Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९

दहशतवाद्यांचा ‘क्रिकेट’वर हल्ला
पाकिस्तानात अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात श्रीलंकेचा संघ बचावला
आठ सुरक्षारक्षक ठार ’ पाच खेळाडू जखमी ’ जयवर्धनेचा संघ माघारी

लाहोर, ३ मार्च/वृत्तसंस्था
मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर नियोजित क्रिकेट दौरा करण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकिस्तानचे आमंत्रण स्वीकारून येथे आलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर आज सकाळी सुमारे डझनभर अतिरेक्यांनी भीषण हल्ला चढविला. ‘एके’ रायफली, हँडग्रेनेड्स आणि रॉकेट लाँचर अशा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हा हल्ला चढविण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात श्रीलंका संघाचा एकही खेळाडू बळी पडला नसला तरी संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकासह सहाजण जखमी झाले. यातील दोघांना गोळ्या लागल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मात्र या हल्ल्यात खेळाडूंचे रक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकांसह आठजण प्राणाला मुकले. या कल्पनातीत हल्ल्याने पाकिस्तान तसेच भारतीय उपखंडातील क्रिकेटच्या भवितव्यावरच भलेमोठे प्रश्नचिन्ह उमटविले असून आगामी विश्वचषकावर तसेच काही दिवसांवर आलेल्या ‘आयपीएल लीग’वरही अनिश्चिततेचे काळे सावट पडले आहे.

शिवसेना- राष्ट्रवादी युती झाल्यास भाजप मनसेबरोबर !
समर खडस
मुंबई, ३ मार्च

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाल्यास आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करावी लागेल. शरद पवारांसाठी हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिल्यास कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे राहील. मात्र मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर स्वार होऊन राज ठाकरे पुढे जातील, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, राजकारणात गप्प बसण्याला खूप महत्त्व आहे. काल परवापर्यंत जे तद्दन बोरूबहाद्दर होते ते आज स्वत:ला एका पक्षाचे सर्वेसर्वा मानू लागले आहेत. शिवसेना व भाजप या दोन पक्षांमध्ये वितुष्ट आणण्यामध्ये बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे तर एका बोरूबहाद्दराचाच हात आहे. उद्धव ठाकरे यांनाही हे माहित आहे.

‘मनाचं भव्य, दिव्य रूप म्हणजे रससिद्धान्त..’
मुंबई, ३ मार्च / विशेष प्रतिनिधी

‘रागसंगीतातला एखादा राग मला भावतो, आनंददायी वाटतो, तर दुसरा राग माझ्यात उदासी निर्माण करतो.. लक्षात आलं की हे सारे मनाचे व्यापार आहेत, तेव्हा मी मनाचा शोध घ्यायला लागले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मनाचं भव्य, दिव्य रूप म्हणजे रससिद्धांत..’ गानसरस्वती किशोरी आमोणकर सांगत होत्या. निमित्त होतं, त्यांनी लिहिलेल्या ‘स्वरार्थरमणी’ या ग्रंथाची पहिली प्रत त्यांनाच अर्पण करण्याचं. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी या ग्रंथाची प्रत आज सकाळी किशोरीताईंच्या निवासस्थानी एका हृद्य आणि अनौपचारिक कार्यक्रमात त्यांना भेट दिली. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, दाजी पणशीकर हेही या वेळी उपस्थित होते.

काँग्रेस व राष्ट्रवादीत २५ व २३ जागांचा तोडगा?
मुंबई, ३ मार्च / खास प्रतिनिधी

काँग्रेस व राष्ट्रवादीत जागावाटपावरून ताणले गेले असले तरी दोन्ही बाजूने काहीशी मवाळ भूमिका घेतली गेल्याने अंतिमत: काँग्रेसला २५ तर राष्ट्रवादीच्या वाटय़ाला २३ जागा मिळतील अशी चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी फारसे ताणून धरणार नाहीत व तुटेपर्यंत ताणणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करतानाच जागावाटपाचा अंतिम निर्णय नवी दिल्लीत होईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केले. काँग्रेसने २७ व २१ जागांचा आग्रह धरला होता तर राष्ट्रवादी निम्म्या जागांवर ठाम होती. दोन्ही बाजूने मवाळ भूमिका घ्यावी यासाठी नवी दिल्लीत प्रयत्न झाले. त्यातच राहुल गांधी यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे आज खास पुण्यात गेले होते. त्यानंतर मुंबईत एका विवाहसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उद्या नवी दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. एकूणच पवार व राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतर सूत्रे हलल्याचे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एक पाऊल मागे घेण्यास तयार झाले आहेत. काँग्रेसने २६ व राष्ट्रवादीने २२ जागा लढवाव्या, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. मात्र पवारांनी २५ व २३ जागांचा आग्रह धरल्याचे समजते. शेवटी हाच प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागावाटपाची चौथी फेरी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आज रात्री पार पडली. त्यात विदर्भ, मुंबई व ठाण्यातील जागांबाबत चर्चा झाली. निवडून येण्याच्या क्षमेतवर जागावाटप झाले पाहिजे अशी काँग्रेसचीही भूमिका आहे. शक्यतो जागावाटपावर मुंबईतच तोडगा निघावा अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. मात्र काही जागांवर मतैक्य न झाल्यास दिल्लीच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादीने वेगळा मार्ग पत्करला तर काँग्रेस योग्य वेळी आपले पत्ते खुले करेल, असेही चव्हाण यांनी सूचित केले.

