श्यामराव कांबळे आदी त्या वेळी उपस्थित होते.