Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
पुणे, २ मार्च / प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाचा ‘पेपर’ अवघड गेल्याने नैराश्य आलेल्या विद्यार्थिनीने विष पिऊन आत्महत्या केली. लोणी काळभोर येथे म्हातोबाची आळंदी या गावामध्ये आज सकाळी साडेअकराच्या

 

सुमारास ही घटना घडली.
ललिता कुमाजी शिवरकर (वय १८, रा. कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. म्हातोबा माध्यमिक विद्यालयामध्ये ती कला शाखेत शिकत होती. अभ्यासात हुशार असूनही ललिता हिने आत्महत्या केल्याने तिच्या नातेवाईकांना धक्का बसला. ललिता हिचा भाऊ नीलेश याने या घटनेविषयी माहिती देताना सांगितले, ‘‘काही दिवसांपूर्वी ललिता हिचा बारावीच्या परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला होता. मात्र, हा पेपर अवघड गेल्याने ललिताला प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळे ती रविवारचा संपूर्ण दिवस रडत होती. तिला अशा अवस्थेत पाहून मी समजावलेही होते.’’
ललिता ही सोमवारी सकाळी घरामध्ये एकटी असताना तिने विष प्यायले. दुपारी पावणेबाराच्या सुमारास नीलेश घरी आला असता, त्याने ललिताला बेशुद्ध अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्याने तिला तातडीने कुंजीरवाडीतील दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथे डॉ. वानखेडे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यानंतर तिला हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला नीलेशला दिला.
ललिताला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी साहेबराव शिंदे यांनी दिली. त्यानंतर, वैद्यकीय उत्तरीय तपासणीसाठी ललिताचा मृतदेह वानवडी येथील कमांड हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत लोणी-काळभोर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत होता.