Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

चोरटय़ाकडून साडेतीन किलो चांदी व साडेतीन तोळे सोने जप्त
लोणावळा, २ मार्च/वार्ताहर

रेल्वे व मध्यम वस्ती भागात सतत लहान-मोठय़ा चोऱ्या करणारा सुनील अंकुश पाटील (वय २४, रा.

 

काजळा, तालुका व जिल्हा उस्मानाबाद, सध्या रा. कान्हेफाटा) यास लोणावळा शहरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अटक केली. त्याचे चार साथीदार अद्याप फरार आहेत. लोणावळा ते पुणे दरम्यान १५ लहान-मोठय़ा चोऱ्या केल्याची कबुली आरोपी पाटील देत आहे. त्याच्याकडून साडेतीन किलो चांदी व साडेतीन तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर सोने व चांदी मागील महिन्यात आनंदनगर कुरवंडे येथील शंकराच्या पिंडीवरील चांदीचा नाग तसेच ३१ डिसेंबरच्या रात्री अमरजा किशोर दाभाडे (रा. नवी मुंबई) याच्या लोणावळा येथील बंगल्यातून व अन्य ठिकाणाहून चोरल्याचे त्याने सांगितले.
चोरलेला माल हा लोणावळा व कामशेत येथे आपण सराफांना विकत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या अन्य साथीदारांची टोपण नावे असल्याने तपासास गती मिळत नसली तरी लवकरच आपण त्यांचा शोध लावू असा विश्वास पोलीस निरीक्षक सुदाम दरेकर यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार रफीक शेख, दिलीप होले, संदीप होले, शशिकांत वाघ, शेखर शिंदे, जयसिंग जाधव, शरद बांबळे, दिलीप कदम, राजाराम कोकणे यांनी सापळा रचत पाटील यास अटक केली. वडगाव न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक कदम, सहा. पोलीस निरीक्षक ए. डी. फडतरे तपास करत आहेत