Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ मार्च २००९

विविध

‘स्लमडॉग’मधील पैसा झोपडपट्टीतील मुलांसाठी - डॅनी बॉयल
लंडन, २ मार्च/पीटीआय

ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटातून होणारी कमाई मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलांच्या कल्याणासाठी वळविण्यात येत असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी सांगितले. ‘स्लमडॉग’मधील बालकलाकार अझरुद्दिन इस्माईल याच्या वडिलांनी मानधनापोटी अधिक पैशांची मागणी केल्यानंतर बॉयल यांनी वरील विधान केल्याचे ‘द डेली मेल’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

काँग्रेसशी युती होण्याची मुलायमना आशा
नवी दिल्ली, २ मार्च / पी. टी. आय.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत काल उत्तर प्रदेशातील जागावाटपासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी आज लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मुलायमसिंग यादव म्हणाले, की सपा-काँग्रेस युती व्हायलाच हवी. आम्ही सोनिया गांधी यांच्याशी सतत संपर्कात राहणार आहोत.काँग्रेस अध्यक्षांशी आपण भविष्यातील कार्यक्रमाविषयी काही चर्चा केली का, असे विचारले असता या विषयावर अधिक भाष्य करण्यात यादव यांनी नकार दिला. जागा वाटपासंदर्भातील तोडगा काढण्यासाठी सोनिया गांधींशी भेट घेण्याची आपली केव्हाही तयारी होती.युती व्हावी, कायम राहावी म्हणून यापुढेही गरज भासेल तेव्हा सोनियाजींची भेट घेण्याची आपली तयारी राहील, असे ते म्हणाले.काँग्रेससाठी २५ जागा सोडण्याची सपाची तयारी आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘हे पाहा आमच्या ५४ किंवा ५५ जागा असतील हे आम्ही आधीच जाहीर केलेले आहे. आणखी आताच सांगू शकत नाही.’’

जगातील दहशतवाद्यांचे पाकिस्तान आश्रयस्थान - गेट्स
वॉशिंग्टन, २ मार्च/पी.टी.आय.

अमेरिकेच्या दहशतवादविरोधी लढय़ात अडथळे निर्माण करण्यासाठी जगातील सर्व दहशतवादी संघटनांना पाकिस्तान हे सुरक्षित आश्रयस्थान वाटत असून तेथून ते आपली सूत्रे निश्चिंतपणे हलवीत आहेत, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी म्हटले आहे.केवळ अल् कैदाच नव्हे तर तालिबान, हकानी, गुलबद्दिन हिकमतयार व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या अन्य गटांना एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी पाकिस्तानची सीमा सुरक्षित वाटते. हे सर्व गट वेगवेगळे असतील, पण ते एकत्रितपणे काम करतात. जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे तोपर्यंत ते अमेरिकेसाठी त्रासदायक ठरू शकतात, असे गेट्स यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गेट्स यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कायानी यांची गेल्याच आठवडय़ात वॉशिंग्टन येथे भेट घेतली होती. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या आदिवासी भागात सुरू असलेल्या घडामोडी आपल्या देशासाठी धोकादायक असल्याचे तेथील नेत्यांना कळून चुकले आहे.

चिनी खेळण्यांच्या आयातीवरील बंदी मागे
नवी दिल्ली, २ मार्च/पी.टी.आय.

आंतरराष्ट्रीय सुरक्षेची अट कायम ठेवून, भारताने आज चिनी खेळण्यांच्या आयातीवरील बंदी मागे घेतली. सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने २३ जानेवारीला चिनी खेळण्यांच्या आयातीवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. ‘आय.एस.ओ.८१२४’ व ‘ए.एस.टी.एम.एफ.९६३’ किंवा ‘आय.एस.९८७३’ या मानांकनांनुसार पात्र ठरणाऱ्या वस्तू चीनमधून आयात करता येतील, असे व्यापार मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही मानांकने प्रामुख्याने आरोग्य व सुरक्षेविषयी आहेत. आंतरराष्ट्रीय सहकारी मानांकन प्रयोगशाळा (आय.एल.ए.सी.) या संस्थेच्या अधिकृत मान्यतेचे प्रमाणपत्र आयातीसाठी आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आयातीवरील बंदीचा मुद्दा चीनने गांभीर्याने घेतला होता. भारताच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेत (डब्ल्यू.टी.ओ.) आव्हान देण्याचा विचार करीत असल्याचे चिनी माध्यमांनी म्हटले होते. तथापि, बंदी ही ‘डब्ल्यू.टी.ओ.’च्या नियमांनुसारच असल्याचे उद्योग व व्यापार मंत्री कमल नाथ यांनी स्पष्ट केले होते. भारतातील खेळण्यांची बाजारपेठेतील एकूण उलाढाल २५०० कोटी रूपये एवढी आहे. तर, चिनी खेळण्यांचा जागतिक बाजारपेठेतील एकूण वाटा सत्तर टक्के एवढा आहे.

घोंघावणाऱ्या वाऱ्यांनी वणवा आणखी भडकला
मेलबर्न, २ मार्च / ए. पी.

