Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

रेल्वे सुरक्षा जवानाची गोळी झाडून आत्महत्या?
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

कार्बाईनमधून गोळी सुटून रेल्वे स्थानकावर तैनात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्रीनंतर सव्वातीन वाजता घडलेल्या या घटनेने निरव शांततेत असलेला रेल्वे स्थानक परिसर शहारला. हा अपघात की आत्महत्या, असा संभ्रम पोलिसांमध्ये आहे. धनंजयकुमार सिंह हे मृत जवानाचे नाव असून तो मूळचा जौनपूरचा रहिवासी आहे.

५० हजार कोटींच्या प्रकल्पाचे गौडबंगाल
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

नागपूर विमानतळाच्या हस्तांतरणप्रसंगी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यात ववासी कंपनीच्या सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते तर, दुसरीकडे कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे राजस्थानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

गरिबांचा फ्रीज बाजारात
आला उन्हाळा

नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

उन्हाळ्याचे वेध लागताच जशी कुलरची आवशकता भासते त्याचप्रमाणे गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ व सुरई घेण्याकडे सामान्यांचा कल असतो. आज घरोघरी फ्रीज असले तरी, माठाशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्याची खरेदी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात केली जाते. बाजारात हे माठ व सुरई मोठय़ाप्रमाणात विक्रीला आले आहेत.

शेतकरी आत्महत्यांवर ‘भारतीय किसान हितरक्षक कायदा’ प्रभावी उपाय -कांचन कोतवाल
भंडारा, २ मार्च / वार्ताहर
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न केवळ कर्जमाफीच्या मलमपट्टीने सुटणार नाही. त्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतील व प्रसंगी कठोर निर्णयही सरकारला घ्यावे लागतील, असे मत कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती करणारे अ‍ॅड. कांचन कोतवाल यांनी येथे व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर ‘भारतीय किसान हितसंरक्षक कायदा’ एक प्रभावी उपाय ठरू शकतो, असे कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भंडारा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत ‘भारतीय किसान हित संरक्षक कायदा २००९’ हे पुस्तक कोतवाल यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नुकतेच भेट दिले.

प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेवरून वाद
बुलढाणा शहरासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजना खडकपूर्णाऐवजी पेनटाकळी प्रकल्पावरून करण्याच्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या मागणीमुळे चिखली व मेहकर परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. पेनटाकळीच्या तुलनेत खडकपूर्णा प्रकल्पात तीनपट पाणीसाठा असून पेनटाकळीवरून बुलढाण्याला पाणीपुरवठा केल्यास त्याचा विपरीत परिणाम चिखली शहराच्या पाणीपुरवठय़ावर तसेच शेकडो हेक्टर सिंचनावर होऊ शकतो. ही भीती असताना मोठय़ा खडकपूर्णाऐवजी पेनटाकळी या लहान प्रकल्पावरील ताण वाढवण्याच्या बोंद्रे यांच्या भूमिकेमुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर दहावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

शिक्षणमंत्र्यांनी संस्थाचालक आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यामुळे दहावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती माजी आमदार विनोद गुडधे पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. विद्यार्थ्यांना वेठीस न धरता मागण्यापूर्ण होईपर्यंत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही गुडधे यांनी स्पष्ट केले.

शासकीय मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणासाठी १२४ कोटीचा प्रस्ताव
गोसावी यांची अधिवेशनात माहिती
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
शासकीय मुद्रणालयीन मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे पाचवे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच आमदार निवासात पार पडले. यावेळी शासकीय मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणासाठी १२४ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून बीओटी तत्त्वावर त्याच्या आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पी.जे. गोसावी यांनी दिली.

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
नागपूर, २ मार्च/ प्रतिनिधी

भारतीय पुरस्कार विजेते संघ या संस्थेतर्फे सवरेत्कृष्ट पुस्तक व विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासाठी देशभरातील कुठल्याही भाषेतील पुस्तक व विशेषांकाच्या प्रत्येकी दोन प्रती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रचनाकार, कवी, लेखक, संपादक, प्रकाशक व मुद्रक हे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवू शकतात.

मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार
स्वामिनी मंडळाच्या मेळाव्यात सरकारला इशारा
अकोला, २ मार्च / प्रतिनिधी
सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या मेळाव्यात देण्यात आला. निराधार महिलांसाठी चळवळ गतिमान करण्याचा निर्णयही शुक्रवारी पार पडलेल्या या मेळाव्यात घेण्यात आला.

मंगेझरीत आदिवासी मेळावा व बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण
गोंदिया, २ मार्च / वार्ताहर

जोपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशाचा सर्वागीण विकास होणार नाही, असे प्रतिपादन नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले.
मंगेझरी येथे आदिवासी मेळावा व बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पटेल पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाच्या विकासाकरिता राज्याच्या अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद आहे. या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अदानी, बिरसी सारखे मोठे प्रकल्प येथे स्थापन होत आहेत.

परिश्रमातूनच कादंबरी घडते -बाबाराव मुसळे
कादंबरी लेखनावर कार्यशाळा
अमरावती, २ मार्च / प्रतिनिधी
कादंबरी लेखनासाठी केवळ विषयाची कल्पना करून चालत नाही, तर त्याला वास्तवाशी नाळ जोडावी लागते. वास्तववादी लेखन, व्यापक दृष्टी आणि परिश्रमातूनच कादंबरी घडत असते, असे प्रतिपादन कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी येथे केले. विदर्भ साहित्य संघाच्यावतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ‘मी आणि माझी कादंबरी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

मेटॅडोर उलटून १५ जखमी
चंद्रपूर, २ मार्च / प्रतिनिधी

चंद्रपूर-घुग्घुस मार्गावर एमआयडीसी वळणावर भरधाव मेटॅडोर उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. रविवारी रात्री ९.३० वाजता हा अपघात झाला. या अपघातातील चार जबर जखमींना नागपूर येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. येथील दीपक पटकोटवार हे मुलगा व मुलीचा नवस फेडण्यासाठी म्हणून सहकुटुंब मारडी या गावी मेटॅडोरने गेले होते. तेथून रात्री परत येत असताना एमआयडीसी वळणावर ही मेटॅडोर उलटली. या अपघातात एकूण १५ जण जखमी झाले. या मेटॅडोरमध्ये चाळीस जण बसले होते. यातील ज्योती पटकोटवार, सरिता गाणेवार, रमेश गाणेवार, सुखन मंचेवार हे चौघे जबर जखमी झाले तर दशरथ पटकोटवार, संतोष पेचकर, राजू पटकोटवार, सुधाकर कुंदोजवार, वामन पांडे, वासुदेव गापणे, शोभा पटकोटवार, नला वासनकर, तिरोना पटकोटवार, संजू पटकोटवार, संदीप वासनकर यांचा समावेश आहे.

तत्त्वज्ञान शिक्षक संघाचे ६ व ७ मार्चला अधिवेशन
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तत्त्वज्ञान शिक्षक संघाचे ३१वे द्वि-दिवसीय वार्षिक अधिवेशन येत्या ६ व ७ मार्चला श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयात आयोजित केले आहे. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाचे डॉ. प्रदीप गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ मार्चला सकाळी ९.३० वाजता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ए.के. गांधी यांच्या हस्ते आणि नागपूर शिक्षण मंडळाचे सचिव सुधीर बाहेती यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
६ मार्चला सकाळी ११.३० वाजता ‘दहशतवादाचे तत्त्वज्ञान’ या विषयावरील परिसंवादाला डॉ. शांता कोठेकर, डॉ. किशोर महाबळ, डॉ. विनय देशपांडे, डॉ. विजय श्िंागणापुरे, डॉ. दीप्ती ख्रिश्चन, प्रा. अशोक नानोटकर उपस्थित राहतील. शनिवार, ७ मार्चला ‘प्रा. मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ या विषयावर डॉ. सुनिती देव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. प्रा. राजे मारडकर, प्रा. यशोधरा हाडके, प्रा. शैलजा खोरगडे, डॉ. वृषाली कुलकर्णी विचार मांडतील. याच दिवशी दुसऱ्या सत्रात व्यक्तिगत निबंध वाचन होणार असून, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली आहे. ‘दूरदर्शन आणि नीतीमुल्य’ व ‘पर्यावरण आणि नीती’ या दोन विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सर्व तत्त्वज्ञानप्रेमींनी अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन नुप्टा अध्यक्ष डॉ. वृषाली कुलकर्णी यांनी केले आहे.

