Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

रुग्णालयातील भावविश्व
रुग्णालयाने दिले नवे सवंगडी!

कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी आयुष्यात चढावी लागू नये असे म्हणतात. तिथले अनुभव फार वाईट

 

असतात. मनस्ताप, शारीरिक वेदना या सगळय़ा गोष्टी सहन कराव्या लागतात. पण हॉस्पिटलच्या बाबतीतला माझा अनुभव अतिशय वेगळा आहे. ऑपरेशन होऊन बेडवर तीन महिने झोपूनच असलेली ही एक लहान मुलगी आहे. त्यामुळे ती पहिली दृष्टीच वेगळी होती. माझ्याजवळ बसणाऱ्या आई-बाबांची कोणाविषयीच तक्रार नव्हती. उलट डॉक्टरांनी सगळय़ांची वास्तपुस्त केल्यामुळे सगळेच आपलेसे झाले होते.
डॉक्टर, नर्सच नव्हे तर तिथे काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कामगारांचेही तसेच. एवढा जिव्हाळा कधीच कुणाकडून मिळाला नसेल. तसेच संबंध शेजारच्या कॉटवर असणाऱ्या पेशंटशीही झाले होते. डिस्चार्ज मिळाला तरी ते मला हॉस्पिटलमध्ये भेटायला येत असत. एवढेच नाही तर इतक्या वर्षांनंतरही रस्त्याने जाताना ते थांबून, ओळख सांगून आजही प्रकृतीची चौकशी करतात.
हॉस्पिटलमध्ये कॅशिअरचे काम करणाऱ्या एका आजोबांनी माझी वाचनाची आवड जाणून सावरकरांचे समग्र साहित्य मला दिले होते. त्यामुळे माझ्या पुस्तकांच्या संग्रहात दीड रुपया किंमत असलेले सावरकरांचे ‘१८५७चे स्वातंत्र्य समर’ हे मूळ पुस्तक आले आहे. केवळ माझ्या आजारपणामुळे माणसांची, त्यांच्या चांगुलपणाची एक साखळी निर्माण झाली आहे.
- मीनल रणसुबे, सोलापूर
हलगर्जीपणास जबाबदार कोण..?
नातेवाईकांना घाबरवून सोडणे तसेच रुग्णाच्या बाबतीत हलगर्जीपणा हा आजच घडतोय असे नाही तर तो पूर्वीही घडत असे. सध्या अशा गोष्टी घडल्यानंतर त्याचा नातेवाईकांकडून उद्रेक होतो एवढेच. रुग्णालय कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कसा असतो यासाठी २० वर्षांपूर्वीची घटना पाहणे गरजेचे आहे.
पुणे शहरातील नावाजलेले खासगी मोठे रुग्णालय. पत्नी सात महिन्यांची गरोदर. नामवंत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दर महिन्याला योग्य त्या तपासण्या नियमित होत असत. सातव्या महिन्यातल्या तपासणीसाठी गेली असता संबंधित डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यावेळी नुकतेच सोनोग्राफी हे तंत्र बाळसं धरत होतं. आज मात्र याचे अमाप पीक आले आहे. सोनोग्राफी झाल्यानंतर पत्नीचे बीपी अचानक खूपच वाढले. सोबत फक्त तिची आई. अशावेळी संबंधित डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, पेशंटची तब्येत गंभीर आहे. तिच्या पतीला ताबडतोब बोलावून घ्या. कारण फक्त २४ तासांचा अवधी आहे. मी तेथे गेल्यानंतर लगेचच नियमाप्रमाणे ठराविक साच्यातल्या ‘शासकीय कागदपत्रा’वर काहीही वाचू न देता सह्य़ा घेण्यात आल्या व या फक्त फॉम्र्यालिटीज आहेत असे सांगून स्वत:चे रक्त द्यावयास सांगितले. त्याकाळी रुग्ण दाखल होताच त्याच्या संबंधितांकडून रक्त घेत असत. तसेच पत्नीसाठी २४ तास महत्त्वाचे आहेत तुम्ही नातेवाईकांना बोलावून घ्या. कारण बाळ आणि बाळंतीण दोघांच्याही जिवाला धोका आहे असे सांगून पत्नीला लेबररूममध्ये नेण्यात आले. ही लेबररूम म्हणजे पेशंटला शिक्षेचाच प्रकार होता. कारण याठिकाणी पेशंटला कोणालाही भेटता येत नसे. नशीब त्यावेळी ‘आयसीयू’ हा प्रकार मोठय़ा प्रमाणात फोफावला नव्हता. २४ तास म्हणता म्हणता १२ दिवस गेले आणि डॉक्टरांच्या योग्य त्या औषधोपचाराने पत्नी नॅचरल डिलिव्हरी होऊन तिने कन्येला जन्म दिला. येथपर्यंत सर्व ठिकठाक झाले. परंतू खरे दिव्य तर पुढे पाहायला मिळाले.