घोंघावणाऱ्या वारे आणि वाढता उष्मा यामुळे येथील व्हिक्टोरिया स्टेटसमधील जंगलात लागलेल्या वणव्याने आणखी रौद्ररुप धारण केले असून वातावरणातील उष्माही कमालीचा वाढल्याने या परिरातील शंभरहून अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात या परिसरात वादळाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून त्यामुळे या परिसरातील जंगलात लागलेली आग पुन्हा भडकण्याची भिती व्यक्त होत आहे. यापूर्वी सात फेब्रुवारी रोजी लागलेल्या वणव्याने सुमारे २१० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. प्रचंड भडकलेला हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे सुमारे पाच हजार जवान प्रयत्नांची शिकस्त करीत असून हेलिकॉप्टरद्वारेही पाण्याचा मारा सातत्याने करण्यात येत आहे.

बांगलादेशी रायफल्सच्या बंडाचा म्होरक्या अटकेत
ढाका, २ मार्च / पी.टी.आय.

बांगलादेशी रायफल्स सैनिकांनी मागील आठवडय़ात केलेल्या बंडाच्या म्होरक्याला आज अटक करण्यात आली. तोहिदूल आलम असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. वेतनवाढीच्या मुद्यावरून बांगलादेशी रायफल्सच्या सैनिकांनी केलेल्या बंडामध्ये सुमारे ७३ लष्करी अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या बंडामध्ये सुमारे एक हजार सैनिक सहभागी झाले होते. पंतप्रधान शेख हसिना यांच्यासमवेत झालेल्या वाटाघाटीमध्ये या अधिकाऱ्याचा सहभाग होता. आलम यानेच सैनिकांना बंड करण्यास प्रवृत्त केले असून त्यामध्ये अनेक निरपराधरांना आपले प्राण गमवावे लागले. या सर्व घटनेबाबत येथील लालभाग पोलिसात एफआयआर दाखल झाल्याची माहिती ज्योती किश्ना यांनी दिली. आलम यांच्याविरोधात आणखी ठोस पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस प्रसत्नशील आहेत. या बंडामुळे अजूनही ७२ अधिकाऱ्यांचा अद्यापही तपास लागत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

वेतनआयोगाच्या अध्यक्षपदी न्या. गुरबक्स राय माजिठिया
नवी दिल्ली, २ मार्च / पी.टी.आय.

पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय वेतनआयोगाच्या अध्यक्षपदी न्या. गुरबक्स राय माजिठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष न्या. के. नारायण कुरूप यांनी गेल्यावर्षी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे गेले काही दिवस हे पद रिक्त होते.

तिसऱ्या आघाडीची घोषणा
बंगळुरू, २ मार्च / पी.टी.आय.

कॉँग्रेस आणि भाजपाला पर्याय म्हणून निवडणुकीच्या रणांगणात तिसरी आघाडी उतरत असल्याची घोषणा माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे सर्वेसर्वा देवेगौडा यांनी आज केली.या आघाडीत जनता दलासहित सीपीआय, सीपीएम, फॉरवर्ड ब्लॉक, रिपाइं, तेलुगु देसम पक्ष आणि जयललिता यांच्या अण्णा द्रमुक या पक्षांचा समावेश आहे. या आघाडीत कॉँग्रेस तसेच भाजपाच्या विचारसरणीला न मानणारे पक्ष सहभागी झाले असून ते पर्यायी सरकार स्थापण्यास सक्षम असल्याचे देवेगौडा यांनी सांगितले. या तिसऱ्या आघाडीची अधिकृत स्थापना १२ मार्च रोजी कोलकाता येथे करण्यात येणार असून त्याचदिवशी तुमकुर येथे मेळावा घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापूर्वीच देवेगौडा यांनी तिसऱ्या आघाडीची गोषणा केली. या आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नाला देवेगौडा म्हणाले की याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.

मेघालयात काँग्रेसला हुरुप
शिलाँग, २ मार्च/पी.टी.आय.

मेघालयात उमरोई विधानसभा पोटनिवडणुकीत युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीकडून जागा हिसकावून घेतल्यामुळे काँग्रेसचा हुरुप वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस-युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे सरकार खाली खेचण्याचा पर्याय पडताळून पाहिला जात आहे. उमरोई मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार स्टॅन्ले विस रायंबी यांनी युडीपीचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री इ. के. मावलाँग यांचे चिरंजीव जॉर्ज यांचा ४५० मतांनी पराभव केला. मावलाँग यांचे मागील वर्षी १८ ऑक्टोबरला निधन झाल्याने ही पोटनिवडणूक मेघालयात झाली.

मायावतींचा नारा ‘अब दिल्ली की बारी है’
लखनऊ, २ मार्च /पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकींचा कार्यक्रम घोषित झाला आणि बसपाच्या सवेॅसर्वा मायावती यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ही निवडणुक कोणत्याही स्थितीत जिंकायचीच असा सल्ला देतानाच ‘युपी हुई हमारी अब दिल्ली की बारी’ हे घोषवाक्यही ऐकवले. ही निवडणुक प्रतिष्ठेची असून त्यासाठी पक्षात एकी ठेवण्याचेही आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान पदाच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या मायावती यांनी उत्तर प्रदेश मधून जास्ती जास्त जागा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचे सांगितले. केंद्रात यावेळी कोणत्याही स्थितीत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वानी कामाला लागावे, असेही मायावतींनी कार्यकर्त्यांना सांगितले.