धूम्रपान करू नये -डॉ. मेहता
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

कर्करोग होऊ नये यासाठी तंबाखू, गुटखा खाऊ नये तसेच धूम्रपान न करण्याचा सल्ला कर्करोग तज्ज्ञ डॉ. अजय मेहता यांनी दिला. भारत सरकारच्या महिला बळकटीकरण योजनेंतर्गत खाण ब्युरो सशक्तीकरण समितीतर्फे भारतीय खाण ब्युरोच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात ‘कर्करोग: उपचार आणि जागरुकता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. मेहता बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाण ब्युरोचे महानियंत्रक सी.एस. गुंडेवार होते. डॉ. सुचित्रा मेहता, गीता माथुर प्रामुख्याने उपस्थित होत्या. पहिल्या अवस्थेतील कर्करोग लवकर बरा होऊ शकतो. यासाठी प्रत्येक महिलेने ४० वर्षांनंतर दरवर्षी कर्करोग तपासणी करून घेतली पाहीजे, असेही डॉ. मेहता म्हणाले. नियमित योग, ध्यान व व्यायामाबरोबरच औषधे घेतली की त्याचा लवकरत परिणाम दिसून येतो, असे सी.एस. गुंडेवार म्हणाले. संचालन आशा मोटघरे यांनी केले. जी.जोसेफ यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. माया गायकवाड, भाविका रामटेके, सुचिता शर्मा, उषा पाटील, रेमा नायर, आर.के. बेंद्रे, जी.आर. मुलचंदानी, अनिता शर्मा प्रामुख्याने उपस्थित होत्या.

हलबा समाजातील महिलांचा मतदानावर बहिष्कार
नागपूर, २ मार्च/प्रतिनिधी
आदिम संविधान संरक्षण समितीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते यांच्या अध्यक्षतेखाली मध्य नागपुरात महिला मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अश्वीन अंजीकर, विमल गायकवाड, राधा पाठराबे, बेबी पराते, कल्पना खोत, डॉ. रुपाली रंभाड, सविता हेडाऊ, वच्छला धार्मिक, शंकुतला वट्टीघरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस, भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने हलबा समाजाचा विश्वासघात केल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय महिला मेळाव्यात घेण्यात आला. यावेळी अ‍ॅड. पराते म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमता व गुलामी नष्ट करणारे भारतीय संविधान निर्माण केले. या संविधानामुळे महिलांना समता, न्याय व स्वातंत्र्य मिळाले. पण सत्ता व प्रतिष्ठा मिळाली नाही, त्यामुळे राजकारणात स्त्रियांचा सहभाग दिसत नाही. त्याकरिता महिलांनी त्यांची सर्व शक्ती एकत्रित करण्याची गरज आहे. तरच समाज अधिक प्रगतिशील होईल. महिलांना नोकरी, शिक्षण व निवडणुकांमध्ये आरक्षण मिळेल. हलबा आदिवासी समाजातील स्त्रियांच्या मागासलेपणामुळे समाज गरीब व अशिक्षित आहे. या समाजातील कुटुंबांच्या हलाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलामुलींना शाळेत न पाठविता बालमजुरीसाठी पाठवले जाते. यात बदल घडवण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन समाज घडवण्याचे कार्य केले पाहिजे, असे आवाहनही पराते यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने हलबा समाजातील महिला उपस्थित होत्या.

