Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

लोकमानस

शिष्यवृत्ती परीक्षेत चुकीचे प्रश्न

 

नुकत्याच झालेल्या माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत गणिताच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक १३ हा ‘काळ, काम आणि वेग’ या प्रकरणावर आधारित होता. २००८-२००९ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता सातवीची क्रमिक पाठय़पुस्तके बदलण्यात आली. नवीन अभ्यासक्रमानुसार गणिताच्या पाठय़पुस्तकातून काळ, काम आणि वेग हे प्रकरण वगळण्यात आले. तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित विषयाच्या खासगी मार्गदर्शक पुस्तकांच्या नवीन आवृत्तीमधूनही वरील प्रकरण वगळण्यात आले आहे. एवढे असूनही परीक्षा मंडळाने अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन गुणांचे नुकसान झाले. तसेच भाषेच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक ३९ मध्ये चौकोनी कोडय़ात अक्षरे देऊन एका म्हणीवर प्रश्न विचारला होता. ती म्हण ‘एकटा जीव सदाशिव’ अशी आहे. या म्हणीत ‘च’ हे अक्षर येतच नाही. तरीही नऊ अक्षरांच्या चौकोनी कोडय़ात पहिलेच अक्षर ‘च’ दिले होते. चुकीच्या अक्षरामुळे विद्यार्थ्यांना म्हण जुळवून त्यावरील प्रश्न सोडवता आला नाही.
तरी परीक्षा मंडळाने चुकीच्या प्रश्नांचे चार गुण सर्व विद्यार्थ्यांना देऊन या महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षेतील गुणांचे नुकसान टाळावे.
दिलीप दळवी, लोअर परेल, मुंबई

माळशेज रेल्वे : राजकीय इच्छाशक्तीची गरज
‘देअर इज विल, देअर इज रेल्वे. देअर इज नो विल देअर इज ओन्ली सर्वे’ प्रा. मधु दंडवते यांचे हे विधान. कल्याण-नगर ‘माळशेज रेल्वे’ मार्गाच्या मागणीसाठी गेली १३ वर्षे चाललेल्या चळवळीला चपखल लागू पडणारे. सभा, परिषदा, जनजागरणयात्रा, जनतेचा जाहीरनामा, नेत्यांच्या भेटीगाठी, शिष्टमंडळे, दिल्लीवाऱ्या असे सारे कार्यक्रम या १३ वर्षांत यथासांग पार पडले; पण कुठल्याही राजकीय पक्षाने हा विषय आपला मानलेला नाही.
राजकीय पक्षांना अशा विषयांची गरज उरलेली दिसत नाही. आरक्षण, धर्म, प्रांतीय अस्मितांचा गलका केला की मेंढरांचे कळप जमावेत तसे लोक जमतात. त्यातून निर्माण होणाऱ्या व्होट बँकेचे नियोजन करून सत्तासंपादनाचं लक्ष्य साधता येतं. दिसते. त्यामुळे विकासाचे मुद्दे घेऊन पुढे येणाऱ्या नेत्यांचा काळ मागे पडला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांना जवळच्या मार्गाने मुंबईशी जोडणारा, विशाखापट्टणम्-मुंबई अशी देशाची पश्चिम-पूर्व किनारपट्टी जोडणारा हा रेल्वेमार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे; पण तो मार्गी लागण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सर्वच राजकीय पक्षांना बरोबर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात माळशेज रेल्वेचा विषय कुठल्याही पक्षाचा झालेला नाही. वंचित शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्जमाफी दिली जाते, पण त्याच विदर्भ-मराठवाडय़ाच्या शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगतीचे अनेक स्रोत निर्माण करण्याची क्षमता असलेल्या ‘माळशेज रेल्वे’ मार्गासाठी अवघ्या हजार कोटींची तरतूद करणं शासनाला शक्य होत नाही का?
या रेल्वेमार्गाचे अनेकदा सर्वेक्षण झाले. फेब्रुवारी २००७ ला करण्यात आलेल्या वाहतूक सर्वेक्षणानुसार २०४ कि.मी. लांबीच्या या रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी ९६७ कोटी रुपये लागणार होते. साडेचार वर्षांत बांधकाम पूर्ण होऊ शकेल, असे म्हटले आहे. खासगीकरणातून हा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी दिवंगत खा. प्रकाश परांजपे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. ‘माळशेज रेल्वेचे शिल्पकार’ ठरावेत, एवढय़ा आत्मीयतेने कृषीमंत्री शरद पवार यांनी कल्याण-नगर रेल्वेमार्गाबाबत भूमिका घेतली. केंद्राकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच केंद्र शासनाच्या ‘पिंक बुक’मध्ये या रेल्वेमार्गाचा समावेश झाला आहे. पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली माळशेज रेल्वे कृती समितीने सातत्याने काम केले. एवढय़ा मातब्बर नेत्यांनी मनावर घेऊनही माळशेज रेल्वेची गाडी पुढे का सरकत नाही?
दिनेशचंद्र हुलवळे
अध्यक्ष, माळशेज रेल्वे कृती समिती, घाटकोपर, मुंबई

