Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचा निश्चय
पुणे, २ मार्च / विशेष प्रतिनिधी

इको क्लबच्या माध्यमातून राज्यभर इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचा निश्चय सामाजिक वनीकरण विभागाने केला आहे. त्यासाठी क्लबचे सदस्य असलेले विद्यार्थी येत्या शनिवारी निवडक शाळांमधून

 

पर्यावरणपूरक रंगांची विक्री करणार आहेत.
घरच्याघरी नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी खात्याने विशेष प्रयत्न केले असून यंदा भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ातील आदिवासी महिला बचत गटांनी १०० ग्रॅम वजनाची २० हजार पाकिटे तयार केली आहेत. काळा, पिवळा, लाल व हिरवा अशा चार रंगांत उपलब्ध असणाऱ्या या पाकिटाची किंमत ३५ रुपये असणार आहे. आकर्षक पॅकमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या या रंगाचे उद्घाटन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. ए. के. झा यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक प्रकाश ठोसरे हेही उपस्थित होते.
इको फ्रेंडली होळी योजनेअंतर्गत येत्या शनिवारी राज्यभर गटार गंगेच्या परिसरात एरंडीच्या बियांची लागवडही करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकाश ठोसरे यांनी दिली.
घरच्याघरी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी परिपत्रके, रंग तयार करण्याच्या कृती, राष्ट्रीय हरित सेना असलेल्या शाळांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.