Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

व्यापार-उद्योग

मफतलाल उत्पादनक्षमता वाढविणार
डाईड शर्टिग फॅब्रिक्सचे उत्पादन दिवसा ५० हजार मीटर्सवर नेणार!
व्यापारप्रतिनिधी: अरविंद मफतलाल समूहातील मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड या आघाडीच्या कंपनीने आपल्या यार्न डाईड शर्टिग फॅब्रिक्सची उत्पादनक्षमता सध्याच्या प्रतीदिन ३० हजार मीटर्सवरून प्रती दिन ५० हजार मीटर्सवर नेण्याचा विचार केला आहे.

‘भारत मॅट्रिमोनी’ची ‘आयडिया’सोबत भागीदारी
व्यापार प्रतिनिधी:
भारत मेट्रिमोनी डॉटकॉम आणि आयडिया सेल्युलरने आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी विशेष मेट्रिमोनी सेवा सुरू करण्यासाठी भागीदारीची घोषणा केलेली आहे. भारत मेट्रिमोनी डॉटकॉम हे दीड कोटी नोंदणीकृत सदस्य असलेले भारताचे सर्वात विश्वसनीय म् ोट्रिमोनी पोर्टल असून आयडिया सेल्युलर ही चार कोटींहून अधिक ग्राहक असलेल्या अग्रगण्य मोबाईल ऑपरेटर्सपैकी एक आहे. देशभरातील आयडिया ग्राहक भारत मेट्रिमोनीच्या सेवा आपल्या जीपीआरएस एनेबल्ड हँडसेट्सवर मिळवू शकतात.

रिअल इस्टेट सल्लागारांचे पुण्यात राष्ट्रीय अधिवेशन
व्यापार प्रतिनिधी:
नॅशनल असोसिएशन ऑफ रिएल्टर्स संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशन येत्या ६, ७ मार्चला पुण्यात भरणार असून या अधिवेशनाचे आयोजन इस्टेट एजंट्स असोसिएशन ऑफ पुणे यांच्याकडे आहे. कोरिन्थिआन क्लब आणि मगरपट्टा सिटी अ‍ॅम्फीथिएटर या दोन ठिकाणी या अधिवेशनाची विविध सत्रे आयोजित होतील, असे इस्टेट एजंट्स असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष रवी वर्मा यांनी सांगितले. रिअल इस्टेट सल्लागारांनी त्यांचा हा व्यवसाय शास्त्रशुद्ध मार्गाने कसा करावा याचे प्रशिक्षण या अधिवेशनाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या विषयी रिअल इस्टेट सल्लागारांना मार्गदर्शन करतील. या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ गे लिऑन्स या विविध प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन करतील. लिऑन्स यांनी भारतीय घरबांधणी व्यवसाय डोळ्यासमोर ठेवून काही खास शिक्षणक्रम तयार केला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर आचरणात आणल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीची माहितीही त्या देतील. याशिवाय, बांधकाम क्षेत्रातील ताज्या घडामोडींचाही या अधिवेशनात विचार होईल. यामध्ये रिटेल व्यवसाय, टाऊनशिप, एसइझेड या मुद्यांवर संबंधित क्षेत्रातील माहितगार मान्यवरांची भाषणे होतील. तसेच या व्यवसायाशी संबंधित कायदेशीर बाबींवरही विचारविनिमय होईल. उपस्थितांच्या शंका-समाधानासाठीही चर्चासत्रांच्या दरम्यान वेळ राखून ठेवण्यात आला आहे. पुण्यात प्रथमच होणाऱ्या या अखिल भारतीय अधिवेशनासाठी देशभरातून ३०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेतील घरबांधणी व्यावसायिक संघटनेचे प्रतिनिधीही या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफची अभिनव सेवा
व्यापार प्रतिनिधी:
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ विमा कंपनीने आपल्या ग्राहकांना विमा रकमेचा दावा दाखल करण्यासाठी मदत देणारी एक अभिनव सेवा सुरू केली आहे. आयक्लेम (कउछअकट) असे नाव असलेली ही सेवा भारतीय विमा उद्योगक्षेत्रात प्रथमच सुरू करण्यात आली आहे. विमापॉलिसी धारकांना या सेवेअंतर्गत कंपनीकडे विमा रकमेचा दावा सादर करण्यासाठी कंपनीच्याच अधिकाऱ्यांतर्फे सर्वप्रकारची मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी विमा पॉलिसीधारकाने केवळ आपल्या मोबाईललारा कउछअकट स्पेस व नंतर पॉलिसीचा आठअंकी क्रमांक लिहून ५६७६७ क्रमांकावर एसएमएस करायचे आहे. जेव्हा जेव्हा पॉलिसीधारकांची दावा करण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीसाठी एसएमएस सेवा त्वरित धावून येईल. तसेच विनाकटकट विनाविलंब दाव्यांचे सेटलमेंट केले जाईल, असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ विमा कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पूनम भारद्वाज यांनी नव्या सेवेचे अनावरण करताना म्हणाल्या, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचे प्रत्येक उत्पादन व सेवा यांच्यामागे ग्राहकाभिमुखता हेच प्रमुख तत्त्व उभे असते. ग्राहकांना अविस्मरणीय सेवा अनुभव मिळावा हेच कंपनीच्या नावीन्यता धोरणामागील प्रमुख कारण असते. एखाद्या ग्राहकाला सेवेची नितांत गरज असते, तेव्हा त्याला चटकन विमा रक्कम मिळणे हीच खरी सेवा आहे. ही बाब लक्षात घेऊनच आम्ही आयक्लेम ही एसएमएस सेवा सुरू कली आहे. ग्राहकांना या सेवेमुळे विनाकटकट, विनाअडथळा व विनाविलंब क्लेम सेटलमेंट अर्थात विमा रक्कम मिळण्यास मदत होणार आहे.’ एसएमएस सेवेमुळे ग्राहकांना त्यांच्या विमा दाव्यासंबंधीची प्रक्रिया कोठपर्यंत आली, ही माहिती ताबडतोब मिळणे शक्य होणार आहे. त्यासाठी कंपनीतर्फे कोणतेही जादा शुल्क आकारण्यात येणार नाही.