निर्भयतेने आणि निस्वार्थपणे पत्रकारिता करा -पुरोहित
नागपूर, २ मार्च/प्रतिनिधी
निस्वार्थपणे, संयमाने आणि निर्भयतेने पत्रकारिता करा, असा सल्ला माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी दिला. पत्रकार प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. वने व पर्यावरण राज्यमंत्री विजय वडेट्टीवार आणि बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थिना पारितोषिके देण्यात आली. पत्रकारिता प्रशिक्षणामुळे वर्तमानपत्रातील अनेक बाबींची माहिती मिळाल्याचे, प्रशिक्षणार्थिनी यावेळी सांगितले. प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे विश्वास इंदूरकर, अंधारे, अरूण फणशीकर, प्रदीप मैत्र, गणेश शिरोळे, शिरीष बोरकर, जोसेफ राव, अमरेश प्रामाणिक, र.श्री. फडनाईक आदींनी त्यांचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे संचालन राजेश ओहरी यांनी केले. विश्वास इंदूरकर, संजय मिरे यांनी आभार मानले.

नागपूर विद्यापीठ तोडफोडीचा बीएफएच्या विद्यार्थ्यांकडून निषेध
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाच्या बी.एफ .ए.च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक धवड यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी त्यांच्यासोबत शहर चिटणीस विजय चिटमिटवार प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठावर केलेल्या हल्ल्याचा जगदंबा महाविद्यालयातील प्रशासनाचा व विद्यार्थ्यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विद्यापीठाने त्यांची शिक्षा विद्यार्थ्यांना किंवा महाविद्यालयाला का द्यावी? हल्ल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षामंडळाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रद्दबादल करावा व विद्यार्थ्यांच्या निकालाचा सहानुभूतीने विचार करावा, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची सदर मागणी शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना कळवण्याचे आश्वासन धवड यांनी दिले. निवेदन देण्यासाठी सुमित धांडोळे, पंकज खीची, दीप्ती नाथे, सुरेश रहांगडाले, मनीषा गिरडकर, कुणाल भेदे, रोहित खोब्रागडे यांनी पुढाकार घेतला.

विदर्भ विकास परिषदेचा उपक्रम
चार हजार ज्येष्ठ नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी

विदर्भ विकास परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक समस्या अध्ययन समितीच्या वतीने सर्वश्रीनगर व म्हाळगीनगरातील ज्येष्ठ नागरिकांची नुकतीच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चार हजारावर ज्येष्ठ नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार दत्ता मेघे यांनी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ३५ ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रत्नाकर राऊत यांनी दत्ता मेघे यांना दिली. विदर्भ प्रदेश विकास परिषदेतंर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यात दत्ता मेघे आरोग्य योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांची नि:शुल्क तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. आतापर्यंत शेकडो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना पुढेही सुरू राहील, असे दत्ता मेघे यांनी जाहीर केले. सर्वश्री नगरातील रेखा पाटील आणि म्हाळगीनगरातील वर्षां गुजर यांनी दत्ता मेघे यांना ज्येष्ठ नागरिकांची ओळख करून दिली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष रत्नाकर राऊत, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे शहराध्यक्ष मेहमूद अंसारी व समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड
अकोला, २ मार्च / प्रतिनिधी

अकोला महापालिका स्थायी समितीच्या आठ नवीन सदस्यांची निवड शुक्रवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यामध्ये शिवसेना, भाजप आणि भारिप-बमसंमधील प्रत्येकी एका सदस्याची तर शहर विकास आघाडीच्या पाच सदस्यांचा समावेश आहे. स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कालावधी संपल्यामुळे त्यांच्या पदावर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी महापालिकेतील सर्वसाधारण सभा शुक्रवारी बोलावण्यात आली होती. महापौर मदन भरगड यांनी या सभेत निवड करण्यात आलेल्या नवीन आठ सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये शहर विकास आघाडीचे सच्चानंद लुल्ला, अ. जब्बार, नकीरखान, शहराखातून अब्बासखान, सुरेंद्र शर्मा, चारुशीला ढगे, संतोष अनासने, मो. मुस्तफा यांचा समावेश आहे. अनासने शिवसेनेचे, ढगे भाजपच्या तर मो. मुस्तफा भारिप-बमसंचे असून अन्य पाच सदस्य शहर विकास आघाडीमधील आहेत. निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये सुरेश पाटील, हरीश अलिमचंदानी, शरीफाबी, कमल बलोदे, इकबाल अहमद, सदानंद ईश्वरकर, राजेश मिश्रा, सुनील मेश्राम यांचा समावेश होता. या सभेला उपमहापौर निखिलेश दिवेकर, मनपा आयुक्त जी.एन. कुर्वे तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सेवादास महाराजांची जयंती उत्साहात
कोंढाळी, २ मार्च / वार्ताहर

