Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आईच्या लष्करी खाक्याच्या संस्कारामुळे कलाप्रांतात यशस्वी - नयना आपटे-जोशी
कल्याण/प्रतिनिधी -
आईने केलेल्या मिलिटरी माईन्ड संस्कारामुळे मी अभिनय प्रांतात यश मिळू शकले. माझं करिअर सुरू होणार, तोच आईचे छत्र हरपले. अशा स्थितीत आईने जो संस्कार माझ्यावर केला होता, त्याच वाटेवरून मी माझी अभिनयातील वाटचाल सुरू ठेवली. त्यामुळे मला कधी कोठे भीती वाटली नाही, असे सांगून आई शांता आपटे हीच माझी गुरू होती, असे प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री

 

नयना आपटे-जोशी यांनी नुकतेच येथे सांगितले.
‘अनुराग’ कल्याण संस्थेतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री स्व. शांता आपटे यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त नयना आपटे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम बालकमंदिर शाळेच्या सभागृहात आयोजित केला होता. यावेळी अनुरागचे संस्थापक अध्यक्ष मेघन गुप्ते उपस्थित होते. सुरेखा झवेरी, सई देशपांडे यांनी मुलाखत घेतली.
आईच्या आठवणी, आईने सादर केलेली गाणी, स्वत:चे अनुभव कथन करीत, काही मुखडे, संवाद सादर करीत नयना आपटे यांनी मुलाखतीला बहार आणली. नयना आपटे यांनी सांगितले, मी गेली ५५ वर्षे अभिनय क्षेत्रात आहे. आईने बालपणी जो संस्कार केला, आई जे काम करत होती ते मी माझ्या नजरेने पाहत होती. तेच नियम मी माझ्या आठवणींच्या शिदोरीत बांधून ठेवले आणि त्याचाच वापर वेळोवेळी करत आज मी या क्षेत्रात एक वेगळी उंची गाठली आहे. आखलेले काम करत राहणे, वेळेचे बंधन पाळणे, काम संपलं, मेकअप पेटी बंद केली की घरचा रस्ता धरणे, तिचे जगणे, राहणे, विचार करण्याची पध्दत एकदम रॉयल होती. नयना आपटे म्हणाल्या, सुरुवातीचा प्रत्येकाचा प्रवास खडतर असतो. तो आपण सुखकारक नजरेने पाहयचा असतो. आई जेव्हा अंथरुणाला खिळली त्यावेळी तिने मला गाणे गायचे आहे, सिनेमात काम करायचे आहे. त्यामुळे मला अजून जगायचे आहे असे ती म्हणत असे. मला हे पूर्ण करता आले नाही तर या इच्छा तू पूर्ण कर असे आईने मला सांगितले. तत्क्षणी मी अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पाचव्या वर्षांपासून ‘स्वयंवर’ नाटकापासून मी अभिनयाला सुरुवात केली. आईचे मार्दर्शन होते. अनंत दामले यांनी गाणे, अभिनयाचे धडे दिले. झाशीची राणी, मृच्छकटिक आदी नाटके आली. मा. दत्ताराम, नानासाहेब फाटक आदी दिग्गज कलाकार
मला पाहता आले. अभिनय चालू असताना संगीत विषयातून एम. ए. पूर्ण केले. आईच्या सोबतीने बालगंधर्वानी आईला शिकवलेले नाथ हा माझा, मम आत्मा गमला ही पदे माझ्यात रूंजी घालत होती. यावेळी बालगंधर्वाची अवस्था पाहून मला खूप धक्का बसला. एका दिग्गज कलाकाराची शासन कशी उपेक्षा करू शकते हे त्यावेळी पाहण्यास मिळाले, खूप दु:ख झाले त्यावेळी.
टीव्ही मालिकांपेक्षा नाटकात प्रत्यक्ष संवाद साधता येतो. त्यात जिवंतपणा असतो, तो कॅमेऱ्यात टिपता येत नाही. आताचे स्टार हे सो कॉल्ड आहेत. मिनिटांचा हिशोब असल्याने त्यांच्या कलेत जिवंतपणा जाणवत नाही.
बालवयात मुलांना ५० लाखाची बक्षिसे मिळू लागली. त्या बक्षिसांमध्ये हुरळून मुले अल्बम, गाणी यामध्येच गुंतून पडली तर त्यांची आपण सगळ्याच प्रकारची प्रगती खुंटवतो असे नाही का पालकांना, समाजाला वाटत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जोहार मायबाप जोहार या भैरवीने नयना आपटे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.