Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लबाड सत्ताधीशांना निवडणुकीत धडा शिकवा - आढळराव पाटील
तळेगाव दाभाडे, २ मार्च/वार्ताहर

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाखाली कर्जमाफी करून घेतली. परंतु गरीब शेतकऱ्यांना त्याचा

 

फायदा होण्याऐवजी सत्ताधारी पक्षांच्या धनदांडग्या शेतकऱ्यांचाच फायदा करून घेतला. मात्र कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाचार केले. अशा लबाड सत्ताधीशांना आगामी निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगवडे (ता. मावळ) येथे केले.
खासदारांच्याच प्रयत्नातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सांगवडे ते सोमाटणे या साडेनऊ कि.मी. लांबीच्या व सुमारे ३ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविताना खासदार म्हणाले, की या सत्ताधारी पक्षांच्या मंडळींनी जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांना धाक दाखवून प्रकल्पग्रस्त बनविण्यात धन्यता मानली. जनतेचे प्रश्न सोडविण्यात त्यांना रस नाही तर केवळ विकासकामांचा देखावा करण्यासाठी मोठय़ा खर्चाच्या कामांची भूमिपूजने करणे हेच त्यांनी १० वर्षांत (स्वार्थी हेतूने) केले. प्रश्न सोडविण्याऐवजी प्रश्न वाढविण्यात त्यांना रस आहे. म्हणूनच गरज नसताना पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी थेट बंद जलवाहिनी प्रकल्प राबविण्याचा घाट घालून मावळातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचा भविष्यकाळ उद्ध्वस्त होणार सतेच औद्योगिकीकरणाच्या नावाखाली खेड, मुळशी व मावळमधील जमिनी संपादित करण्याचा सपाटा लावला आहे. विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी, असे यांनी सांगितले. समारंभास आमदार दिगंबर भेगडे व शरद ढमाले, माजी आमदार प्रकाश देवळे व गजानन बाबर, पिं.चिं. शहर शिवसेना प्रमुख भगवान वाल्हेकर, मावळ सेना प्रमुख मच्छिंद्र खराडे, उपप्रमुख राजेंद्र नवले, जि.प. सदस्य प्रशांत ढोरे, मावळचे माजी उपसभापती शरद हुलावळे, माजी जि.प. सदस्य भरत मोरे, सुनंदाताई आबळे इ. मान्यवर उपस्थित होते.
याच दिवशी सोमाटणे येथील सभा मंडपाचे भूमिपूजन व वार्ताफलकाचे अनावरण खासदारांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत भारत ठाकूर यांनी केले तर आभार शांताराम भोते यांनी मानले.