मुंबई-माहूर रेल्वे व्हावी
शिर्डी येथे रेल्वे स्टेशन झाले याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन! याप्रमाणेच माहूर येथे श्री रेणुकामातेचे मंदिर आहे. येथेही रेल्वे स्टेशन लौकरच सुरू करावे. साडेतीन पीठातील मूळदेवी रेणुका माता असून तिच्या दर्शनाशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. हल्ली बऱ्याच सहल कंपन्या साडेतीन पीठ यात्रा आयोजित करतात. रेल्वेने सलग जाणे सोयीचे होईल.
एरव्ही नांदेड किंवा यवतमाळ येथून मार्ग आहेत. परंतु ते मार्ग बसचे आहेत. मुख्यमंत्री चव्हाणसाहेब हे नांदेडचे असून त्यांनी सदर रेल्वेबाबत पुढाकार घेऊन माहूरच्या रेणुका मातेचे जास्तीत जास्त लोकांना सलग दर्शन घेण्याचे पुण्य मिळवून द्यावे अशी विनंती आहे.
विजया क्षीरे, ठाणे

वैतरणा रेल्वे पुलाला पर्याय हवा
मुंबईला उर्वरित देशाशी ज्या एकमेव मार्गाने जोडले आहे, तो मार्ग वैतरणा नदीच्या पुलावरून जातो. वैतरणा नदीवरील रेल्वे पूल इंग्रजांनी बांधला असून १०० वर्षांहून जुना आहे. आता मात्र या पुलाला धोका निर्माण झाला आहे. भाईंदर येथील खाडीवर जुना एक व नवीन दोन असे तीन पूल आहेत. पण वैतरणा रेल्वे पुलाला पर्याय नाही. त्याची वयोमर्यादा संपुष्टात आली असून तो कधीही वाहून जाऊ शकतो. म्हणूनच भाईंदरच्या खाडीवर नवीन पूल बांधले आहेत, त्याप्रमाणे वैतरणा नदीवरदेखील एक नवीन पूल बांधण्यात यावा. लालूप्रसाद यादव यांनी मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ा वाढवल्या आहेत; त्यांच्या मार्गाबाबतही विचार केला तर ते अधिक चांगले ठरेल.
अस्मिता पाटील, सफाळे

गरज ‘वीज वाचवा, पिके जगवा’च्या घोषणेची
‘पंप नको, वीज द्या’ या पत्रात (१२ फेब्रुवारी) चंद्रकांत पाटणकर लिहितात की, ‘पंपाऐवजी ग्रामीण व शहरी भागाला गरजेनुसार मिळणाऱ्या विजेचे प्रमाण वाढवून घरगुती तसेच उद्योगधंद्यांना मुबलक वीजपुरवठा करायला हवा.’ हे त्यांचे म्हणणे योग्य असले तरी जुने अकार्यक्षम पंप बदलून नवीन पंप शेतकऱ्यांना देणे हे सरकारचे धोरण योग्यच आहे. त्यामुळे बरीच विजेची बचत होणार आहे. कृषिप्रधान भारतातील अनेक संकटांनी पिचलेल्या शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे थोडा उत्साह येईल.
शहरातील व्यावसायिक व घरगुती वीजग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर टाळला तर काही प्रमाणात विजेची बचत होऊ शकते. तसेच वीजनिर्मिती क्षमता वाढेपर्यंत घरगुती व व्यावसायिक तसेच कार्यालयीन कामकाजाकरता वापरण्यात येणारी वातानुकूलित यंत्रणा, डेकोरेशन, लायटिंग वगैरेंवर सरकारने र्निबध घालायला हवेत. गॅस गिझर सवलतीच्या दरात देऊन इलेक्ट्रिक गिझरऐवजी गॅस गिझर वापरला तर वीजबचत होऊ शकते. शहरी भागांत विशेष प्रमाणात वीज टंचाई जाणवत नाही. परंतु देशातील बहुतेक सर्व ग्रामीण भागांत विजेचा लपंडाव चालूच असतो. काही ठिकाणी भारनियमन १२ तासांपेक्षाही जास्त असते. त्यामुळे शहरी भागांत ‘वीज वाचवा, पिके जगवा’ असा प्रचार प्रसारमाध्यमातून करून ग्रामीण भागातील वीज टंचाईबाबत जाणीव करून द्यायला हवी.
चं. ने. शहा, काशिमीरा, ठाणे