राष्ट्रीय लोकदल ‘रालोआ’मध्ये
नवी दिल्ली, २ मार्च / पी. टी. आय.

केंद्रात आणि उत्तर प्रदेशातही आता बदल होण्याची आवश्यकता आहे, असे म्हणून राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पाच वर्षांच्या प्रदीर्घ सत्ताकारणात लोकांनी खूप सोसले. उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीच्या गैरकारभारालाही लोक कंटाळले असून, आता ‘परिवर्तन’ होणे जरुरीचे आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी आज येथे सांगितले. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग म्हणाले, की रालोआत राष्ट्रीय लोकदल सहभागी झाल्याने पश्चिम उत्तर प्रदेशात चांगला लढा देता येणार आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत राजनाथसिंग हे गाझियाबाद येथून निवडणूक लढविणार आहेत. राष्ट्रीय लोकदलाचे बळ लाभल्याने शेतकरी व सामान्यजनांच्या दृष्टीने आघाडी आता खरी जनवादी झाली असल्याचे जनता दल (सं.)चे अध्यक्ष शरद यादव यांनी सांगितले. यादव हे रालोआ आघाडीचे कार्यकारी निमंत्रक आहेत.

यंदाचा निवडणूक खर्च अमेरिकेपेक्षा अधिक
नवी दिल्ली, २ मार्च/पी.टी.आय.

बराक ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांनी गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केलेल्या खर्चाहून अधिक रक्कम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचा अहवाल ‘सेंटर फॉर मीडिया स्टडिज’ या संस्थेने दिला आहे. या निवडणुकीत एकूण १० हजार कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जॉन मॅकेन यांनी निवडणुकीत १.८ अब्ज डॉलर म्हणजेच ८ हजार कोटी इतका खर्च केला होता. त्यापेक्षा यंदाच्या निवडणुकींचा खर्च अधिक असणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या खर्चाची आकडेवारी ही संपूर्ण वर्षभराची आहे,तर भारतात काही महिन्यात हा खर्च होणार आहे. यातील २,५०० कोटी अनधिकृतरीत्या खर्च होणार असल्याचे, अहवालात म्हटले आहे. अमेरिकेची यंदाची निवडणुक ही आत्तापर्यंतची सर्वात खर्चिक म्हणून ओळखली जाते. २००४ च्या अध्यक्षीय निवडणुकीपेक्षा दुप्पट खर्च त्यात झाला आहे. त्याचप्रमाणे भारतातही गेल्या निवडणुकीपेक्षा (४,५०० कोटी रुपये) यंदा दुप्पटीहून अधिक खर्च होईल व आत्तापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक म्हणून ओळखली जाईल, असे अहवालात म्हटले आहे.

लोकसभेसाठी ४० लाख नागरिक आणि २१ लाख सुरक्षा सैनिकांची मदत घेणार
नवी दिल्ली, २ मार्च/पी.टी.आय.

येत्या १६ एप्रिलपासून एकूण पाच टप्प्यांमध्ये देशात लोकसभेची निवडणूक पार पडणार असून ती सुरळीत पार पडण्यासाठी ४० लाख नागरिक आणि २१ लाख सुरक्षा सैनिकांचे सहाय्य घेण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी म्हणाले की देशातील एकूण आठ लाख २८ हजार मतदान केंद्रांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय व राज्य पोलीस दले, गृहरक्षक दल आणि रेल्वे सुरक्षा रक्षक मोठय़ा प्रमाणावर तैनात करण्यात येणार आहेत. याबाबत गृह सचिव मधुकर गुप्ता यांच्यासमवेत ६ व २४ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाच्या दोन बैठका पार पडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. याखेरीज लोकसभा निवडणुका यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी ४० लाख नागरी अधिकारी मंडळींची मदत घेतली जाणार असून त्यात मतदान अधिकारी व निरीक्षक, निर्वाचन अधिकारी यांचा समावेश असणार असून केंद्र व राज्य अशा दोन्ही पातळ्यांवरील शासनांमधून त्यांची निवड केली जाईल. नक्षलवादी प्रभाव असणारी राज्ये तसेच काश्मीरमध्ये सातत्याने घुसखोरी होणारे इलाखे आणि ईशान्येकडील राज्ये यांचे निवडणूक आयोगाला मोठे आव्हान राहणार असून तेथे निवडणुकांच्या यशस्वितेसाठी खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. छत्तीसगढमध्येही नक्षलवाद्यांचा मोठा जोर असून तेथील विधानसभेच्या निवडणुकीत मागील वेळी सीमा सुरक्षा दलाची मदत घ्यावी लागली होती, असेही गोपालस्वामी म्हणाले.