भारत-घानादरम्यान सहकार्यासाठी सामंजस्याचा करार
व्यापार प्रतिनिधी:
भारत आणि घाना या दरम्यान परराष्ट्र व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री आणि घाना-इंडिया बिझनेस नेटवर्क या उभय देशांच्या प्रातिनिधिक संघटनांनी सामंजस्याचा करार केला आहे. ट्रान्स एशियन चेंबरचे निमंत्रक व सचिव संजय भिडे आणि घाना-इंडिया बिझनेस नेटवर्कचे कार्यकारी संचालक क्वाकू अम्प्रात्वूम सारपाँग यांनी या सामंजस्य करारावर मुंबईत झालेल्या कार्यक्रमात स्वाक्षऱ्या केल्या. आर्थिक आणि गुंतवणूकविषयक धोरण, तसेच अन्य महत्त्वाची आर्थिक माहिती संबंधाने उभय देशांमध्ये व्यापार-उदीमाच्या दिशेने फायदा व्हावा यासाठी परस्पर आदानप्रदान वाढावे, उभय देशांमध्ये होऊ घातलेल्या गुंतवणुका, संयुक्त भागीदारीचे प्रकल्प यांना अंतिम रूप देण्यासाठी पुढाकार घेणे त्याचप्रमाणे व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन म्हणून उद्योग मेळावे, प्रदर्शन व तत्सम उपक्रमांचे आयोजन करणे अशी उद्दिष्टे या सामंजस्य करारात निश्चित केली गेली आहेत. बिझनेस टुरिझम आणि सांस्कृतिक आदानप्रदानाच्या प्रोत्साहनार्थ उभय देशांमध्ये वेळोवेळी शिष्टमंडळे पाठविणे, अभ्यास दौऱ्यांचे आयोजनही या निमित्ताने केले जाईल, अशी माहिती संजय भिडे यांनी दिली.