Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

क्रीडा

पुन्हा श्रीगणेशा
भारत-न्यूझीलंड पहिली एकदिवसीय लढत आज
नेपियर, २ मार्च / पीटीआय
न्यूझीलंड दौऱ्याच्या सुरुवातीलाच दोन ट्वेन्टी-२० लढती गमाविल्यामुळे आत्मविश्वासाला धक्का बसलेला भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत या पराभवाच्या आठवणी विसरून पुन्हा नव्या जोमाने न्यूझीलंड मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहे. पहिल्या दोन ट्वेन्टी-२० लढती गमाविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या यजमान न्यूझीलंड संघ उद्याच्या एकदिवसीय लढतीत थोडासा वरचढ असणार यात शंका नाही. त्यातच भारताला वेगवान गोलंदाज इशांत शर्माची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो या लढतीला मुकणार आहे. ट्वेन्टी-२०लढतीदरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.

सचिनमुळे संघाचे मनोबल उंचावले -धोनी
नेपियर, २ मार्च / पीटीआय

‘ट्वेन्टी-२०’च्या सलग दोन लढतींतील पराभवाने भारतीय संघ सध्या बॅकफूटवर असला तरी सचिन तेंडुलकरच्या संघातील पुनरागमनाने ड्रेसिंग रूममधील वातावरण कमालीचे बदलून संघाचा आत्मविश्वास उंचावल्याचे कर्णधार धोनीने म्हटले आहे. सचिन हा महान खेळाडू असून, निव्वळ फलंदाजी / गोलंदाजीतच नव्हे तर त्याचा अनुभवही संघासाठी विविध मार्गाने मोलाचा ठरतो, असे धोनीने पुढे म्हटले आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या सलामीच्या दिवस/रात्र लढतीच्या पूर्वसंध्येला तो बोलत होता. सचिनचा एकूणच संघावर किंवा प्रतिस्पर्धी संघावर किती परिणाम होतो ते मात्र आपण सांगू शकत नाही, असेही धोनीने सांगितले.

आयसीसी क्रमवारीत भारताला दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याची संधी
धोनी आणि युवराजनंतर ‘टॉप २०’ मध्ये गंभीर आणि सेहवाग
दुबई, २ मार्च/ पीटीआय
न्यूझीलंडमध्ये ‘..जमी पर’ आलेल्या भारतीय संघाला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याची नामी संधी यावेळी चालून आलेली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाने जर न्यूझीलंडला ५-० असे नमवून ‘व्हाईट वॉश’ दिला तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला मागे टाकून दुसरे स्थान पटकावू शकतो.

आत्मविश्वास वाढला असला तरी भारताचेच पारडे जड - व्हेटोरी
नेपियर, २ मार्च / पीटीआय

ट्वेन्टी - २० क्रिकेट मालिकेत भारताला पराभूत केल्यावर आत्मविश्वास वाढला असला तरी एकदिवसीय मालिकेत प्रतिस्पध्र्याचे पारडे जड आहे,असे मत न्यूझीलंड संघाचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी याने व्यक्त केले आहे. उभय देशांमध्ये पहिला एकदिवसीय सामना उद्या (मंगळवारी) होणार आहे. भारतीय संघ सलग दोन सामने पराभूत झाला असला तरी त्यांच्यात पुन्हा जोरदार मुसंडी मारण्याची क्षमता आहे.

ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर १६२ धावांनी मात
जोहान्सबर्ग, २ मार्च / एएफपी

मायदेशात मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात पहिल्या कसोटीत पराभूत करण्याची करामत ऑस्ट्रेलियाने करून दाखविली. वॉन्डर्स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने १६२ धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीला आज योग्य फळ मिळाले. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेला २९१ धावांवर रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने चहापानानंतर डेल स्टेनला त्रिफळाचीत केले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

कसोटी अनिर्णीत होण्याच्या वाटेवर
’ सारवानचे त्रिशतक हुकले ’ रामदिनचे दिडशतक ’ स्वानचे पाच बळी
बार्बाडोर्स, २ मार्च / वृत्तसंस्था
इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या दिवसावर निर्विवाद वर्चस्व राखले ते वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी. दिवसाच्या सुरूवाती पासून रामनरेश सरवान आणि यष्टिरक्षक दिनेश रामदिन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्यांना हतबल करून सोडले. द्विशतक झळकाविणाऱ्या सरवानला त्रिशतक पूर्ण करता आले नसले त्याची फलंदाजी हि निव्वळ दृष्ट लागण्यासारखीच होती. इंग्लंडने ६०० धावांचा डोंगर उभारल्यानंतर त्याला तोडीस तोड उत्तर ७४९ धावा काढून वेस्टइंडिजने दिले असले तरी ही कसोटी आता अनिर्णीत होण्याच्या वाटेवर आहे.