सातव्या महिन्यातच डिलिव्हरी झाल्याने ओघानंच मुलीचं वजन कमी भरलं म्हणून तिला इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. मुलीच्या तब्येतीबाबत शंका म्हणून पुन्हा एकदा त्या ‘शासकीय कागदपत्रा’वर सह्य़ा घेण्यात आल्या. पत्नी रोज सकाळी त्यांनी दिलेल्या वेळेनुसार ‘फिडिंग’साठी म्हणजे नवजात बाळाला दूध काढून पाजण्यासाठी त्या रूममध्ये जात होती. दिवसेंदिवस मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होऊन वजन वाढत होते. अन् पंधराव्या दिवशी ठरलेल्या वेळी पत्नी ‘फिडिंग’साठी गेली असता पाहते तो त्या पेटीत मुलगी मरून पडली आहे. तिला पुरवण्यात येत असलेला ऑक्सिजन केव्हाच संपून गेला होता, हे तेथील संबंधित परिचारिकांच्या लक्षातसुद्धा आले नाही. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे आम्हाला मात्र मुलगी गमवावी लागली. अशा परिस्थितीत गप्प बसण्याशिवाय मार्ग नव्हता. गेलेली मुलगी परत येणे शक्य नव्हते. याबाबत दाद तरी कोणाकडे मागायची, कारण रुग्णालये स्वत:चा हलगर्जीपणा लपविण्यासाठी आधीच रुग्णाच्या गंभीरतेची कल्पना देऊन शासकीय कागदपत्रावर सह्य़ा घेत असतात. त्यात हे रुग्णालय पडले प्रसिद्ध. त्याचा त्याकाळी नावलौकिक. ते थोडेच आपल्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा मान्य करणार होते. असे केले असते तर त्या रुग्णालयाची प्रतिमा काळवंडली असती. संपूर्ण बिल वसूल करूनच सायंकाळी पाच वाजता १५ दिवसाच्या मुलीचे प्रेत आमच्या ताब्यात देण्यात आले. त्या वेळेस एका मातेची आणि एका पित्याची काय अवस्था असेल? ही घटना सांगण्याचे कारण म्हणजे रुग्णालयांचा रुग्णांच्या बाबतीतील हलगर्जीपणा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे नित्यनेमाने पाहायला मिळते. यामुळे अनेक अशा घटनांमधून नातेवाईकांचा उद्रेक होतो. त्याचा परिणाम सर्वच संबंधितांबरोबरच समाजालाही भोगावा लागल्याचे अनेकवेळा वाचण्यात आले आहे.
वैद्यकीय व्यवसाय आणि धंदा यामध्ये फरक असावयास हवा. रुग्ण आणि डॉक्टर यांचे नाते दृढ विश्वासावर असणे गरजेचे आहे. ते ग्राहक आणि विक्रेता यासारखे असू नये. या क्षेत्राची वाटचाल फक्त पैसा कमविणे या ध्येयासाठी असता कामा नये. हे क्षेत्र रुग्णाची सेवा तसेच त्याला आरोग्य देणे यासाठी आहे, याची जाणीव ठेवून कार्य होणे गरजेचे आहे. या क्षेत्राबाबतचा परस्परांवरील विश्वास वाढणे काळाची गरज आहे.
