Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकरांना गरज आहे मदतीच्या हातांची
पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू
मंचर, २ मार्च/वार्ताहर

गेली पन्नास दशके तमाशासृष्टीत खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा बिलंदर कलावंत

 

वगसम्राट म्हणून उपाधी मिळविलेले लोकनाटय़कार चंद्रकांत ढवळपुरीकर केवळ औषधोपचारासाठी पैसे नसल्याने पुणे येथील सरकारी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत
आहेत.
दरम्यान, तमाशा फडमालक असलेल्या चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशा फडावर तीस लाख रुपयांहून अधिक कर्जाचा बोजा असून, कर्जबाजारीपणामुळे वडिलांवर पैशाअभावी औषधोपचाराचा खर्च करणे शक्य नसल्याचे चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे सुपुत्र किरण ढवळपुरीकर यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
१९७० ते १९८० सालच्या कालखंडात संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरसह चंद्रकांत ढवळपुरीकर या जोडगोळीने तमाशारसिकांना अक्षरश भरभरून हसविले आणि लोकप्रबोधनातून लोकशिक्षणाचे धडेही दिले. विशेषत भिल्लांची टोळी, गवळ्याची रंभा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ही चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशात गाजलेली काही वगनाटय़े. संत तुकाराम हे वगनाटय़ सादर होत असताना स्टेजसमोर बसलेला प्रेक्षकवर्ग ढसढसा रडायचा. असा हा वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर वार्धक्यात जीवनाच्या अंतिम घटका अत्यंत हलाखीत घालवत आहे. सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याने खऱ्या अर्थाने अनेक तमाशा फडमालक धुळीस मिळाले. चंद्रकांत ढवळपुरीकरांचे सध्या वय ८० वर्षे असून, सद्यस्थिती पाहता सुमारे तीस लाख रुपये कर्जाच्या ओझ्याखाली अगोदरच दबलेल्या ढवळपुरीकरांना आता मात्र कर्जबाजारीपणामुळे औषधोपचारावरील खर्च करणेदेखील अवघड झाले आहे.
तमाशासम्राज्ञी विठा भाऊ नारायणगावकर या तमाशासम्राज्ञीची या वेळी आठवण झाल्यावाचून राहात नाही. कारण विठाबाईंचा वार्धक्यातील कालखंडदेखील असाच हलाखीत गेला. लोककलेतून मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षण, समाजप्रबोधन करण्यासाठी आपले अखंड आयुष्य वेचलेल्या वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकरांच्या वृद्धापकाळातील उपेक्षा पाहून अनेक तमाशा फडमालक आणि कलावंत यांच्यात चिंता व्यक्त होत आहे.
वास्तविक पाहता लोकरंजनातून मराठी संस्कृती आणि सांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या लोककलावंतांसाठी शासनाने अद्यापही गांभीर्याने पाहिले नाही. तमाशा फडमालकांना पॅकेज देण्याची घोषणा तमाशाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र पॅकेजची घोषणा हवेतच विरली. चंद्रकांत ढवळपुरीकरांसारख्या जातिवंत बिलंदर कलाकाराच्या उपचारासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा ढवळपुरीकरांच्या अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या काळात तमाशातील वगनाटय़ात काम करत असताना चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी चंद्राराव मोरे, गणोजी शिर्के, दादम भट्ट, रंगमल महाराज, गावचा पाटील अशा विविध भूमिका रंगवल्या.
प्रेक्षक त्यांना चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणाऱ्या निळू फुलेंची उपमा देत असत. दहा वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंद्रकांत ढवळपुरीकरांनी स्टेजवर काम करायचे बंद केले. १९६४ सालानंतर दत्ता महाडिक पुणेकरांबरोबर चंद्रकांत ढवळपुरीकरांचे चांगलेच सूत जमले आणि दोघांनी मिळून संयुक्त तमाशा फडाची स्थापना केली.
संत तुकाराम आणि गवळ्याची रंभा या वगनाटय़ांचे गावोगाव प्रयोग सादर करून तमाशा प्रेक्षकांची मने या जोडगोळीने जिंकली. राज्यातील आघाडीचा तमाशा म्हणून चंद्रकांत ढवळपुरीकरसह दत्ता महाडिक पुणेकर तमाशाने लोकप्रियता मिळवली.
महाराष्ट्र शासन आणि पुणे महापालिकेने चंद्रकांत ढवळपुरीकरांचा गौरवदेखील केला. तमाशासृष्टीत काम करत असताना त्यांना आतापर्यंत विविध प्रकारचे वीस पुरस्कार मिळालेले आहेत.
१९९९ पासून खऱ्या अर्थाने ढवळपुरीकरांच्या हालअपेष्टांना सुरुवात झाली. त्यातच त्यांची एक किडनी निकामी झाली आहे. त्यांना श्वसनाचादेखील त्रास होत आहे. खासगी दवाखान्यात पैसे जास्त खर्च होतात म्हणून त्यांना पिंपरी (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रंगमंचावर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे तमाशासम्राट चंद्रकांत ढवळपुरीकरांना पैशाअभावी चांगल्या दर्जाचे उपचार घेणे शक्य नाही. आता शासनानेच या कलाकाराच्या उपचारासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.