श्रीलंकेचा धावांचा डोंगर
*समरवीराचे द्विशतक
* दिलशानचे शतक
*उमर गुलचे सहा बळी
लाहोर, २ मार्च/ वृत्तसंस्था

येथील गडाफी स्टेडियमच्या पाटा खेळपट्टीवर आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाचे आकर्षण ठरेले ते थिलान समरवीराचे द्विशतक आणि तिलकरत्नेचे शतक. या दोघांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या डावात ६०६ धावांची मजल मरली आहे. श्रीलंकेच्या धावसंख्येला पाकिस्तानने चोख प्रत्युत्तर दिले असून दुसऱ्या दिवशी चोवीस षटकांमध्ये त्यांनी एका विकेटच्या मोबदल्यात ११० धावा केल्या आहेत. कालच्या ४ बाद ३१७ वरून पुढे खेळताना समरवीरा आणि तिलकरत्ने यांनी संघाला ५०० धावांचा डोंगर उभारून दिली. समरवीराने सावध फलंदाजी करीत पहिल्यांदा दीडशे धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर करकिर्दीतले पहिले द्विशतक झळकाविले.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाणांचा विचार
लाहोर, २ मार्च / वृत्तसंस्था

आयसीसी चॅम्पियन करंडक स्पर्धेचे श्रीलंकेत आयोजन करण्यासंबंधी शंका उपस्थित केल्या जात असल्याने या स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाणांचा विचार चालू असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे वरिष्ठ अधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांनी सांगितले की, ही स्पर्धा सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्याची योजना आहे. मात्र या काळात श्रीलंकेतील हवामान लक्षात घेता तेथे स्पर्धा घेणे व्यवहार्य ठरणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर श्रीलंकेतील अशांत परिस्थितीचा मुद्दाही उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे स्पर्धेचे स्थान निश्चित करताना आम्ही सर्व बाजूंनी विचार करीत आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ही स्पर्धा बारा दिवसांत संपवायची आहे. एकाच देशातील दोन ठिकाणांचा विचार त्यादृष्टीने चालू आहे. त्यामुळे आयसीसीपुढे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. जोहान्सबर्ग, अबु धाबी आणि दुबई या ठिकाणांचा त्या दृष्टीने विचार चालू असल्याचे रिचर्ड्सन यांनी नमूद केले. मात्र या संदर्भातील अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लवकरच दुबईत होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

सायना- पाईशी यांच्यात बुधवारी लढत
ऑल इंग्लंड बॅडमिंटन
नवी दिल्ली, २ मार्च / पीटीआय

गेल्या तीन आठवडय़ांपासून बॅडमिंटन रॅकेट हातात न घेतलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल बुधवारी ऑल इंग्लंड ओपन सुपर सिरीज स्पर्धेत फ्रान्सची होंगयान पाईशी झुंजणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे सायनाला राष्ट्रीय स्पर्धेलाही मुकावे लागले होते. त्यामुळे तिने आताही काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत सायनाचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. दुखापतीचा फारसा प्रभाव तिच्या खेळावर होणार नाही असा विश्वास गोपीचंद यांनी व्यक्त केला असला तरी सुरुवातीस तिने काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यास ते विसरले नाहीत. पहिलाच सामना हा कसोटी पाहणारा असतो, त्यानंतर मात्र संपूर्ण स्पर्धेवर त्याचा परिणाम होतो. पहिलाच सामना होंगयानशी आहे. सायनाने तिला नुकतेच पराभूत केले असले तरी सध्या होंगयान चांगले प्रदर्शन करीत आहे. तिला आताही पराभूत केले तर सायनाला त्याचा निश्चितच फायदा होईल. १३ वा मानांकित चेतन आनंद यालाही दुखापतीमुळे राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेला मुकावे लागले होते. त्याची गाठ इंग्लंडच्या अ‍ॅण्ड्रय़ू स्मिथशी आहे. अनुप श्रीधरला मलेशियाच्या बेंग हाँग काऊन तर आनंद पवारला कार्ल बॅक्स्टर (इंग्लंड) याच्याशी लढावे लागेल. भारतीय महिला संघाची ज्वाला गट्टा व श्रुती कुरियन यांचा मलेशियन जोडी चौऊ हेवी हॉ व पेक सिह लिम यांच्याशी होणारा सामनाही रंगतदार होणार आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कनिष्ठ संघ घोषित
मेलबर्न, २ मार्च/पीटीआय