सध्यातरी आयपीएल क्रिकेट स्पर्धा नको
चिदंबरम यांची सूचना
नवी दिल्ली, ३ मार्च / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलून सार्वत्रिक निवडणुकांनंतर घ्यावी, अशी सूचना गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आयपीएल स्पध्रेमुळे सुरक्षा व्यवस्था विभागली जाईल. त्यामुळे केंद्राचे गृहसचिव आयपीएलच्या आयोजकांशी चर्चा करून स्पध्रेच्या नव्या तारखा जाहीर करतील, असे चिदंबरम यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेल्या हल्ल्यामुळे मला धक्का बसला, अशा शब्दांत चिदंबरम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पाकिस्तानचे विश्वचषक सहयजमानपद धोक्यात
नवी दिल्ली, ३ मार्च / पीटीआय

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर लाहोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाकिस्तानातील आयोजनावर अनिश्चिततेचे सावट पसरल्याची कबुली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नियोजित अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सहयजमानपद धोक्यात आल्याचे पवार म्हणाले. पवार यांनी सांगितले की, क्रिकेट हे दहशतवाद्यांचे लक्ष्य झाले आहे, ही धक्कादायक बाब आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इतर देश खेळणार की नाही, यासंबंधात आम्हाला माहिती मिळेलच. पण त्यामुळे स्पर्धेच्या एकूण कार्यक्रमावर मोठा परिणाम होईल.

सद्यस्थितीत पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही
लंडन, ३ मार्च / पीटीआय

जोपर्यंत सुरक्षाव्यवस्थेचा चोख बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन होऊ शकत नाही, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

डोंबिवलीत युनियन बँकेवर दरोडा ; साडेपाच लाखांची रक्कम लंपास
डोंबिवली, ३ मार्च /प्रतिनिधी

डोंबिवली पूर्वेतील सागाव येथील युनियन बँकेच्या शाखेवर आज दुपारी तीन शस्त्रधारी युवकांनी दरोडा टाकून पाच लाख ८८ हजाराची रक्कम लुटून नेली. दिवसाढवळ्या आणि मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. मानपाडा रोडवरील सागाव येथे युनियन बँकेची नवीन शाखा सुरू झाली आहे. आज दुपारी तीन वाजता तीन व्यक्ती बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आल्या. त्यापैकी एक जण बँकेत आपणास नवीन खाते काढायचे आहे म्हणून नाटक करू लागली. या व्यक्तीने अर्ज भरल्याचा बहाणा करून बाहेर उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना आत बोलविले. दोन व्यक्तींनी आत प्रवेश केल्यानंतर मुख्य दरवाजाचे शटर बंद केले. या व्यक्तींनी जवळील रिव्हॉल्व्हर आणि चाकूच्या सहाय्याने बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यामुळे कर्मचारी घाबरून गेले. या संधीचा लाभ उठवत या तिघांनी बँकेतील पाच लाख ८८ हजार रुपयांची रक्कम लुटून पोबारा केला. धक्कादायक बाब म्हणजे या बँकेला शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नसल्याचे व बँकेत सीसी टीव्ही, कॅमेरे नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरोडा पडताना बँकेत एक कुरिअरवाला आला होता, त्याला पोलिसांनी थांबून चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली, आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले.

कळवा रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या
ठाणे,३ मार्च/प्रतिनिधी

पोटदुखीच्या आजाराला कंटाळून रविंद्र गणपत कांबळे या रुग्णाने काल कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केली. मुंब््रयातील शंकर दर्शन अपार्टमेंटमध्ये राहणारा रविंद्र पोटदुखीने त्रस्त झाला होता. काल रात्री रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागे पोटदुखीशिवाय अन्य कारणे असून ती पोलीस तपासात उघड होतील, असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान समतानगरमधील एका इमारतीचे रंगकाम करीत असताना पाय घसरून खाली पडलेला अजित चंदीश्वर राम (३२) हा मजूर जागीच ठार झाला.

 


प्रत्येक शुक्रवारी