Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी पंधरवडय़ात कृती आराखडा
कोल्हापूर, ३ मार्च/विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्य़ातील पंचगंगेच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या सर्व घटकांच्या प्रमुखांची एक बैठक तातडीने बोलाविण्यात येईल. यानंतर प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून पंधरा दिवसांच्या आत एक कृती आराखडा तयार करून प्रदूषण रोखण्यासाठी परिणामकारक पावले टाकली जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी मंगळवारी पर्यावरणवादी संघटनांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. अजितकुमार डांगे
कोल्हापूर, ३ मार्च / विशेष प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांची केंद्रीय विद्यापीठ राजस्थानच्या कुलगुरुपदी निवड झाल्याने डॉ. ए. ए. डांगे यांच्याकडे विद्यापीठाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला. डॉ. साळुंखे यांनी आपल्या निवडीबद्दल कुलपती एस. सी. जमीर यांची भेट घेऊन माहिती दिल्यानंतर त्यांना केंद्रीय विद्यापीठाकडे रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले. त्यावेळी या कुलपती कार्यालयाने डॉ. डांगे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. नूतन प्रभारी कुलगुरू डॉ. अजितकुमार डांगे हे मूळचे सांगली जिल्ह्य़ातील कवठेएकंद या गावचे आहेत.

सोलापूर स्थायी समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे कमटम
सोलापूर, ३ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे राजमहेंद्र कमटम यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे बसवराज केंगनाळकर यांचा १३ विरुध्द ३ अशा फरकाने पराभव केला. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूकप्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. काँग्रेस पक्षातर्फे कमटम यांना संधी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात भाजप-सेना युतीचे केंगनाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. १६ सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये काँग्रेस आघाडीचे १३ सदस्य आहेत.

कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या संचालकांसह पन्नासजणांना कारणे दाखवा नोटीस
कोल्हापूर, ३ मार्च / विशेष प्रतिनिधी

लोकसभेच्या आचारसंहितेचा बिगूल वाजला असतानाच सहकाराची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात सहकार खात्याने भल्याभल्या राजकारण्यांना घरचा आहेर दिला आहे. सहकार खात्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या दोन आर्थिक वर्षांत ५९ संस्थांना अपुरे व विनातारण दिलेल्या १५० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी बँकेच्या कार्यकारी संचालकांसह संचालक मंडळातील ५० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे निवडणुकीचा पहिला अध्याय सुरू होण्यापूर्वीच अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग ’ चे लक्ष्य राष्ट्राचा सर्वागीण विकास-महेश गिरी
साताऱ्यात उद्यापासून महानवचेतना शिबिर
सातारा, ३ मार्च/प्रतिनिधी
दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे लक्ष्य राष्ट्राचा सर्वागीण विकास हे असून त्यासाठी महानवतेचना शिबिराद्वारे व्यक्ती, समाज व राष्ट्रीय मूल्यांची चेतना निर्माण करण्याचे काम करण्यात येत असल्याचे श्री श्री रविशंकरजींचे शिष्य महेशगिरीजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले व सातारा शहरात येत्या ५ ते ८ मार्च या कालावधीत होत असलेल्या शिबिरात सातारा विकासाचा कार्यक्रम देणार असल्याचे जाहीर केले.

हायस्कूलची भिंत कोसळून शिक्षकासह ३ विद्यार्थी जखमी
जत, ३ मार्च / वार्ताहर
जत तालुक्यातील सिध्दनाथ येथील सिध्देश्वर हायस्कूलची भिंत कोसळून झालेल्या अपघातात एका शिक्षकासह तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी साडे आठ वाजता घडली.
भिंत कोसळून जखमी झालेल्यात शिक्षक बसवराज बगली यांच्यासह राजकुमार हिऱ्याप्पा पुजारी (वय १४), सोमाण्णा शिवाप्पा शिंदे (वय १३) व अशोक बसाप्पा बन्नूर (वय १४) या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सिध्देश्वर हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात.