येथून २० कि.मी. अंतरावरील खापा (धोतीवाडा) येथे संत सेवादास महाराजांचा जयंती महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री आमदार अनिल देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाला माजी सभापती विजयसिंह रणनवरे, उपसभापती योगेश गोतमारे, जिल्हा परिषद सदस्य शेखर कोल्हे, बाबू जोशी, चंद्रशेखर मानका, डॉ. धारपुरे, सभापती शालिन सलीम, जानराव राऊत, नानाजी माळवी, मनोहर कुहीके, सलमा पठाण, वासुदेव अढावू, राष्ट्रपाल पाटील, शेख फहीम, मुस्ताक पठाण, शेषराव ढोके, जावेद पठाण आदी उपस्थित होते. खापा येथील बंजारा समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कवडू चव्हान यांनी यावेळी संत शिरोमणी सेवादास महाराजांच्या आख्यायिका सांगितली. या कार्यक्रमात आमदार अनिल देशमुखांचे स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देऊ व विकास कामात राजकारण आडवे येऊ देणार नाही, अशी ग्वाही या प्रसंगी आमदार अनिल देशमुख यांनी दिली. याप्रसंगी सुरेश डेवले, महादेवराव लाडके, पांडुरंग युवनाते, शेख सुभान, गोवर्धन घुगल, गेंदूजी राऊत, नानाजी माळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन खाळे यांनी तर आभार राष्ट्रपाल पाटील यांनी मानले.

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
सावनेर, २ मार्च / वार्ताहर

स्पोर्ट्स अँड कल्चरल डेव्हलपमेंट असोसिएशनच्यावतीने सात दिवसांच्या रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच येथे पार पडल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सावनेर एकादश संघाने कर्णधार शक्ती पिसे यांच्या नेतृत्वाखाली पटकावले. नगरपरिषद मैदानावर झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर बागडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. साहेबराव वीरखरे, सचिव बाबाराव कोढे, रवींद्र चिखले, मोहन वानखेडे, नगरसेवक विनोदकुमार जैन, बंडू सुके, अ‍ॅड. जयंत खेडकर, मनोज बसवार, अजय केदार, प्रा. विजय बालपांडे, व्यापारी संघाचे अध्यक्ष मदन पाटील, अशोक उमाठे आदी उपस्थित होते.सत्काराबद्दल सुधाकर बागडे यांनी अमोल हिंगणे, आशीष गुप्ता, पंकज बले, योगेश पाटील, धांडे यांच्यासह सावनेर एकादश संघ व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

मंगळसूत्र चोराला अटक; ११ तोळे सोने जप्त
भंडारा, २ मार्च / वार्ताहर

महिलांची मंगळसूत्रे आणि सोन्याची चेन, लांबविणाऱ्या मुंडीकोटा (जिल्हा गोंदिया) येथील सधन कुटुंबातील तरुणाला भंडारा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यात ११ तोळे सोने, एक कार व मोटारसायकलींचा समावेश आहे.मागील दिवाळीनंतर भंडारा येथे मंगळसूत्र व सोन्याची चेन हिसकविण्याचे प्रकार वाढले. गेल्या १६ फेब्रुवारीला खात मार्गावरील वेलकम कॉलनीत चोरटय़ांनी महिलेला अडवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. या चोरटय़ांपैकी एक आरोपी या वसाहतीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भंडारा पोलीस ठाण्याचे संजय कुंभलकर यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने चोरटय़ाला भांडणात गुंतवून ठेवले व पोलिसांनी येऊन त्याला अटक केली. या किशोर बिरनवार याच्या जवळून पोलिसांनी चोरी प्रकरणातील ११ तोळे ७ गॅ्रम सोने, चोरीची अ‍ॅसेंट कार व मोटारसायकलही जप्त केली.

