Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

व्यक्तिवेध

गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांच्या बर्केशेअर हॅथवे या कंपनीच्या समभागधारकांना त्यांनी पाठविलेल्या पत्रात आपले वारसदार भारतीय वंशाचे अजित जैन असल्याचे सूतोवाच केले आहे. या पत्रात त्यांनी जैन यांच्या कारभाराची स्तुती केली आहे. अमेरिकेतील कॉर्पोरेट वर्तुळात अजित जैन हे नाव परिचित असले तरी आपल्याला त्यांचा विशेष परिचय नाही. त्यामुळे बफे यांनी त्यांच्या नावाविषयी सूतोवाच केले त्यावेळी, कोण हे जैन असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण जैन यांच्या

 

कारकीर्दीचा मोठा कालावधी अमेरिकेतच व्यतीत झाला. ओरिसात १९५१ साली अजित जैन यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर आय.आय.टी. खरगपूर येथून १९७२ साली अभियांत्रिकीतील पदवी संपादन केली. आय.आय.टी.मध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास त्यांनी कधीच गांभीर्याने केला नाही, असे त्यांचे सहकारी त्यांची आठवण सांगतात. कारण जैन यांना विशेष रस होता तो अर्थशास्त्र, समाजशास्त्र व व्हिएतनाम युध्द या विषयांत. या आपल्या आवडीच्या विषयांच्या चर्चेत ते मोठय़ा हिरीरीने सहभागी होत असत. अजित जैन जरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी असले तरी ते फार काळ या क्षेत्रात रममाण होणार नाहीत असेच त्यावेळी दिसत होते. आणि ते खरेच ठरले. अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी मिळविलेल्या जैन यांची पावले अखेर अर्थशास्त्राच्या दिशेने वळली. आय.आय.टी.तून पदवी मिळाल्यावर ते आय.बी.एम. मध्ये दाखल झाले. १९७३ ते ७६ या काळात ते भारतात आय.बी.एम.मध्ये होते. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. १९७८ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एम.बी.ए. केले. भारतात परतल्यावर १९८० मध्ये ते मॅकेन्सी अँड कंपनीत दाखल झाले. याच सुमारास त्यांचा विवाह झाला. पत्नीची नोकरी अमेरिकेत असल्याने त्यांनीही अमेरिकेला जाण्याचे ठरविले. अमेरिकेत ते मॅकेन्सीमध्येच दाखल झाले. अमेरिकेत त्यांची करिअर बहरू लागली आणि १९८६ साली ते वॉरन बफे यांच्या पुनर्विमा कंपनीत दाखल झाले. कामातील त्यांचा धडाका व धोका पत्करण्याची त्यांची तयारी पाहून या अधिकाऱ्यात काही तरी वेगळे कौशल्य आहे, हे बफे यांनी ओळखले. कंपनीत बढती मिळत गेली. आता ते बफे यांचे सर्वाधिक विश्वासातले म्हणून ओळखले जातात. बफे त्यांच्याशी प्रत्येक निर्णयाबाबत चर्चा करतात. बर्केशेअर हॅथवेमध्ये दाखल झाल्यापासून त्यांनी कंपनीचा व्यवसाय वाढवत नेला. आज बर्केशेअर हॅथवेच्या विमा विभागाकडे दोन अब्ज डॉलरचा राखीव निधी आहे. एवढा मोठा राखीव निधी उभारण्याचे श्रेय पूर्णत: जैन यांच्याकडे जाते. जैन नेतृत्व करीत असलेल्या विमा विभागातील कंपनीने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने, तसेच मोठय़ा प्रमाणावर राखीव निधी उभारल्यानेच बफे हे जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले. अजित जैन यांच्या या कार्याची दखल बफे यांनी वेळोवेळी घेतली आहे. एक वर्षी बफे यांनी जैन यांचा उल्लेख ‘असामान्य व्यवस्थापक’ असा केला होता. तर एक वर्षी ‘आपल्या कंपनीत अजितचे मूल्य तुलनीय नाही’, असा उल्लेख केला होता. अजित जैन यांनी आपला पुनर्विम्याचा व्यवसाय वाढविताना अनेक प्रतिष्ठित आस्थापनांच्या इमारतींचा पुनर्विमा काढला होता. त्यांच्या या कामगिरीमुळे ते ‘बर्केशेअर’च्या कुटुंबात फिट बसले, असे जाणकार म्हणत. गेल्या वर्षी पत्रकार परिषदेत बोलताना बफे म्हणाले होते की, आपला मुलगा होवर्ड हा कंपनीचा अध्यक्ष झाला असला तरी नवीन कार्यकारी संचालक शोधावा लागणार आहे. त्यानुसार बफे यांनी आपला हा शोध पूर्ण केला असावा आणि आपला वारस म्हणून अजित जैन यांची निवड केली. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीने आपला वारस म्हणून एका भारतीयाची नियुक्ती करावी, ही बाब आपल्या सर्वाना अभिमानाची ठरावी.