हय़ुमन रिप्रॉडक्शन परिषदेत पद्मा जिरगेंचा शोधनिबंध
कोल्हापूर, ३ मार्च / प्रतिनिधी

इटलीमधील व्हेनिस या ठिकाणी ५ ते ८ मार्च २००९ दरम्यान होणाऱ्या १३व्या जागतिक हय़ूमन रिप्रॉडक्शन परिषदेमध्ये येथील डॉ. पद्मा रेखा जिरगे यांना त्यांचा शोधनिबंध सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. पॉलिसिस्टिक ओव्हारियन सिंड्रोम (स्त्रीबीजनिर्मिती प्रक्रियेमधील दोष)ने त्रस्त असणाऱ्या भारतीय स्त्रियांमध्ये केल्या जाणाऱ्या स्त्रीबीज कोशातून औषधी उपाययोजनांद्वारे आरोग्यदायी स्त्रीबीज निर्माण करण्याचे महत्त्व या विषयावर त्या आपला शोधनिबंध सादर करणार आहेत. भारतीयांमध्ये असलेल्या वंध्यत्वाच्या कारणांचा डॉ. पद्मा रेखा जिरगे यांनी स्वत: सखोल व तौलनिक अभ्यास केला असून, त्याआधारेच त्यांना असा निष्कर्ष मिळाला आहे, की भारतातील बहुसंख्य स्त्रियांमध्ये असलेल्या वंध्यत्वाला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोमच कारणीभूत ठरत आहे. अशा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोमने त्रस्त असणाऱ्या बहुसंख्य स्त्रियांची जननक्षमता सुधारण्यासाठी स्त्रीबीज कोशातून औषधी उपाययोजनांद्वारे आरोग्यदायी स्त्रीबीज निर्माण करण्यामुळे मोलाची मदत मिळत आहे. आतापर्यंत देशामध्ये संपन्न झालेल्या सर्व मुख्य वंध्यत्व परिषदांमध्ये त्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये त्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जवळ जवळ ५० हून अधिक विषयांवर व्याख्याने झाली आहेत.

राज्य अपंग संस्था महासंघातर्फे सोलापुरात धरणे आंदोलन
सोलापूर, ३ मार्च/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य अपंग संस्था महाविद्यालयाच्या वतीने विविध मागण्यांसाठी अपंग संस्था, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी चार हुतात्मा पुतळा येथे धरणे आंदोलन केले.
महासंघाचे अध्यक्ष ए. बी. राजमाने, उपाध्यक्ष उल्हास पाटील, जिल्हाध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सदाशिव धोत्रे, शशीभूषण यलगुलवार, पांडुरंग चौधरी, श्रीनिवास वैद्य, सुजाता घोडके, भीमराव धोत्रे, देवेंद्र भंडारी आदींसह अपंग, कर्णबधिर, अस्थिव्यंग व मतिमंद क्षेत्रात कार्य करणाऱ्या शाळांतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
शासनाने नव्याने लागू केलेला १८-८-२००४ चा कर्मचारी आकृतिबंध ताबडतोब लागू करावा, अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय व्हावी, प्रौढ अपंगांना व्यावसायिक शिक्षण मिळण्यासाठी कर्मशाळांची निर्मिती व्हावी आदी मागण्यांचे निवेदन शिक्षक कर्मचारी आणि व्यवस्थापनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांना भेटून देण्यात आले.
या धरणे आंदोलनस्थळी ग्रामीण विकास राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, माकपचे आमदार नरसय्या आडम मास्तर, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी त्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. येत्या विधानसभा अधिवेशनात या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडण्याचे आश्वासन आमदार आडम आणि आमदार देशमुख यांनी दिले.

झोपडीला आग लागून वृद्ध महिला जखमी
जत, ३ मार्च / वार्ताहर

जत तालुक्यातील दरिबडची येथे झोपडीला लागलेल्या आगीत नीलव्वा बहिराजी डोळ्ळी (वय ६५, रा. अंकलगी) ही अंथरूणाला खिळलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. या आगीत सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. दरिबडचीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या घागरे वस्ती येथे आज पहाटे पाच वाजता ही घटना घडली. नीलव्वा डोळ्ळी व तिची मुलगी मैना (वय ३५) व तिचा पती धोंडाप्पा घागरे (वय ३९) हे तिघेजण झोपले होते. पहाटेच्या सुमारास या झोपडीला आग लागल्याने या आगीचे चटके बसू लागताच धोंडाप्पा घागरे व मैना हे दोघे घराबाहेर पडले. पण अर्धागवायूने आजारी असलेल्या नीलव्वा यांना जागचे उठता येईना. शेजाऱ्यांच्या मदतीने नीलव्वा यांना बाहेर काढण्यात आले. त्यात त्या ९० टक्के भाजल्या आहेत.या आगीत तीन शेळ्याही मृत्यूमुखी पडल्या आहेत. तसेच धान्याची पोती, एक तोळे सोन्याचे दागिने व संसारोपयोगी साहित्य असे एकूण ६० हजार रूपयांचे साहित्य भस्मसात झाले. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रंकाळा महोत्सवात रसिक मराठी गीतांनी मंत्रमुग्ध
कोल्हापूर, ३ मार्च / प्रतिनिधी
महापालिकेच्या वतीने आयोजित कोल्हापूर रंकाळा महोत्सवांतर्गत आज सुप्रसिध्द गायक रवींद्र साठे यांचा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये रवींद्र साठे यांच्यासह सुवर्णा माटेगावकर, ऋषीकेश रानडे, मेघना सहस्त्रबुध्दे यांनी विविध मराठी गाणी गावून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये इंद्रायणी काठी देवाची आळंदी, झाला महार पंढरीनाथ, जीवलगा कधी रे येशील तू, एैन दुपारी यमुना तिरी, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, या रावजी बसा भाऊजी, आम्ही ठाकर ठाकर, अशा गाण्यांचा समावेश होता. मिलिंद कुलकर्णी यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. यावेळी कार्यक्रमातील कलाकार व प्रायोजकांचा आयुक्त विजय स्िंाघल व उपायुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चारूदत्त जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हातकणंगले मतदारसंघातून आणखी दोन महिला इच्छुक
पेठवडगाव, ३ मार्च / वार्ताहर