‘बॉलबॅडमिंटन’ स्पध्रेत पटेल महाविद्यालयाचा संघ उपविजेता
चंद्रपूर, २ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन ‘बॉलबॅडमिंटन’ मुलींच्या स्पध्रेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींचा संघ उपविजयी झाला आहे. नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्यावतीने नागपूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन मुलींच्या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेत सर्वप्रथम सरदार पटेल महाविद्यालयाच्या संघाने एम.बी. पटेल साकोली, नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, लोकमहाविद्यालय वर्धा यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत न्यू आर्ट्स, कॉमर्स यांच्यात सामना झाला. ज्योती वाल्दे, प्रियंका रामटेके, संध्या गावंडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत संघाला उपविजयी स्थान मिळवून दिले. उपविजयी संघात अश्विनी भाटवलकर, माही खान, रत्ना बन्न्ोवार, सोनाली मोगरे, भाग्यश्री चिमूरकर, सोनम खान यांचा समावेश होता. उपविजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्राचार्य डॉ. विजय आईंचवार, प्रा. विजय सोमकुंवर, प्रा. गर्गेलवार यांनी अभिनंदन केले.

खापा येथे महिला मेळावा
सावनेर, २ मार्च / वार्ताहर

तालुक्यातील खापा प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर व स्तनदा मातांचा मेळावा पार पडला.
जिल्हा परिषद सदस्य यशोधरा गजभिये यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. राजेश गजभे, बालरोग तज्ज्ञ डॉ. आशीष चांडक, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण चकोले, प्रयोगशाळा तज्ज्ञ वर्षां भगत, वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन खरबुजे आदी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्र्यांच्या समर्थकांचा भंडाऱ्यात ‘रास्तारोको’
भंडारा, २ मार्च / वार्ताहर

राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून गृहमंत्रालयातील शहर विभाग काढून घेतल्याच्या निषेधार्थ त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोरम या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे नुकतेच ‘रास्तारोको’ आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व जयप्रकाश भवसागर, प्रेमसागर गणवीर आणि के.डी. रामटेके यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ‘रास्तारोको’ आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहसचिवपदी नरेंद्र उके
चंद्रपूर, २ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते नरेंद्र उके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवार व धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशाने रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष महेश तपासे यांनी ही निवड केली. उके यांची सचिव सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल चंद्रपूर, बल्लारपूर, कोठारी, गोंडपिंपरी येथील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या निवडीबद्दल अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, शोभा पोटदुखे, धुन्नु महाराज, राजेंद्र वैद्य, वामनराव झाडे, विनोद दत्तात्रेय, दीपक जयस्वाल आदींनी अभिनंदन केले.

वर्धेत विश्वशांती स्तुपाचा वर्धापन दिन
वर्धा, २ मार्च/ प्रतिनिधी
येथील विश्वशांती स्तुपाच्या १६ व्या वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यापीठाचे कुलगुरू विभूती नारायण राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी जपानचे भिक्खू असाई, सातो (नेपाळ), रमा गुरूमाता (कोलकाता), ओकोनागी (राजगीर), होरीउची (दिल्ली), शरद पंडय़ा (अहमदाबाद) व भिक्खू संघरत्न मानके (पवनी) उपस्थित होते. यावेळी महिलाश्रम अध्यापक विद्यालयाच्या मुलींनी सर्वधर्मसमभाव प्रार्थना म्हटली. हिंदी विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या अहिंसा अध्यासनाद्वारे विशेष अभ्यास होत असल्याची माहिती कुलगुरू राय यांनी दिली.अ.वि. जोशी यांनी विश्वशांती स्तुपाचा इतिहास विशद केला. या कार्यक्रमास बिरंची खटुआ व राजू अर्जापुरे उपस्थित होते. स्तुप प्रदक्षिणा व विभूती अर्पणाने कार्यक्रमाची सांगता झाला.