- दयानंद ठोंबरे, पुणे
रुग्णालयातील भावविश्व: चांगले नि वाईटसुद्धा!

मी एका रुग्णालयामध्ये सहा महिन्यांसाठी ट्रेनी म्हणून काम केले आहे. त्यातील काही चांगले व काही वाईट अनुभव सांगणार आहे. मी जॉईंट होण्याअगोदर माझ्या मनात वेगळे विचार चालू होते. आतमध्ये कसे वातावरण आहे. आतील काम आपल्याला जमेल का? अशा विचारांनी माझ्या मनात घर केलेले होते. मी पहिल्या दिवशी कामाला लागलो तो, जनरल वार्डमध्ये वॉर्डबॉय म्हणून. नंतर माझे दररोजचे काम चालू झाले. हॉस्पिटलचे मॅनेजमेंट हे खूप ढिसाळ आहे. तिथे फक्त दुसऱ्याच्या चुका शोधल्या जातात. आणि कर्मचारी जर चुकीत सापडला तर त्याला असे का केले म्हणून प्रश्न विचारले जाते आणि त्यासाठी नोटीस दिली जाते. या उलट जर त्याच मॅनेजमेंटमधील अमूक एका व्यक्तीची चूक असेल तर ‘सॉरी’ म्हणून वेळ भागवून नेली जाते. पण ज्यावेळेस त्यांची चूक होते त्यावेळेस त्याला काहीच किंमत नसते. पण दुसऱ्यांच्या चुका म्हणजे त्यांना वाटते यांना खावे का गिळावे. अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या पदावरील व्यक्ती आश्वासन देते पण ते नंतर पाळत नाही. उदा. मी तुम्हाला या महिन्यात ३००० पगार आहे तर मी पुढच्या महिन्यात ४००० रु. देतो म्हणून सांगतात, पण नंतर देत नाहीत. यांना हा अधिकार नाही तर त्यांनी त्या व्यक्तीला तसे स्पष्ट सांगावे. पण तसे न सांगता, नंतर सॉरी म्हटले जाते. पण त्या समोरच्या व्यक्तीचे किती नुकसान होते हे पाहिले जात नाही.
एच. ओ. डी. या पदावरील व्यक्ती आपल्या शिक्षणावरच्या अहंकारामुळे कर्मचाऱ्यावरती माणुसकीच्या भावनेतून न वागता, कपटी, राजकीय हेतूने वागत असतात. जी व्यक्ती चांगल्या वागुणीकीची अपेक्षा करते, त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीसोबत चांगल्या प्रकारे वागावे. असे न करता त्या कपटी भावनेने वागतात.
३) परिचारिका सुपर व्हिझन - ही व्यक्ती पण वरील व्यक्तीप्रमाणे वागते.
४) परिचारिका - या व्यक्ती पण माणुसकीची वागणूक देत नाहीत. काही परिचारिका चांगल्या वागतात पण काही, कपटी, राजकीय, रागाच्या भरात वागत असतात. काही परिचारिका सहकार्य पण करत नाही. असा माझा अनुभव आहे.
५) जुनिअर डॉक्टर - हे खूप चांगल्या प्रकारे वागतात. ते इतर पेशंटबरोबर आपुलकीने व प्रेमाने वागतात. यांच्यात माणुसकी, आपुलकी, प्रेम या गोष्टी मला त्यांच्या वागणुकीतून जाणवल्या.
६) सीनिअर डॉक्टर - हे डॉक्टर पण खूप चांगले असतात. पण यातील काही डॉक्टर पण, वाईट विचारांचे असतात, इतर पेशंटकडे तिरस्कार भावनेतून पाहतात. काही लेडिज डॉक्टर तर कागदपत्र पाहण्यासाठी घेतात आणि त्यांच्या जवळ न ठेवता इतर ठिकाणी ठेवतात. मी हा स्वत: अनुभव घेतलेला आहे.