हातकणंगले या कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील गावांचा समावेश असलेल्या विस्तीर्ण अशा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी इच्छुक महिलांच्या संख्येत वाढच होत असून हातकणंगले पंचायत समितीच्या उपसभापती सुचित्रा खवरे (शिरोली) यांच्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील (अंबप) यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्यातरी अपक्ष म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. पूर्वीच्या इचलकरंजी या लोकसभा मतदारसंघाचे पुनर्रचनेत नाव बदलून हातकणंगले असे नाव करण्यात आले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, पन्हाळा- शाहूवाडी या चार मतदारसंघांसह सांगली जिल्ह्य़ातील शिराळा व इस्लामपूर (वाळवा) या विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या खासदार श्रीमती निवेदिता माने यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा उमेदवारी निश्चित केली असतानाच आणखी दोन महिलांनी या मतदारसंघातील निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हातकणंगलेच्या उपसभापती सुचित्रा खवरे यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविण्याच्या घोषणेपाठोपाठ अंबपच्या मनीषा प्रकाश पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघात महिलांच्या गर्दी होणे शक्य आहे.

विद्यार्थ्यांचीआत्महत्या
गडहिंग्लज, ३ मार्च/वार्ताहर

प्रश्नपत्रिका अवघड असल्यामुळे आपण काहीच लिहू शकलो नाही अशा निराश भावनेतून विनायक गंगाराम कांबळे या बारावी परीक्षार्थीने विष पिऊन आत्महत्या केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तनवडी ता. गडहिंग्लज येथील विनायक कांबळे हा शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथे कला शाखेत शिकत होता. गडहिंग्लज हायस्कूल येथे तो परीक्षार्थी म्हणून बसला होता. सोमवार, २ मार्च रोजी राज्यशास्त्राचा पेपर होता.

शिक्षक-शिक्षकेतरांच्या फेब्रुवारीच्या पगारास विलंब
सोलापूर, ३ मार्च/प्रतिनिधी

प्रशासनाच्या त्रुटीमुळे राज्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार उशिरा होणार आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांमध्ये नाराजी पसरली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालकांची भेट घेऊन नाराजीची भावना व्यक्त केली. शिक्षण संचालकांना भेटलेल्या शिष्टमंडळात कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रेय सावंत, गुरुनाथ वांगीकर, अण्णासाहेब गायकवाड, कुंडलिक पवार, संतोष वाघ, समाधान घाडगे, शिवाजी चव्हाण, प्रमोद बत्तूल, वैभव होनमुटे, विनोद शिंदे, सरदार नदाफ आदींचा समावेश होता.

विजेचा धक्का लागून वायरमन गंभीर जखमी
पंढरपूर, ३ मार्च/वार्ताहर

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे विद्युत कंपनीचे खांबावर जंप बसवण्याचे काम करणारा वायरमन जीवन साळुंखे हा कामात गुंग असताना अचानक विद्युत पुरवठा चालू केल्यामुळे शॉक बसून डावा हात कोपऱ्यापासून तुटून तारेलाच चिटकून साळुंखे जमिनीवर पडला. सोलापूर येथे उपचारासाठी त्याला नेले आहे. जीवन दत्तात्रय साळुंखे (रा. खेडभाळवणी) हा भंडीशेगाव विद्युत मंडळाकडे हंगामी वायरमन म्हणून कामास होता. ३ रोजी विद्युत बोर्डाचे अधिकारी दुभाष पाटील व जाधव यांचे सांगण्यावरून खांबावर काम करत असताना विद्युत पुरवठा अचानक चालू झाल्याने विजेचा धक्का जोराने लागल्याने डावा हात वायरला चिकटून गंभीर जखमी होऊन तो खाली पडला.