Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

बँकेत अधिकारी असूनही सामाजिक कर्तव्याच्या भावनेने मुंब्रा रेल्वे स्थानकात दररोज सकाळी कचरा गोळा करून तो बाहेर नेऊन टाकणाऱ्या नजिमा सय्यद यांना ‘सलाम ठाणे’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ‘मी मराठी’ वाहिनीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील आठजणांना गौरविण्यात आले.

कल्याण परिवहन सेवेची बाजीप्रभू चौक ते वाशी बससेवा
डोंबिवली/प्रतिनिधी

कल्याण- डोंबिवली परिवहन उपक्रमाने आजपासून डोंबिवली (बाजीप्रभू चौक) ते वाशी बससेवा सुरू केली. गेले अनेक वर्षांपासून प्रवासी या बससेवेची मागणी करीत होते.

डोंबिवलीत पार पडला आगळावेगळा विवाह
डोंबिवली/प्रतिनिधी

मतिमंद व कर्णबधिर मुलांचे विवाह हा तसा दुर्मिळ योग. अशा प्रकारचे विवाह व्हावेत म्हणून या क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी, स्वयंसेवी संस्था संबंधित संस्थेत, शाळेत जाऊन मार्गदर्शन करत असतात. या मार्गदर्शनाचा परिणाम म्हणा किंवा कसे,पण डोंबिवलीत मतिमंद मुलगी आणि कर्णबधिर मुलगा यांचा विवाह रविवारी रघुवीरनगरमधील माधवाश्रम सभागृहात थाटात पार पाडला.यावेळी अंबादास पंत वैद्य मतिमंद अनाथालयाचे संस्थापक संचालक शंकरराव पापळकर, उद्योजक विठ्ठल कामत, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद सुर्वे, आशुतोष ठाकूर उपस्थित होते.

उस्ताद उस्मान खाँ यांचे अप्रतिम सतारवादन
सदाशिव बाक्रे

ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे या संस्थेच्या वतीने नुकताच एक कार्यक्रम संस्थेच्या ज्ञानदेव सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ठाण्यातील किराणा घराण्याचे एक गायक गिरीश संझगिरी यांच्या पुढाकाराने स्थापनेच्या प्रक्रियेत असलेल्या ‘पं. फिरोज दस्तूर प्रतिष्ठान’ या संस्थेचे सहकार्यही या कार्यक्रमासाठी लाभले होते. यानिमित्ताने पं. फिरोज दस्तूर यांचे चाहते व शिष्यवर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

आमदार मोते यांच्या आक्रमक पवित्र्याने तहसीलदार वरमले
बदलापूर/वार्ताहर

येथील सूर्योदय सोसायटी शर्तभंग वसुलीबाबत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा इशारा देताच मालमत्ता सील करण्याची कारवाई महसूल खात्याने स्थगित केली. व्यापारी, नागरिक आणि सूर्योदय सोसायटीला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन तहसीलदार जगतसिंग गिरासे यांनी दिले.

प्रसाद कोळंबकर यांचा गौरव
ठाणे/प्रतिनिधी :
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योगक्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारे ठाण्यातील तरुण उद्योजक प्रसाद कोळंबकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वयंरोजगार सेलच्या वतीने राज ठाकरे यांच्या हस्ते आदर्श उद्योजकता पुरस्कार प्रदान करून नुकतेच गौरविण्यात आले.
शिक्षण चालू असतानाच प्रसादच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबासह त्यांना शास्त्रीनगरच्या झोपडपट्टीत स्थलांतरित व्हावे लागले. घरोघर दूध टाकून सिव्हिल इंजिनीयरिंग पूर्ण केले. पण स्वत:चे काहीतरी करायचे असा निर्धार करून त्यांनी येऊरच्या निसर्गरम्य परिसरात ‘एक्झॉटिका’ सुरू केले. मोठय़ा कल्पकतेने त्याची रचना केली व त्यात ते यशस्वी झाले. पाचगणी व महाबळेश्वर येथील हॉटेलचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. नाशिक येथे झालेल्या उद्योजकांच्या या सत्कार समारंभात मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी कोळंबकर यांचे कौतुक करून त्यांना व्यवसायातील चांगल्या भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या

तंत्रनिकेतन अधिव्याख्यातांमध्ये तीव्र नाराजी
ठाणे/प्रतिनिधी

शासकीय तसेच अनुदानित तंत्रनिकेतनातील अधिव्याख्यातांना पदोन्नती मिळून वर्ष होत आले तरी थकबाकी देण्यास प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने अधिव्याख्यातांमध्ये नाराजी पसरली आहे.
मुंबई विभागातील आठ अनुदानित तंत्रनिकेतनातील अधिव्याख्यातांना प्रदीर्घ काळ रेंगाळलेली पदोन्नती एप्रिल २००७ च्या आदेशान्वये तंत्रशिक्षण संचालकांनी मान्य केली. मात्र ११ महिने अंमलबजावणी करण्यात आली नाही. १७ मार्च २००८ ला ‘लोकसत्ता’मध्ये ‘टेक्निकल एररमध्ये अडकली वेतनश्रेणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच वेतन निश्चिती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा प्रशासनाची लालफित आडवी घालण्यात आली आणि थकबाकी रखडवून ठेवण्यात आली. वर्ष उलटत असताना अधिव्याख्यातांना थकबाकी देण्यात आलेली नाही. वारंवार संघर्ष करून हक्क मिळवायला लागत असलेले हे अधिव्याख्याते आंदोलनाच्या मार्गावर आहेत.

शिंगडा यांच्या स्वीय सहाय्यकावर हल्ला
वाडा/वार्ताहर :
खासदार दामू शिंगडा यांचे खासगी स्वीय सहाय्यक नरेश आकरे हे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता त्यांच्या वाडा येथील कार्यालयाजवळ उभे असताना तीन ते चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आकरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ठाणे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका साप्ताहिकमध्ये आकरे यांच्याबाबत टीकात्मक लिखाण करण्यात आले होते. आकरे आपल्या कार्यालयाजवळ उभे असतानाच तीन ते चार इसमांनी आकरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पत्रकार शरद पाटील याने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आकरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीतकेला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, दोन्ही हातांना जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणासही अटक केलेली नाही.