Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३ मार्च २००९
विविध
(सविस्तर वृत्त)

‘स्लमडॉग’मधील पैसा झोपडपट्टीतील मुलांसाठी - डॅनी बॉयल
लंडन, २ मार्च/पीटीआय

 

ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटातून होणारी कमाई मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलांच्या कल्याणासाठी वळविण्यात येत असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी सांगितले.
‘स्लमडॉग’मधील बालकलाकार अझरुद्दिन इस्माईल याच्या वडिलांनी मानधनापोटी अधिक पैशांची मागणी केल्यानंतर बॉयल यांनी वरील विधान केल्याचे ‘द डेली मेल’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
‘त्या बालकलाकारांना आम्ही दिलेले पैसे त्यांच्याकडे राहिलेले दिसत नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्या शिक्षणाविषयी योजना आखली असून, शिक्षण पूर्ण होताच त्यांना आणखी पैसे दिले जातील, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठीही पैसे देण्यात आले आहेत’, असे बॉयल यांनी त्यांच्या गावी परतल्यानंतर सांगितले.
‘स्लमडॉग’ला आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळूनदेखील त्यातील बालकलाकारांना पुरेसे मानधन मिळाले नसून, ते अद्याप झोपडपट्टीत राहात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे बॉयल व निर्माते यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यावर निर्मात्यांनी त्याचा इन्कार करीत या बालकलाकारांना ऑस्कर वितरण समारंभासाठी लॉस एंजिल्सला नेले. त्यांना नवीन घरे देण्याचेही निर्मात्यांनी कबूल केले आहे.
चित्रपटातील सलीम व लतिकाची भूमिका करणारे अझरुद्दिन इस्माईल व रूबिना अली यांना अधिक पैसे दिल्यास त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे मत बॉयल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘पैसा मिळाल्यावर ती मुले विचलित होतील. त्यामुळे त्यांनी प्रथम शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.’ तसेच काही पैसे मुंबईतील गरीब मुलांसाठी काम करणाऱ्या संघटनांनाही देण्यात आल्याचे बॉयल यांनी सांगितले.