Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

राजकीय हालचालींना वेग
भोपाळ, ३ मार्च / पी.टी.आय.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताच मध्य प्रदेशातील राजकीय पक्षांच्या निवडणूक हालचालींना वेग आला आहे.
मध्य प्रदेशात २३ आणि ३० एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात भोपाळ, विदिशा, होशंगाबाद, सतना, रिवा, सिद्धी, शाहडोल (राखीव), जबलपूर, बालाघाट, छिंदवाडा, मंडला (राखीव), खजुराहो आणि बैतूल या १३ मतदारसंघात तर दुसऱ्या टप्प्यात मोरेना, भिंड (राखीव), ग्वाल्हेर, गुना, सागर, दमोह, टिकमगढ (राखीव), राजगड, देवास (राखीव) , उज्जन (राखीव), मंदासौर, रतलाम (राखीव), धार (राखीव), इंदोर, खरगोन आणि खंडवा या १६ मतदारसंघात मतदान घेतले जाईल.

ज्योतिरादित्यांना लक्ष्मणसिंहाचे आव्हान
भोपाळ, ३ मार्च / पी. टी. आय.

ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वारस ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गुना मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लक्ष्मणसिंह यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याने ज्योतिरादित्यांपुढे मोठे आव्हान तर उभे ठाकले आहेच; परंतु काँग्रेस पक्षातही मोठी खळबळ माजली आहे. माधवराव शिंदे यांचे सुपुत्र असलेले ज्योतिरादित्य शिंदे हे प्रथम माधवरावांच्या निधनानंतर २००२ साली पोटनिवडणुकीत चार लाख मतांनी निवडणूक जिंकले होते. २००४ साली लोकसभा निवडणुकीत ते निवडणूक जिंकले; परंतु मताधिक्य ७० हजार इतके खालावले.

जनांचा प्रवाहो लोटला पण सूर लोपला..
मराठी मनाचा मानबिंदू अर्थातच शरदचंद्र पवार यांना देशाचे तख्त राखण्यासाठी धाडण्याची हाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकमधील महाअधिवेशनाच्या निमित्ताने दशकभरात दुसऱ्यांदा देण्यात आली. हे दिवास्वप्न सहजसाध्य करण्यासाठी मग एका बाजूला मित्रपक्षाला ताणून धरायचे, दुसऱ्या हाताने शिवसेनेला गोंजारायचे आणि ‘कही पे निगाहे, कही पे निशाना’ यानुसार भाजपवर टीका करीत ‘आमचा वाटा कुठाय हो’ एवढंच मागणं दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेसकडे करायचं असा एकूण सूर या अधिवेशनाचा होता.

वाघेला गोध्रातून लढणार?
कॉँग्रेसची गुजरातमधील यादी ८ मार्चपर्यंत
अहमदाबाद, ३ मार्च/पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षाने गुजरातमधील उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून उमेदवारांची यादी येत्या ७-८ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रदेश निवड समितीने केंद्रीय छाननी समितीकडे नावे पाठविली असून त्याआधारे अंतिम यादी बनविण्यात येत आहे. राज्य समितीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी दोन ते तीन नावे अलीकडेच दिल्लीत झालेल्या बैठकीत सादर केली असल्याचे प्रदेश कॉँग्रेसचे प्रवक्ते अर्जुन मोधवादिया यांनी सांगितले. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ७ मार्चला नवी दिल्ली येथे होणार असून त्या वेळी यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तिकिट वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीतच होणार असल्याने राजधानीत इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये एकदोघांचा अपवाद सोडता बहुसंख्य विद्यमान खासदारांना पुन्हा तिकिटे मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या या पक्षाचे बारा खासदार आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला गेल्या वेळी कापडवंज लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र या मतदारसंघात फेरबदल झाल्यामुळे या वेळी ते गोध्रामधून उभे राहण्याची शक्यता आहे.

