Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

खोडद येथील विज्ञान प्रदर्शनास हजारो विज्ञानप्रेमींची भेट
नारायणगाव, २ मार्च/वार्ताहर

ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक व वैज्ञानिक विचारांमध्ये प्रगती व विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा या हेतूने खोडद (ता. जुन्नर) येथील जी. एम. आर. टी.ने विज्ञानदिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनास सुमारे ११ हजार विद्यार्थी व विज्ञानप्रेमींनी माहिती घेतली, अशी माहिती जी.एम.आर.टी.चे

 

प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले, यावेळी प्रा. राजाराम, प्रा. सैकीया, प्रा. मोहन आपटे, श्री. गुरुप्रसाद सोळंकी, सरपंच व खोडदचे मान्यवर, नारायणगाव व परिसरातील शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दि. २८ व १ मार्च रोजी सुरू असलेल्या विज्ञान प्रदर्शनाला मोठय़ा मेळाव्याचे स्वरूप आले होते. या प्रदर्शनात शाळा, महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय या गटात स्पर्धा घेण्यात आल्या. या प्रदर्शनात जगातील सर्वात मोठी असलेली जी.एम.आर.टी. रेडिओ दुर्बीण, तिच्या विविध प्रणाली यांची माहिती, रेडिओ अ‍ॅस्ट्रनामी या इतिहासाची माहिती, विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये शास्त्रज्ञांशी थेट संपर्क साधून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, एन.ई.आर.ए.च्या सर्व शास्त्रज्ञांनी प्रश्नांची उत्तरे दिली. सूर्य व सुपरनोव्हाचे थेट निरीक्षण या प्रदर्शनात दाखविण्यात आले.
आघारकर संशोधन संस्था व वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट पुणे यांच्यावतीने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती दिली.
इस्रो बेंगलोर, नॅशनल एड्स रीचर्स संस्था पुणे, आयआयटीएम पुणे, नवनिर्मिती मुंबई, पुणे विद्यापीठ भूशास्त्र विभाग, डॉ. कल्पना चावला, विज्ञान केंद्र कराड, लिटल न्यूटन ग्रुप चाकण-पुणे, खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र, आकाश मित्र मंडळ आदी २३ संस्थांचे प्रकल्प या प्रदर्शनात पाहावयास मिळाले.
पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व भोर तालुक्यातील सुमारे ३० शाळा, महाविद्यालयांचे एकूण ८० प्रकल्प या प्रदर्शनात सहभागी झाले होते.
अशोक बुक स्टॉल, नॅशनल बुक ट्रस्ट, युरेका सायन्स सेंटर, अभिषेक टाइप सेटर्स यांच्या वतीने विविध पुस्तके, वैज्ञानिक खेळणी तसेच अन्न पदार्थाचे स्टॉल या ठिकाणी उपलब्ध होते, वैद्यकीय सुविधा देखील ठेवण्यात आली होती.
डॉ. मोहन आपटे, श्री. गुरुप्रसाद, प्रा. योगेश शौचे, डॉ. योगेश वाडदेकर, अरविंद गुप्ता, आनंद घैसास, डॉ. विद्यासागर, पराग महाजनी आदींची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.