एप्रिलमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या १९ वर्षांखालील किक्रेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या संभाव्य संघाची घोषणा आज करण्यात आली. या स्पर्धेत तीन एकदिवसीय व दोन तीनदिवसीय सामने होतील.
२०१० मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ३१ खेळाडूंचे नामांकनही या वेळी करण्यात आले. भारताविरु द्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंना ही मोठी संधी आहे. त्यांचा खेळ, क्षमता यावरच त्यांची निवड करण्यात आली आहे, असे निवड समितीचे अध्यक्ष जॉफ टॅम्बलॅन यांनी सांगितले. काही खेळाडू हे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले आहेत. आता त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभव येणार आहे. पहिला आणि दुसरा आणि एकदिवसीय सामना होबार्ट येथे अनुक्रमे ७, ९ आणि एप्रिल रोजी खेळविण्यात येतील. त्यानंतर पहिला तीन दिवसीय सामना होबार्ट येथे ११ ते १३ एप्रिल दरम्यान होणार आहे.

सचिन बारबोजला ‘ठाणे श्री’ किताब
मुंबई, २ मार्च / क्री. प्र.

ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि दैनिक कराळे समाचार यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा येथे झालेल्या भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत सनी जिमचा सचिन बारबोज ‘ठाणे श्री’ किताबाचा मानकरी ठरला. किताब विजयासाठी झालेल्या गट विजेत्यांच्या स्पर्धेत त्याने अन्य स्पर्धकांना सहज मागे टाकत मानाचा पटका, १५ हजार रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफीवर आपले नाव कोरले. किणी जिमच्या भावेश मेहरने ‘बेस्ट पोजर’चा किताब पटकावला.
गटनिहाय निकाल : ५५ किलो : १) रूपेश साळकर २) गणेश पाटील ३) पंकज कडू ४) सागर धामणकर ५) पंकज राऊत
६० किलो : १) श्रीनिवास खाखी २) रोशन नाईक ३) भावेश मेहर ४) विनोद जाधव ५) पंकज राऊत
६५ किलो : १) दिनेश शिंदे २) सचिन थापा ३) छत्रपती राऊत ४) मन्सुर शेख ५) आनंद मुंढे
७० किलो : १) रियाज शेख २) देवेंद्र भोईर ३) हरिराम भोईर ४) आनंद पॉल ५) रवी पाटील
७५ किलो : १) स्वप्निल अथाईत २) प्रवीण गिलबिले ३) विनोद मोहिते ४) जयवंत रेडकर
५) विवेक शेट्टी
८० किलो : १) सचिन बारबोज २) राजेश वस्त ३) चंद्रकांत जावळे ४) वसंत पंडित ५) लीओ डसिल्व्हा.

बास्केटबॉल : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे विजय
मुंबई, २ मार्च / क्री. प्र.

महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी रौप्यमहोत्सवी रामू स्मृती बास्केटबॉल स्पर्धेत आपल्या चमकदार खेळाने उपस्थितांची मने जिंकली. पुरुष गटात महाराष्ट्राच्या संघाने चेन्नई कस्टम्स संघाला दोन गुणांनी नमविले तर महिलांमध्ये महाराष्ट्राने शेष भारतावर ५४-३४ अशी सहज मात करीत आपल्या सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.महाराष्ट्राच्या पुरुषांनी काल सेनादलावर मात करण्याची करामत केली होती. आज त्यांनी चेन्नई कस्टम्सवर ६५-६३ अशी मात केली. कस्टम्सचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना होता. त्यामुळे त्यांना सूर गवसला नाही. उलट महाराष्ट्राने अखेरच्या सत्रात त्यांच्यावर आणखी दडपण टाकले व अखेरच्या क्षणी बाजी मारली.