नांदोरा-झिरा शिवमंदिरात गोपालकाला
भंडारा, २ मार्च / वार्ताहर
केंद्र व राज्याचे हिंदूविरोधी सरकार उलथून टाकून भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी सरकार निवडून आणावे, असे आवाहन भाजपचे खासदार महादेवराव शिवणकर यांनी नांदोरा-झिरी येथे शिवमंदिरात गोपालकाल्याच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.सभेपूर्वी गायत्री भजन मंडळाच्या महिला तसेच गणराज राऊत यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे संचालन नामदेव ठवकर यांनी केले.

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
अकोला, २ मार्च / प्रतिनिधी
ट्रॅक्टरने चिरडल्यामुळे पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री बेलखेड येथे घडली. बेलखेड येथील संजय दाते यांचा मुलगा ऋषिकेश घरासमोर खेळत असताना भरधाव ट्रॅक्टरच्या मागच्या चाकात तो सापडला. या अपघातात ऋषिकेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रकचालक अपघातानंतर पळून गेला असून, हिवरखेड पोलिसांनी गजानन दाते यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टरवर क्रमांक नसून, पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले आहे.
पाणी काढताना युवतीचा विहिरीत पडून मृत्यू
पाणी काढताना विहिरीत पाय घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची घटना राजनखेड येथे रविवारी घडली. शिल्पा जाधव (१९) हिचा रविवारी सकाळी पाणी काढताना विहिरीत पडून मृत्यू झाला. सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गावातील गावकऱ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु, डोक्याला बराच मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

सेंट झेवियर्स शाळेत मराठी दिवस थाटात
गोंदिया, २ मार्च / वार्ताहर

शहरातील सेंट झेवियर्स शाळेच्या प्रांगणात ‘मराठी दिवस’ साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून कुंदा जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र बायबल वाचन व स्वागत गीताने करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन पंखुरी शिरोडकर, वैष्णवी तोरणे, आकाश तोडसाम व विशाल अग्रवाल यांनी केले तर विशेष प्रार्थना हिमाली गौतम यांनी गायिली. आभार संस्कृती मस्के हिने मानले.
मराठी दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. विद्यार्थानी विविध मराठी गीते, कविता, नृत्य, नाटक सादर केले. कुंदा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी या कार्यक्रमाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.संस्थेचे संस्थापक ऑग्स्टीन पिंटो व संस्थेच्या व्यवस्थापिका ग्रेस पिंटो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका निता कारवट यांनी पाहुण्यांचे आभार मानले. राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीताने समारोप करण्यात आला.

राष्ट्रीय हरित सेना कार्यशाळा
बुलढाणा, २ मार्च / प्रतिनिधी

रासायनिक रंग पर्यावरणासाठी घातक असतात म्हणून नैसर्गिक रंग तयार करून होळी खेळावी, होळी जाळण्यासाठी लाकूड व गोवऱ्यांचा वापर जनतेने टाळावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण उपसंचालक संजय माळी यांनी केले आहे.सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हरित सेनेच्या शाळांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन होळीची संख्या कमी करणे, प्रतिकात्मक ‘एक गाव एक होळी’ ही संकल्पना जनतेमध्ये रुजवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी राष्ट्रीय हरित सेनेचे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक वायाळ यांनी विचार व्यक्त केले.

