Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

राज्य

आश्रमशाळेतील बलात्कार; शेळके, रघुते निलंबित
पालघर, २ मार्च/वार्ताहर

आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर अखेरीस डहाणूमधील आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी शिवाजी शेळके व त्यांचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी पुंडलिक रघुते यांना निलंबित करण्यात आले. आदिवासी विकास विभागाचे सचिव प्रेमसिंग मीना यांनी हा निर्णय घेतला असून, शेळके यांचा पदभार ठाणे येथील सीताराम भालेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डहाणू प्रकल्प क्षेत्रांतर्गत पालघर तालुक्यातील मोवाडे येथील आश्रमशाळेतील १५ वर्षीय मुलीवर तेथील अधीक्षकांनीच बलात्कार केल्याचे प्रकरण अलीकडे उघडकीस आले होते.

माणिकराव ठाकरे यांच्या सूतगिरणीचे झाले गोदाम
यवतमाळ, २ मार्च / वार्ताहर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे संस्थापक अध्यक्ष असलेल्या बोरी अरब येथील सूतगिरणीचे ‘गोदामा’त रूपांतर झाले आहे.दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे १९ वर्षांपूर्वी शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू करण्यासाठी माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांकडून भागभांडवल जमा केले होते. हा प्रकल्प सुरुवातीला आठ कोटी रुपये खर्चाचा होता, आज त्याची किंमत ५३ कोटी रुपये आणि चात्यांची संख्या २५२०० झाली आहे. संस्थेने शेतकऱ्यांकडून ८७ लाख ३५ हजार भागभांडवल जमा करून सरकारकडून ८ कोटी ८६ लाख रुपये भागभांडवल मिळवले आहे.

जळगाव विभागात २२ लाख क्विंटल कापूस खरेदी
धुळे, २ मार्च / प्रतिनिधी

नाफेडने पणन महासंघाच्या माध्यमातून ३ नोव्हेंबर २००८ पासून सुरू केलेल्या कापूस खरेदीला मुदत वाढवून देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जळगाव विभागांतर्गत येणाऱ्या निरनिराळ्या ४२ केंद्रांवर आतापर्यंत २२ लाख ६० हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. त्याची किंमत ६३८.६८ लाख असून १६ लाख ८७ हजार क्विंटल कापूस खरेदीपोटी ४७४.७० लाखाचे पेमेंट अदा झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाचे जळगाव विभागाचे प्रभारी व्यवस्थापक ए. एस. निकुंभे यांनी दिली.

रेल्वे मार्गावरून गोटे यांची विरोधकांवर आगपाखड
धुळे, २ मार्च / प्रतिनिधी

रेल्वे बोर्डाने मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे प्रकरण २० सप्टेंबर ०४ रोजी केराच्या टोपलीत टाकले होते. नंतरच्या चार वर्षांच्या काळात आपण प्रदीर्घ तुरूंगवासात असताना विरोधकांनी या रेल्वे मार्गासाठी कोणती हालचाल केली, असा सवाल करीत लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या विरोधकांचा अतिशय आक्रमक शब्दात समाचार घेतला आहे.

काँग्रेसची कर्जत शहर कार्यकारिणी घोषित
अध्यक्षपदी हेमंत देशमुख यांची फेरनिवड
कर्जत, २ मार्च/वार्ताहर
काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, कर्जत शहराध्यक्षपदी हेमंत देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आलेल्या या बैठकीमध्ये पक्षाचे रायगड जिल्हा प्रवक्ते विजय मिरकुटे, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. विठ्ठलराव तथा व्ही. वाय. पाटील, पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष रियाज बुबेरे आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

भिवंडीत चार लाखांची घरफोडी
भिवंडी, २ मार्च/वार्ताहर

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडूनवघर गावात चार अज्ञात इसमांनी घरात घुसून तीन लाख ९३ हजारांचा ऐवज लंपास केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांना आरोपी पकडण्यात अपयश आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. भिवंडी-वसई महामार्गावरील वडूनवघर गावातील हिम्मत चौघुले यांच्या घरी आज पहाटेच्या सुमारास चार अज्ञात घरफोडय़ांनी दरवाजाचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. चोरटय़ांनी घरातील कपाटातील तीन लाख ८३ हजारांचे सोने-चांदी व १० हजार रोख घेऊन लंपास झाले. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे येथे आग; सव्वा कोटीचे नुकसान
धुळे, २ मार्च / वार्ताहर

येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या किसान अॅग्रो लिमिटेड कंपनीत लागलेल्या भीषण आगीत सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी धुळ्यासह परिसरातील शहरांमधून अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. २० ते २५ बंबांमधून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर जवळपास सहा तासांनी आग अटोक्यात आली. आगीत आर्थिक नुकसान मोठे झाले असले तरी सुदैवाने प्राणहानी झाली नाही. येथील औद्योगिक वसाहतीतील किसान अॅग्रो ही खाद्यतेल उत्पादन करणारी कंपनी आहे. रात्री एक ते दीडला या कंपनीच्या पॅकींग विभागातील काही वस्तुंनी पेट घेतला. त्याची माहिती अन्य ठिकाणी दिली जात असतानाच कंपनीचा वितरण विभाग, स्टोअर आणि प्रयोगशाळेसह कार्यालयापर्यंत आगीने वेढा घातला. आगीबाबत माहिती मिळाल्यानंतर धुळे, मालेगाव, पारोळा, अमळनेर आदी ठिकाणचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. या साऱ्याच ठिकाणाहून एका पाठोपाठ येणाऱ्या पाण्याच्या बंबांमधून भडकणाऱ्या आगीवर जोरदार पाण्याचा मारा करण्यात आला. रात्री एकपासून सकाळी सातपर्यंत पाण्याचा शिडकावा करण्यात आल्यानंतर अखेर आग अटोक्यात आली. या संदर्भात कंपनीचे संचालक अजय अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता आगीचे निश्चित कारण सांगण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. दरम्यान, आगीत सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

बदलते विषम हवामान आंबा उत्पादनाच्या मुळावर
रत्नागिरी, २ मार्च/खास प्रतिनिधी
यंदा आंब्याचा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता गेल्या महिन्यापासून व्यक्त केली जात असतानाच हवामानातील बदलामुळे संभाव्य उत्पादनाला धोका निर्माण झाला आहे.
कोकणात यंदा थंडीचे प्रमाण अतिशय कमी काळ राहिले असून गेले सुमारे दोन आठवडे दिवसा उकाडा आणि रात्रीपुरता गारवा अशी परिस्थिती आहे. यामुळे आंब्याला मोहोर येऊन फळधारणा होण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे. काही मोजक्या बागायतदारांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्येच आंब्याची पहिली पेटी पुण्या-मुंबईच्या बाजारपेठेत पाठविण्याचा विक्रम केला असला तरी यामध्ये त्यांना सातत्य टिकवता आलेले नाही. एकूण परिस्थिती पाहता यंदा १५ एप्रिलनंतरच आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होईल आणि मे महिन्यात का होईना, आंब्याचे पीक मुबलक प्रमाणात येईल, असा अंदाज होता. पण गेले तीन-चार दिवस हवामानामध्ये विचित्र बदल झाला असून पहाटेच्या वेळी मोठय़ा प्रमाणात दव पडत आहे. त्याचप्रमाणे सकाळी आठ-नऊ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी धुके दाटून राहिल्याचे नजरेला पडत आहे. त्यामुळे आंब्याच्या पानावर दव साचून बुरशीसदृश रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घडशीवाडीतील श्रद्धाची हत्या
संगमेश्वर, २ मार्च/वार्ताहर

माभळे घडशीवाडी येथे १४ दिवसांपासून बेपत्ता झालेली २२ वर्षीय श्रद्धा श्रीकांत घडशी ही विवाहिता विहिरीत मृतावस्थेत आढळली. यामुळे तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी नवऱ्यासह दिराला संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल १४ दिवसांनंतर तिचा पती श्रीकांत घडशी याने वृत्तपत्रामधून प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर नाइलाजाने आपली पत्नी श्रद्धा बेपत्ता झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. यामुळे तिचा घातपात झाल्याच्या संशयावरून महिला आयोगाच्या सदस्य रश्मी कदम यांनी पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांची भेट घेऊन या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची विनंती केली होती. श्रद्धा गर्भवतीही होती. श्रीकांतने पोलिसांना दिलेल्या माहितीद्वारे श्रद्धा ही फुणगूस कोंडय़े येथील आपल्या माहेरी गेल्याचे सांगितले होते. मात्र श्रद्धाचा भाऊ रवींद्र भुवड याने पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये आपली बहीण माहेरी आलीच नाही, असे लिहून दिले होते. त्यामुळे श्रीकांतने आपला जबाब बदलला. त्यामुळेच यामध्ये घातपात झाल्याची शंका संगमेश्वर पोलिसांना आल्याने पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी सहकारी अवधूत सुर्वे, मिलिंद चव्हाण यांना बरोबर घेऊन श्रद्धाचा शोध सुरू केला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत श्रद्धाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. नंतर श्रीकांत व त्याचा भाऊ शशिकांत याला संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अलिबागमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर
अलिबाग, २ मार्च / प्रतिनिधी

येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या चं.ह. केळुसकर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ४ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० यावेळेत ‘मोफत नेत्ररोग तपासणी व रोग निदान शिबीर ’ आयोजित केले आहे. या शिबिराचे आयोजन मुंबई येथील इलाईट आय हॉस्पिटलचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ़ दिव्यज्ञान सरवैया व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विद्यमाने करण्यात आले आह़े या शिबिरात अत्याधुनिक यंत्राद्वारे नेत्ररोग तपासणी, चष्म्यांचे नंबर, आवश्यक असल्यास मोफत चष्मा, रक्तातील साखर इत्यादीची तपासणी केली जाईल.प्रथम येणाऱ्या २५० रुग्णांची मोफत तपासणी या शिबिरात करण्यात येणार असून गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन को.ए.सो.चे कार्यवाह संजय पाटील व वरिष्ठ संचालक अजित शाह यांनी केले आह़े

