Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘एसकेएफ’च्या कामगारांची वेतन करार मसुद्याला मान्यता
कामगारांना १४ महिन्यांचा फरक मिळणार!
पिंपरी, २ मार्च / प्रतिनिधी

चिंचवड येथील एसकेएफ बेअरिंग इंडिया या बहुराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापनाबरोबर उत्पादन वाढीशी निगडित वेतन करार करण्यास ‘एसकेएफ बेअरिंग इंडिया एम्लॉईज युनियन’ला सर्वसधारण सभेत

 

कामगारांनी बहुमताने मान्यता दिली.
सन २००९ ते २०११ या तीन वर्षांच्या करारास मान्यता देण्यात यावी, या संदर्भात एसकेएफ कंपनीतील कामगार संघटनेची विशेष सर्वसाधरण सभा प्र. के. अत्रे सभागृह, संत तुकारामनगर येथे सोमवारी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष सतीश उनकुले होते, सरचिटणीस संतोष नायर, सहचिटणीस एरोल परेरा, खजिनदार सतीश जांभळे, उपाध्यक्ष रघू अमिन, मर्विन डिसा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या सभेमध्ये पगार व इन्सेन्टिव्ह मिळून चार हजार पगार वाढ, दोन ते तीन टक्के उत्पादन वाढ, एकंदर वर्षांमध्ये ८४ दिवसांचा ब्लॉक क्लोजर, हक्काची रजा, दीर्घ मुदतीची रजा, बोनस अशा विविध मागण्यांच्या मसुद्यावर सह्य़ा करण्यास कामगारांनी बहुमताने मान्यता दिली. या कराराच्या मसुद्यावर उद्या दुपारी तीन वाजता कंपनीच्या आवारात स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत.
मंदीचा काळ व मशिन दुरुस्ती या कारणासाठी कंपनीने एकंदर वर्षांसाठी ८४ दिवसांचा ब्लॉक क्लोजरची या करारात तरतूद केली आहे, परंतू कंपनीला आवश्यकता भासल्यास दरमहा सहा दिवसप्रमाणे त्याचा वापर करेल,कामगारांच्या वेतनावर कोणताही फरक पडणार नाही.
या करारामुळे कामगारांना १४ महिन्यांचा फरक मिळणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ऐन मंदीच्या तोंडावर करार होत असल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.याप्रसंगी अध्यक्ष उनकुले, नायर, आदींची भाषणे झाली.