योग साधना व रोगनिदान शिबीर
शेगाव, २ मार्च / वार्ताहर

आमदार संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे ३ मार्चपासून योग साधना व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात डोकेदुखी, मुळव्याध, हृदयरोग आदी ५३ आजारांवर योगाद्वारे व आयुर्वेदिक औषधाद्वारे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती रामेश्वर महाराज गंगोत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकऱ्यांना राष्ट्रीय सेवक घोषित करण्यासाठी धरणे
अकोला, २ मार्च / प्रतिनिधी
शेतकऱ्यांना राष्ट्रीय सेवक घोषित करून, त्यांना दरमहा वेतन सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी भारत कृषक समाजाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
भारत कृषक समाजाचे नेते प्रकाश मानकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे देण्यात आले. अहोरात्र परिश्रम करून अन्नधान्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे राष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय सेवक घोषित करून दरमहा वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह पाच एकराहून अधिक शेती असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या ‘शेअर्स’ची रक्कम व्याजासह परत देण्यात यावी, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढवण्यात यावा, शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप तातडीने सुरू करण्यात यावे, आदी मागण्यासांठी हे अांदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी मुथुकृष्णन शंकरनारायणन यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनामध्ये साखरकर, शेषराव पाटील चिखलीकर, अरविंद पाटील, राजकुमार भट्टड, रामेश्वर माळी, शंकर वाकोडे, रामराव पाटील टेकाडे, वामन देशमुख, प्रवीण काळे, हनुमंत सरोदे आदी सहभागी झाले होते.

वीज रोहित्रासाठी शेतकऱ्यांचे उपोषण
अकोला, २ मार्च / प्रतिनिधी
नवीन वीज रोहित्र, डीपी मिळण्यासाठी कसुरा गावातील बागाईतदार शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. कसुरा गावातील बागायती शेतींना विजेअभावी पाहिजे त्या प्रमाणात पाणी पुरवले जात नाही. यामुळे या भागातील शेतीचे गहू, हरभरा या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. ६ महिन्यांपूर्वीच येथील शेतकऱ्यांनी नवीन वीज रोहित्राची मागणी केली होती परंतु, मागणी पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अकोल्याच्या गोरक्षण मार्गावर असलेल्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर रविवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषणामध्ये सुपडाजी साबे, राम मात्रे, संतोष भालतिलक, सुभाष इथोल, दत्तात्रय ताथोड, अतुल इथोल, सचिन भालतिलक, गजानन इधोळ, ज्ञानेश्वर गव्हाळे, किशोर ताथोड आदी सहभागी झाले आहेत.

सुरेश चोपणे यांना पुरस्कार
चंद्रपूर, २ मार्च / प्रतिनिधी

खगोलतज्ज्ञ व विज्ञान प्रसारक सुरेश चोपणे यांना ‘एअर इंडियाचा’ बोल्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार शिक्षकी पेशासोबतच पर्यावरण व विज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल देण्यात आला आहे. त्याबद्दल एअर इंडियाचे अध्यक्ष व मुख्य संचालक रघू मेणन यांनी चोपणे यांचे अभिनंदन केले आहे. सुरेश चोपणे यांना हा बोल्ट अवॉर्ड ऑक्टोबर-नोव्हेंबर ०८ मध्येच जाहीर झाला होता. डिसेंबर-जानेवारीमध्ये मुंबई येथे पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजनही होणार होते. हा पुरस्कार प्रदान सोहोळा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द करण्यात आला व घरपोच संशोधन, स्वयंसेवी संस्थाचे कार्य, विज्ञान प्रसाराच्या कार्याकरिता अनेक पुरस्कार मिळाले असून यात प्रामुख्याने इंटरनॅशनल मिलेनियम पर्सनॅलिटी अवॉर्ड, राष्ट्रपती पुरस्कार, विज्ञान पुरस्काराचा समावेश आहे. खगोल, भूगर्भ पुरातत्त्व व पर्यावरण क्षेत्रात त्यांचे २५ शोधनिबंध प्रकाशित झाले आहे. विविध संशोधनासाठी सायन्स काँग्रेसतर्फे ‘डॉक्टर ऑफ डॉक्टर्स’ उपाधी देऊन गौरव करण्यात आला आहे. इंग्रजी भाषेतील ‘युनिव्हर्स’ नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

शेतमजुरांचा मेळावा
कुही, २ मार्च / वार्ताहर

नागपूर जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने येत्या ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता कुही ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर शेतमजुरांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास अन्न व पुरवठा मंत्री रमेश बंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.