Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

नागरवस्ती विभागाचे विकेंद्रीकरण करू नका, अशी मागणी करणाऱ्या महिलांची सोमवारी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर अशी गर्दी झाली होती.

‘आमची चळवळ उध्वस्त करण्याचा प्रयत्न हाणून पाडू’
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

महिलांना सक्षम करणारी बचतगटांची चळवळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरू केला असला, तरी शहरातील हजारो महिला हा प्रयत्न हाणून पाडतील, असा इशारा महिलांनी दिला आहे.

पदाधिकाऱ्यांच्या मोटारी शासनदरबारी दाखल;
राजकीय प्रचाराचे फलक काढण्याचे आदेश

पुणे, २ मार्च / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडील मोटारी काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिले असून पदाधिकाऱ्यांच्या सेवेतील काही मोटारी आज शासनदरबारी जमा करण्यात आल्या.

रस्त्याने चाललेली महिला गटारात पडते तेव्हा..
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

पायी चाललेली एक महिला आज दुपारी उघडय़ा गटारात पडली. तब्बल दोन तासांनंतर तिचा शोध लागला. सांडपाण्यातून वाहून जाऊनही ती बचावली असून, या प्रकारात तिला किरकोळ दुखापत झाली. वारजे माळवाडी येथे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर वर्धमान पेट्रोलपंपाजवळील दोडके टॉवर्सच्या समोर सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.संगीता सुरेश गायकवाड (वय ४५) असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पिंपरीत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर भालेराव बिनविरोध
पिंपरी, २ मार्च / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ज्ञानेश्वर भालेराव यांची आज बिनविरोध निवड झाली. ज्येष्ठता, ओबीसी फॅक्टर आणि आकुर्डी ग्रामस्थांच्या एकीचे पाठबळ लक्षात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांनी भालेराव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा घोळ न सुटल्याने भालेराव यांच्यासह पक्षनेते जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे आणि सूरदास गायकवाड या चारजणांचे अर्ज दाखल करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली होती.

क्रीडा संकुल प्रकल्पाच्या उभारणीचा प्रारंभ
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

विभागीय क्रीडा संकुल समिती व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा भागात राबविल्या जाणाऱ्या क्रीडा संकुल प्रकल्पाच्या उभारणीचा प्रारंभ जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. क्रीडा प्रकल्पाच्या उभारणीप्रसंगी आमदार अ‍ॅड. चंद्रकांत छाजेड, उपविभागीय अधिकारी हेमंत जाधव, जे. डी. कुलकर्णी, व्यंकटेश आनंद, माणिक ठोसर आदी उपस्थित होते. येरवडा येथील क्रीडा संकुलात जलतरण तलाव, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, बास्केट बॉल आदी खेळांची मैदाने उभारली जाणार आहेत. या मैदानांच्या बांधणीसाठी १२ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दळवी, आमदार छाजेड आदींची भाषणे झाली. यावेळी नगरसेवक संतोष आरडे, निर्मला हिरे, जॉन पॉल, भगवान जाधव, रमेश सकट, सुरेश राठोड, विनय माळी आदी उपस्थित होते.

शहराच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

रस्तारुंदीत येणारे व्हॉल्व्ह हलविण्याचे काम मंगळवारी (३ मार्च) केले जाणार असल्यामुळे शास्त्री रस्ता, दत्तवाडी, लोकमान्यनगर, सिंहगड रस्ता वगैरे भागातील मंगळवारचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत- शास्त्री रस्ता (दोन्ही बाजू), लोकमान्यनगर, नवी पेठ, राजेंद्रनगर, सेनादत्त पोलीस चौकी परिसर, दत्तवाडी, सिंहगड रस्ता, दांडेकर पूल ते राजाराम पूल (दोन्ही बाजू) आणि पर्वती स. क्र. १३१ व १३२. या सर्व भागांना बुधवारी (४ मार्च) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

संत रविदास महाराज समाज गौरव पुरस्कार वितरण
पुणे, २ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे श्री जगदगुरू रविदास महाराज यांच्या ६३२ व्या जयंतीनिमित्त संत रविदास महाराज समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा ८ मार्च रोजी खडकीतील श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष मनीष आनंद, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेवक कमलेश चासकर उपस्थित राहणार असून सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर अरुण खरात व हरिदास पुसे यांचा रविदास गीत गायनाचा कार्यक्रम ११ वाजता, तसेच विनायक कानडे महाराज यांचे प्रवचन होणार आहे.अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संजय लोकापुरे यांनी दिली.

रिक्षाला अपघात, एक प्रवासी ठार
पुणे, २ मार्च/ प्रतिनिधी

भरधाव रिक्षावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर गंगाधाम चौकात काल दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. रिक्षाचालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. शिवाजी कृष्णा जाधव (वय ४०, रा. अण्णा भाऊ साठेनगर, अरण्येश्वर) असे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून रिक्षाचालक विकास जर्नादन गवळी (वय ३२, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, बालाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे. जाधव यांचे नातेवाईक सदाशिव यमनप्पा माने (वय ४१, रा. अरण्येश्वर) यांनी याबाबत स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

अन्य पक्षातर्फे निवडणूक लढविणार नाही- अण्णा जोशी
पुणे, २ मार्च / प्रतिनिधी

लोकसभेसाठी आपण भारतीय जनता पक्षाकडून पुणे शहर लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी मागितली असून बसपा किंवा अन्य कोणत्याही पक्षातर्फे आपण निवडणूक लढविणार नाही, असे माजी खासदार अण्णा जोशी यांनी स्पष्ट केले. काही वर्तमानपत्रातून ‘डीएसके आणि अण्णा जोशी यांना बसपाकडून ऑफर’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले आहे. बसपाकडून चांगल्या उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यावेळी या पक्षाकडून जोशी यांना विचारणा झाली होती, असेही त्यांनी कळविले आहे.

कुंटणखान्यातून दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पुणे, २ मार्च / प्रतिनिधी

बुधवार पेठेतील कुंटणखान्यावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी आज दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
कुंटणखान्याची मालकीण मधू मायकल मल्लप्पा (वय ३३, रा. डिस्को इमारत, बुधवार पेठ, मूळ रा. आंध्र प्रदेश) हिला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुटका केलेल्या मुलींपैकी एक बिहारची तर दुसरी नेपाळची आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र भामरे यांनी दिली. गुन्हे अन्वेषण शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कांचन जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

१४ एप्रिलला कोकणवासीयांच्या महामेळाव्याचे आयोजन
पुणे, २ मार्च/ प्रतिनिधी

कोकणवासीय महासंघातर्फे कोकणवासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी येत्या १४ एप्रिल रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महासंघाचे अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शनिवार पेठेतील रमणबाग प्रशाला येथे दुपारी साडेचार वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला नारायण राणे, राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे, शिवसेनेचे रामदास कदम, प्रकाश जावडेकर, आदी उपस्थित राहणार आहेत. पुणे ते कोकण रेल्वे सुरू करावी, पुण्यात कोकणभवन उभे करावे, अशा विविध मागण्या या मेळाव्यात मांडण्यात येणार आहेत, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.