निवडणुकीतील लहान-मोठे!
नवी दिल्ली, ३ मार्च/पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील उन्नाव मतदारसंघात सर्वात मोठा तर लक्षद्वीप हा सर्वात छोटा मतदारसंघ ठरला आहे. निवडणूक आयोगाने मतदारसंघाची फेररचना केल्यानंतर जाहीर केलेल्या माहितीनुसार देशातील मतदारांमध्ये चार कोटी ३० लाख मतदारांची भरही पडली आहे.
उन्नाव मतदारसंघात १८ लाख ९७ हजार ४७४ मतदार आहेत तर लक्षद्वीपमध्ये ४४ हजार ४२४ मतदार आहेत. मतदानकेंद्रांची सर्वाधिक संख्याही उत्तर प्रदेशातच असून ती एक लाख २८ हजार ११२ आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अनुसूचित जातींसाठी आरक्षित मतदारसंघांची संख्या ७९ वरून ८४ तर अनुसूचित जमातींसाठीची संख्या ४१ वरून ४७ झाली आहे.

प्रियांका गांधी अमेठीत
अमेठी, ३ मार्च/पी.टी.आय.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापाठोपाठ प्रियांका गांधी वढेरा यांनी आज अमेठीला भेट दिली व काँग्रेस सेवादलाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीत प्रियांका यांच्या या दौऱ्याने कार्यकर्ते प्रफुल्लित झाले होते. जो निरपेक्षपणे लोकसेवा करतो त्यालाच खरा जनाधार लाभतो हे लक्षात ठेवा, असा कानमंत्र प्रियांका यांनी कार्यकर्त्यांना दिला. अर्थात ही बैठक पूर्णत: कार्यकर्त्यांपुरतीच मर्यादित होती व प्रसार माध्यमांना तिथे प्रवेशबंदी होती.

चिरंजीवी यांच्या रेल्वे इंजिनाला खीळ!
नवी दिल्ली, ३ मार्च/पी.टी.आय.

आंध्र प्रदेशातील राजकीय पक्षांच्या उरात धडकी भरविणारा तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी याला निवडणूक चिन्हांसंबंधात फटका बसला आहे.
चिरंजीवी यांच्या ‘प्रजाराज्यम’ पक्षाला समान निवडणूक चिन्ह देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. केवळ सदस्यांची संख्या जास्त आहे या कारणावरून ‘प्रजाराज्यम’ला एक निवडणूक चिन्ह देता येणार नाही. त्यासाठी पक्षाने निवडणुकीत लक्षणीय मते मिळवावीत आणि मग अधिकृत व लोकमताचे पाठबळ लाभलेला राजकीय पक्ष या नात्याने त्यांना समान निवडणूक चिन्हावर दावा सांगता येईल. नोंदणीकृत पक्षांना त्या त्या भागांतील उपलब्ध निवडणूक चिन्हांतील एक चिन्ह स्वीकारावे लागेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आपल्या पक्षाला ‘रेल्वे इंजिन’ हे निवडणूक चिन्ह द्यावे, अशी चिरंजीवी यांची मागणी होती.
‘हत्ती उधळणार’
बडोदा : मायावती यांच्या नेतृत्वाखालील ‘बहुजन समाज पक्ष’ गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागा स्वबळावर लढविणार आहे, असे पक्षाच्या राज्यशाखेचे सरचिटणीस नलिन भट्ट यांनी आज जाहीर केले. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने सर्व १६६ जागा लढविल्या होत्या आणि एकाही जागेवर पक्षाला विजय मिळविता आला नाही, याची आठवण करून देता भट्ट उद्गारले की, राज्यात पसरण्याचा आमचा मूळ हेतू तेव्हा साध्य झाला. तेव्हाच्या एकूण मतदानापैकी २.२६ टक्के म्हणजे पाच लाख ७२ हजार मते बसपच्या पारडय़ात पडली होती. आपला पक्ष सत्तेवर आल्यास खाजगी नोक ऱ्यांतही आरक्षण ठेवेल आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटालाही ते मिळेल, असे ते म्हणाले.