Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘जिद्द, चिकाटीवर यश नक्की’
हडपसर, २ मार्च/वार्ताहर

‘नव्या पिढीला जात-धर्म-पंथ, गरीब-श्रीमंत, मुलगा-मुलगी अशा कुठल्याही ‘ट्रेंड’ची गरज नाही. जिद्द, चिकाटी, अभ्यास करण्याची तयारी असल्यास यश नक्कीच मिळेल,’ असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे

 

सहसंपादक संजय आवटे यांनी केले.
हडपसर-महादेवनगर येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी विद्यालयाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब तुपे, संचालक एस. बी. पाटील, दिलीप खानवरे, उज्ज्वला टिळेकर, अखिल भारतीय जाणीव संघटनेचे बाळासाहेब भिसे, गणपतराव मोरे उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात आवटे बोलत होते.
परिवर्तनाची संधी प्रत्येकाला मिळत असते, ती शोधण्याची नजर तुमच्याकडे असायला हवी. एकेकाळी विशिष्ट समाजातील, धर्मातील लोकांसाठी शिक्षण घेण्याची मक्तेदारी होती. आता सर्वासाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. सामान्यातला सामान्य माणूस काय करू शकतो हे ‘बराक ओबामां’च्या उदाहरणावरून कळते. शिक्षणामुळे नव्या संधी शोधता येतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी ठरते. समाजाला नव्या पिढीकडून मोठय़ा आशा आहेत. अमेरिकेबरोबर स्पर्धा करण्यासाठी नवी पिढी सज्ज आहे. तल्लख आणि हुशार असणाऱ्या या तरुण पिढीला प्रोत्साहन दिले पाहिजे. गरीब, श्रीमंत, जात, धर्म यांचा माणूस घडवण्यासाठी आधार लागत नाही. पूर्वीच्या काळी समस्या, अडचणी होत्या, आज त्याचे स्वरूप बदलले आहे. आजही समस्या आहेत परंतु त्यावर मात करण्यासाठी तरुण पिढी सक्षम असल्याचे आवटे यांनी या वेळी सांगितले.
मुख्याध्यापक ए. बी. हुली यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब झांबरे यांनी, तर आभारप्रदर्शन बाळासाहेब ढोरमारे यांनी केले.