७) तरी मी वरील सर्व माहिती ही अनुभवाच्या आधारे लिहिलेली आहे. - अ.ब.क., पुणे
वास्तवतेचे यथार्थ चित्रण!
हार्दिक अभिनंदन! रुग्णालयाच्या एका अनोख्या अशा अत्यंत भावविश्वाचा अंतरंग लोकांपुढे उघडून दाखविला आहे. रुग्णालये म्हटल्यावर त्यातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि या रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, आया किंवा विविध तंत्रज्ञ या सर्वामध्ये काही गहिरे भावबंध असू शकतात. त्याचबरोबर अनेकदा हे गहिरे भावबंध नसल्याने एकमेकांमध्ये एक आकसाची भावना असू शकते. या दोन्ही बाजूंना या लेखमालेने अतिशय सुंदर स्पर्श केला आहे. माझ्या पाहण्यात अशा तऱ्हेने अशा तऱ्हेची भावविश्व उलगडून दाखविणारी ही पहिलीच मालिका आहे.
मला या लेखाचे महत्त्व पटते ते अशासाठी की, जनरल हॉस्पिटलच्या प्रचंड पसाऱ्यात आणि गदारोळात आजही अत्यंत सर्वसामान्य आणि गोरगरीब माणसे जो माणुसकीचा ओलावा जपतात, तो मुस्तफा आतार यांनी लोकांपुढे अत्यंत समर्थपणे पुढे आणला आहे. मी स्वत: प्रत्यक्षात गुरुवार पेठेसारख्या अत्यंत गरीब आणि मागास भागात वाढलो; परंतु ही अशीच माणुसकी, एकमेकांना मदत क रण्याची ऊर्मी मी माझ्या लहानपणीदेखील गुरुवार पेठेत वाढत असताना जवळून पाहिली. आमच्या वाडय़ात कुणी आजारी पडल्यास संपूर्ण वाडा त्या रुग्णाचे एक कुटुंब बनून कसा झटायचा हे मी अनुभवल्याने मला हे लेख अधिक भावले. कारण आज समाजात माणुसकी हरवत चालली आहे. दया, प्रेम आणि करुणा या भावनांचा लोप व्हायला लागला आहे, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. समाजातील, विशेषत: पांढरपेशा आणि उच्चभ्रू वर्ग आपल्या ‘कॉकटेल’ पाटर्य़ामध्ये हरवलेल्या माणुसकीबद्दल आणि लोप पावत चाललेल्या नैतिकतेबद्दल सतत बोलत असतो; परंतु या सर्व भावना उलट आज मध्यमवर्गीय आणि गरीब समाजात अधिक टिकून आहेत आणि याचंच दर्शन या लेखांमध्ये पुन्हा मला झाले. अर्थात याचा अर्थ या नाण्याला दुसरी बाजू नाही असे नाही आणि ती दुसरी बाजू पण अतिशय परखडपणे या लेखांमधून समर्थपणे पुढे आली आहे. वेदनेमध्ये असलेल्या रु ग्णाला मायेचा हात देणारा सेवकवर्ग जसा रुग्णालयात आहे, तसाच रुग्णाची वेदना, त्याचे दु:ख याच्याकडे दुर्लक्ष करून रुग्णाच्या अंगावर निर्दयपणे खेकसणारा सेवकवर्गही रुग्णालयात आहे हे वास्तव आहे. इतकंच नाही, तर मरणाच्या दारात असणाऱ्या रुग्णाकडून आपल्याला काही ओरबाडून घेता येईल का, यासाठी प्रयत्न करणारी माणसंदेखील रुग्णालयांमध्ये आहेत. अशा दोन्ही वास्तवांचं यथार्थ चित्रण या लेखांमध्ये आढळते. मला स्वत:ला असे वाटते की, या लेखांमधील माणुसकीच्या वर्णनाचे प्रसंग वाचून रुग्णांशी माणूसपण विसरून वागणाऱ्यांचे डोळे जरी उघडले तरी या लेखनाचे खरे सार्थक झाले.
- डॉ. अभिजित वैद्य,
संस्थापक, आरोग्य सेना, पुणे