उघडय़ा गटारात पडून बालकाचा मृत्यू
नालासोपारा, २ मार्च/वार्ताहर

वसई पूर्वेकडील सातीवली कुवरपाडा येथील संदीप सुरेश तिवारी (दीड वर्ष) हा मुलगा गटारात पडून मरण पावल्याची घटना नुकतीच घडली. संदीपचे वडील आपल्या किराणा मालाच्या दुकानात गेले होते. त्यांच्या पाठोपाठ संदीपही तेथे पोहचला. तो दुकानाबाहेर खेळत होता. खेळता खेळता तो अचानक गायब झाला, तेव्हा सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. एकाचे लक्ष गटाराजवळ असलेल्या चपलेकडे गेले आणि सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली. काही जणांनी शंकेचे निरसन करून घेण्यासाठी गटारात शोध घेतला असता संदीप त्यात सापडला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. दुकानासमोरच असलेले हे गटार २ फुट रुंदीचे असून, त्यावर झाकण नाही. या घटनेला ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

कराटेपटू अ‍ॅड. गौतम गायकवाड यांचा न्यायमूर्तीच्या हस्ते सत्कार
कर्जत, २ मार्च/वार्ताहर

कर्जतमधील सुप्रसिद्ध कराटेपटू आणि मुंबई विद्यापीठाच्या एल. एल. एम. (क्राईम) विभागाचे विद्यार्थी अ‍ॅड. गौतम गायकवाड यांचा ‘कराटे बुडोकॉन इन्टरनॅशनल वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिप-२००८’ या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बिलाल नाझकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या एका समारंभाच्या निमित्ताने अ‍ॅड. गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी, माजी न्यायमूर्ती आशुतोष कुंभकोणी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत, विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. सुरेश माने, रिझवी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एच. रिझवी आदींच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला.या समारंभानिमित्त करण्यात आलेला हा सत्कार आपल्या आयुष्यातील आजवरचा सर्वात मोठा सत्कार असून, तो केवळ व्यक्तिश: माझाच सत्कार नसून तो संपूर्ण कर्जत तालुक्याचा, तसेच रायगड जिल्ह्याचा गौरव आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

मॅक्सजीप-मोटारसायकल अपघातात एक ठार
खोपोली, २ मार्च/वार्ताहर

भरधाव वेगातील मॅक्सजीपने मोटार सायकलला मागून धडक मारल्यामुळे झालेल्या अपघातात जीपमधून प्रवास करणारी एक व्यक्ती ठार तर चौघे जखमी झाले. जीपचालक व मोटार सायकलवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे दस्तुरी गाव हद्दीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. लक्ष्मण धुमाळ (४८) व रंजना धुमाळ (४३, दोघे मूळचे राहणारे मुरबाड-सध्या वास्तव्य नागोठणे) हे पती-पत्नी मोटारसायकलवरून पुण्याहून नागोठण्याकडे जात असता पाठीमागून भरधाव वेगाने भिवंडीकडे जाणाऱ्या मॅक्सजीपने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यामध्ये हे दोघे जखमी झाले व जीपमधून प्रवास करणारे शंकर बडीलकर (५५), लक्ष्मण जाधव (५०) व जीपचालक अरुण रोणे (३५, तिघे रा. भिवंडी, जि. ठाणे) जखमी झाले. पाचही जखमींना खोपोली न.पा. रुग्णालयात प्रथमोपचार करून अन्यत्र हलविण्यात आले. सानपाडा येथील सूरज हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू असतानाच शंकर बडीलकर यांचे निधन झाले. लक्ष्मण जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. मोटार सायकलवरील पती-पत्नीना मुंबईच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरीचे संगणक विकणाऱ्या तिघांना पारगल्लीत अटक
नगर, २ मार्च/प्रतिनिधी

पारगल्लीत चोरीचे संगणक विकणाऱ्या तिघांना सहायक पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या विशेष पथकाने आज अटक केली. त्यांच्याकडून २ संगणक जप्त करण्यात आले.
बुरुडगाव भागात झालेल्या घरफोडीवर या आरोपींमुळे प्रकाश पडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. संगणक व लॅपटॉप चोरणारी टोळी कार्यरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पारगल्ली येथे सापळा लावण्यात आला. चोरीचे संगणक विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या गणेश विजय गायकवाड (२१, रा. भोसले आखाडा), सुदर्शन गोरख सुपेकर (१९, रा. बुरुडगाव रस्ता), अमोल संपत कदम (२३, रा. बुरुडगाव) या तिघांना जेरबंद करण्यात आले. त्यांना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डॉ. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र वाघ, हेमंत खंडागळे, अर्जुन दहिफळे, भरत डंगोरे आदींनी ही कारवाई केली.