Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उन्हाच्या झळांबरोबर ‘गरिबांच्या फ्रीज’ला वाढती मागणी
हडपसर, २ मार्च/वार्ताहर

उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्यामुळे थंड पाण्यासाठी हवा असणारा गरिबांचा ‘फ्रिज’ आता सर्वानाच हवाहवासा वाटू लागला आहे. या फ्रिजची खरेदी करण्यासाठी एकेकाळी कुंभारवाडय़ाकडे

 

जावे लागत असे. परंतु शहराचा विस्तार वाढला आणि कुंभारवाडय़ात तयार होणारे माठ आता शहराबाहेर तयार होऊ लागले आहेत. सोलापूर, पंढरपूर या ठिकाणाहून माठांची खरेदी करून शहराच्या मध्यवस्तीसह हडपसर, वडगावशेरी, मांजरी बुद्रुक, मगरपट्टा, मुंढवा, फुरसुंगी, वानवडी, कोंढवा बुद्रुक आदी परिसरामध्ये हातगाडीवर माठ घेऊन विक्री सुरू झाली आहे. या माठांची विक्री करणारे सोलापूर रस्ता, नगर रस्ता, पुणे-मुंबई रस्ता अशा गर्दीच्या ठिकाणी विक्री करू लागले आहेत.
उन्हाळा सुरू झाला की, घरातील माणसांसह बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसह सर्वजण आता तांब्याभर थंड पाण्याची मागणी करतात. यासाठी शहरवासीयांसह ग्रामीण भागातील सधन नागरिकांनी आता गरिबांचा ‘फ्रीज’ घरामध्ये आवर्जून ठेवला आहे. माठातील पाण्याची चव औरच आहे. फ्रीज आता प्रत्येकाच्या घरामध्ये दिसत असला, तरी उन्हाळ्यामध्ये माठामधील पाण्याची मागणी केली जात आहे. एकेकाळी खेडेगावासह शहरातही सार्वजनिक ठिकाणी मोठे माठ आणि रांजण पाण्याने भरलेले असत. आता कल्पकता लढवून अनेक वेगवेगळ्या आकाराचे माठ बाजारात आणले आहेत. पारंपरिक गोल आकाराबरोबरच आता मोर, चिमणी, गोमुखी असे प्रकार लोकप्रिय होऊ लागले आहे. गारवा जास्त टिकवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे काळ्या माठास जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कितीही कडक उन्हातून घरी परतल्यावर माठाचे पाणी हे मनाला तजेला देते. मात्र फ्रीजमधील पाण्यामुळे सर्दी, खोकला आदी आजारांना एकप्रकारे आमंत्रणच असते. हे पाणी हृदयरोग्यांनासुद्धा हानीकारक मानले जाते. मात्र माठातील पाण्यापासून कोणतेही दुष्परिणाम संभवत नाहीत, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.